Monday, February 8, 2021
चेकमेट हाऊ बीजेपी वन अँड लॉस्ट महाराष्ट्र
Monday, January 11, 2021
अंगार मळा
कदाचित ह्या सर्व लुटी पासूनच त्यांना शेतकऱयाला वाचवायचे असेल काहो कि अजून काही असेल त्यांच्या मनात .ह्या सर्वासाठी आणि किंबहुना याहून अधिक मला भावलेल्या खालील दोन प्रकरणासाठी अंगारमळा जरूर वाचा
प्रकरण ११ :एका कामगार चळवळीचा अंत : हे प्रकरण कै. कामगारनेते दत्ता सामंत यांच्या शरद जोशी व शेतकरी संघटनेशी असलेल्या नात्यावर आहे .
प्रकरण १७:'अनिल ' जादूच्या दिव्यातील राक्षस : हे पूर्वश्रमीचे राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे नंतर शेतकरी संघटनेत आलेले आणि आजच्या वर्तमानात महाराष्ट्रात लोकसंग्राम नामक पक्ष चालवणाऱ्या श्री अनिल अण्णा गोटे यांच्यावर बेतलेलं आहे . हे प्रकरण वाचून अगदी थक्क व्हायला होते कारण मला श्री गोटे माहिती पडले ते तेलगी घोटाळ्यामुळे पण हे नव्हते माहित कि त्यांनी त्यांच्या पूर्वायुष्यात एवढा मोठा संघर्ष केला आहे .प्रसंगी लाठ्याकाठ्या खाल्या आहेत . अगदी शरद जोशी त्यांना बहिर्जी नाईक यांची उपमा देतात असेलही कारण पुस्तकात लिहल्या प्रमाने जे छगन भुजबळ साहेब १९९१-९२ साली काँग्रेस मध्ये गेले व त्यांना शिवसेनेतून फोडण्याचे श्रेय आदरणीय पवार साहेबांना मिळाले ते श्रेय श्री अनिल गोटे यांना १२ डिसेम्बर १९८७ रोजीच मिळाले असते जर श्री भुजबळ त्यांना येऊन मिळाले असते .
Monday, December 21, 2020
राडा
भाऊ पाध्ये लिखित ही माझ्या वाचनात आलेली दुसरी कादंबरी, १९७५ साली फॉरवर्ड पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या कादंबरीला १९९७ साली जेव्हा अक्षर प्रकाशनाने पुन्हा प्रकाशित केली तेव्हा प्रसिद्ध मराठी लेखक , देशीवादाचे जनक , खंडेराव, पांडुरंग सांगवीकर या नायकाचे जन्मदाते श्री भालचंद्र नेमाडे यांनी प्रस्तावना लिहली आहे व त्यांच्या मते राडा ही लघु कादंबरी आहे.
तशी ही भाऊ पाध्ये लिखित लघु कादंबरी त्यांच्या वासूनाका, करंटा व बॅरिस्टर धोपेश्वर या पुस्तका नंतर प्रकाशित झालेली आहे .त्यातील वासूनाका या कादंबरी वर त्या काळात बरीच चर्चा झाली होती अगदी प्र. के. अत्रे यांनी त्यातील अश्लीलते बद्दल अगदी टोकाची टीका केली होती . परंतु वासूनाका ला देखील विजय तेंडुलकर, दुर्गा भागवत, दिलीप चित्रे या सारख्या दिग्गजांची समीक्षा लाभली आहे.
तसे भाऊच्या कादंबऱ्या ह्या तत्कालीन वास्तवतेचे दर्शन घडवणाऱ्या व तेव्हाही आणि आज देखील त्याज्य मानल्या गेलेल्या मानवी भाव भावना , लैंगिकता , कौटुंबिक नातेसंबधांची विण एकमेकांविषयीची आकर्षणे , लज्जा व खोट्या सामाजिक प्रतिष्ठेपोटी मनातील भावनांचे घोटले जाणारे गळे या भोवती विणलेल्या आहेत व ते कितीही नाकारले तरी वास्तव आहे.
असो राडा ही लघु कादंबरी त्यावेळी तशी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. शिवसेनेने प्रकाशकास ह्या कादंबरीच्या प्रती विक्रीस आणण्यास मनाई केली होती . अर्थात ही सेना स्टाईल आहे .कारण प्रस्तुत कादंबरीची गुंफण ही औद्योगिक संबंध, कामगार संघटना मधील रस्सीखेच , त्या काळात उदयोन्मुख असणाऱ्या शिवसेनेच्या शाखा व सदानंद अन्नेगिरी ह्या मराठी उद्योजकाचे एकमेव वारस असणाऱ्या मंदार अन्नेगिरी ह्या रोमँटिसिझम मध्ये असणाऱ्या वांड युवकाचा शिवसेना शाखा प्रमुख श्री नाना खारकरशी आणि गोरेगावातील शिवसैनिक यांच्या शी उघड उघड पंगा या सर्व बाबी वर ह्या कादंबरीचे कथानक बेतले आहे.
तसे शिवसेनेच्या रोषाचा साहित्यिका मध्ये श्री विजय तेंडुलकर यांना देखील घाशीराम कोतवाल या नाटकाच्या वेळी सामना करावा लागला होता . अर्थात त्याचा ह्या पुस्तक प्रकाशनाशी व कथेशी काहीही संबंध नाही.
हे पुस्तक मुळी वाचावे कश्यासाठी तर मानवी भाव भावना, नाते संबंधाची वीण , ६० ते ७० च्या दशकातील युवा पिढीतील रोमँटिसिझम त्यांचे उजवे डावे की अजून काही वेगळे राजकीय विचार धारा वर होणारे हिंदोळे त्यांच्या मनात चालणारे कल्लोळ , उद्योग घराण्यात जन्माला येऊन पण वांड पणात रमणारा मंदार ह्या नायकाचा आयुष्यात नशेत असताना एक अगदी टोकाची घटना घडते आणि मंदार अंतर्बाह्य हादरतो ?? की त्यामुळे त्याच्या वांड व्यक्तिमत्वाला खोट्या सामाजिक प्रतिष्ठेचे वेसण घातले जाते की त्याला त्याचे नाईलाजाने जोखड म्हणून आयुष्य भर वागवावे लागते यासाठी जरूर वाचा "राडा"
माझ्या मते ह्या कादंबरीच्या कथानकावर एक झक्कास सीरिज बनू शकते.
#भाऊपाध्ये
#राडा
#बुकरिव्ह्यू
#कादंबरी
Sunday, November 29, 2020
करंटा
करंटा ही भाऊ पाध्ये लिखित साठीच्या दशकातील कामगार चळवळ, तत्कालीन कामगार नेत्यांचे आयुष्य , कामगार चळवळीच्या कार्यात झोकून घेणारे आणि स्व ताची नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची या कामगार चळवळीसाठी नी पक्षाच्या कामगार संघटने साठी आहुती देणाऱ्या फुल टायमर कार्यकर्ता असणाऱ्या शांताराम वहिले उर्फ आझाद चाचा या पात्रा भोवती विणलेली एक अप्रतिम कादंबरी .
तसा कामगार चळवळ आणि कामगार संघटना जगताशी. जी तोंड ओळख झाली ती एम .बी. ए .एच आर झाल्यानंतरच व एच आर म्हणून औद्योगिक क्षेत्रात काम करायला लागल्यावर . त्यातून या क्षेत्राबद्दल जिज्ञासा जागृत झाली नी मग त्या अनुषंगाने वाचन करायला लागलो . त्यातून विविध राजकीय विचारसरणीचा, नेत्याच्या नी त्यात सामावलेल्या आर्थिक विचाराच्या व गणिताचा परिचय घडायला लागला अगदी वेल्थ ऑफ नेशन चा स्कॉटिश निर्मात ॲडम्स स्मिथ असेल किंवा दास कॅपिटल चा निर्माता जर्मन निर्माताकार्ल मार्क्स असेल किंवा फ्रेडरिक अंगल्स असेल ह्या विदेशी तत्वज्ञा सोबतच बरीच भारतीय नावे देखील खुणावू लागलीत. त्यात प्रामुख्याने डाव्या पक्षातील कॉ डांगे , कॉम्रेड बगाराम तुळपुळे , कॉम्रेड बी टी रणदिवे , समाजवादी जॉर्ज फर्नांडिस, पी डिमेलो आणि बरेच नेते विचारवंत यांचे विचार अनुषंगिक पने वाचण्याचा व समजण्याचा प्रयत्न केला व करतोय वरील लेखक , विचारवंत , पुढारी यांचे लिखाण व विचार हे अनुभवा वर आधारलेले व जोखलेले तत्वज्ञान आहे . ती एक विचार धारा आहे .
परंतु कादंबरीचे विश्व हे सभोवतालात घडणाऱ्या घटना भोवती बेतलेलं असते नी त्या तील पात्र अगदी आपल्याशी बोलतात किंवा आपल्या भोवती अस्तित्वात असल्याचा अनुभव घडवून आणण्याचे काम करत असतात. कामगार संघटना किंवा कामगार चळवळ त्यांचे कुटुंब यांच्या जीवनावर होणारे परिणाम या देशोदेशी बरेच लिहले गेले .अगदी काल परवा डग्लस स्टुअर्ट ह्या अमेरिकी लेखकाने इंग्लंड मध्ये मार्गारेट थॅचर यांनी राष्ट्रीय उद्योगाचे केलेल्या खाजगीकरणामुळे स्कॉटलंड मधील ग्लासगो शहरातील माणुसकीत आलेल्या कुरूप तेचे दर्शन घड वणाऱ्या शगी बेन ह्या कादंबरीला यंदाचा साहित्य क्षेत्रात मानाचा मानला जाणारा बुकर पुरस्कार प्राप्त झाला आहे.
मुंबई मधील कामगार चळवळ आणि संघटना व त्यांचे फुल टायमर कार्यकर्ते हे देखील एक अजब जग होते म्हणजे संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते ह्यांनी संघटने कडून मिळणाऱ्या फुटकळ मानधनावर अगदी स्वतःचे अस्तित्व संघटनेच्या नावावर करून दिले होते. कदाचित आज हे शब्द काल सुसंगत आहे वाटते. परंतु तो जमाना होता निस्वार्थ निष्ठेचा , पक्षासाठी अगदी सर्वस्वाचा त्याग करण्याचा आणि त्यासाठी देखील अहमिका लागलेली असे. अगदी दीवार (मेरा बाप चोर है वाला) ह्या सिनेमात दाखवलेल्या युनियन नेत्या प्रमाणे, करंटा ह्या कादंबरीतील आझाद चाचा हे देखील असेच एक पात्र की जे पक्ष कामगार संघटनेचे फुल टायमर कार्यकर्ते त्यांचा दिन रात एकच उद्योग म्हणजे कामगाराचे प्रश्न सोडवणे वेळी अवेळी अडल्या नडल्या कामगाराला मदत करणे. कामगाराचा प्रश्नासाठी लेबर ऑफिस, लेबर कोर्ट , इंडस्ट्रिअल कोर्ट यांचे उंबरठे झिजवने, गेट मीटिंगा घेणे , कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी संपाची तयारी करणे, संपा काळात कामगाराचे मनोबल टिकून राहण्यासाठी सतत जागृत राहणे . यासह अनेक लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे उद्योग आजाद चाचा करत होते.सुरवातीला चाचाच्या घरातून देखील या सर्वाला प्रोत्साहन तर होतेच .पण त्यांची मुलगी तारा, मुलगा कुमार , पत्नी मंजुळा यांचा सक्रिय सहभाग होता. परंतु काळानुरूप आझाद चाचाच्या कामगार संघटनेला लागलेली घरघर दिवसेंदिवस घटत जाणारी संघटनेची सदस्य संख्या व त्यामुळे अटलेला युनियनचा निधी. या सर्वाची परिणीती म्हणजे ह्या फुल टायमर च्या घरात दुरापास्त झालेले लक्ष्मी दर्शन व या सर्वाचा परिपाक म्हणजे परिवाराची झालेली फाटाफूट या मुळे आझाद चाचाने भोगलेली दुःख या सर्व माहिती साठी जरूर वाचा करंटा !!!!
#करंटा
#भाऊ #पाध्ये
#बुकरिव्ह्यू
#युनियन
#इंडस्ट्री
#इंडस्ट्रिअल #रेलेशन्स
#Industrial #Relations
Monday, October 19, 2020
मी वाय सी
तसं मी वाय सी दुसऱ्यांदा वाचायला घेतलेलं आत्मचरित्र पहिल्यांदा २००७–०८ मध्ये सार्वजनिक वाचनालय (सावाना), नाशिक चा सदस्य असताना वाचले होते. पण काही पुस्तके असतात वारंवार वाचावी अशी की जी मनाच्या कोपऱ्यात कायम स्थान करून बसलेली असतात जशी संधी मिळाली की डोकावतात आणि परत परत वाचायला उद्युक्त करत असतात त्या पैकीच एक मी वाय सी.
मी वाय सी हे मी मुंबई पोलिस दलाचे एक धाडसी आणि धडाडी चे अधिकारी होते . श्री.यादवराव पवार (वाय सी ) यांचे चरित्र परत वाचण्याचे आणखी एक कारण म्हणजे ते खानदेशातील त्यांचे मूळ गाव हे धुळे जिल्ह्यातील निमगुळ आहे आणि मी स्वतः खानदेशातील असल्या मुळे म्हणा तो सॉफ्ट कॉर्नर मनाच्या कोपऱ्यात कायम असतोच नी आहे.
श्री वाय सी पवार यांनी त्यांच्या नोकरीची सुरुवात गुणवत्ता निरीक्षण विभागातून सुरू केली , पुढे ते राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास होऊन तहसीलदार ह्यां पदी निवड झाली पण तेथे जीव रमत नव्हता अंगावर वर्दी घालण्याचा शौक होता त्यामुळे पुन्हा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बसले यशस्वी होऊन त्यांची पोलिस उपअधीक्षक पदी नेमणूक झाली .त्यांची पोलिस उपअधीक्षक पदी निवड झाल्या नंतर चा पोलिस प्रशिक्षण अकादमी तील प्रशिक्षण काळा नंतर त्यांनी त्यांची पोलिस विभागातील कारकीर्द नाशिक जिल्ह्यात सुरू केली ही सर्व कारकीर्द १९७० च्या दशकातील त्यात त्यांनी सिन्नर शहरातील दंगल आणि तणावग्रस्त स्थिती यशस्वी पणे हाताळली . त्यावेळी नाशिक जिल्ह्यात गाजलेल्या शुभांगी सोहनी खून खटल्याचा तपास अतिशय काळजीपूर्वक करून या प्रकरणातील आरोपींना गजाआड केले.
नाशिक शहरातील त्यांची ही कारकीर्द बघून त्यांना नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे उभ्या महाराष्ट्रात जातीय दंगली आणि दोन धर्मातील तणावामुळे अशांत शहर अशी ओळख असणाऱ्या मालेगाव शहराच्या पोलिस उपअधीक्षक पदी बदली झाली आणि याचं मालेगाव शहरातील अनुभवांनी त्यांना परिपक्व बनवले.मग त्यातील मालेगावातील गणपती ची मिरवणूक असेल त्यात निर्माण झालेला तणाव ,माजी आमदार बरोबर चा पंगा आणि त्याच बरोबर त्यांना मिळालेले मालेगाव करांचे प्रेम. मालेगावातील यशस्वी २ वर्षाच्या कार्य काळानंतर त्यांची महाराष्ट्रातील विविध शहरात नी पोलिस विभागाच्या वेगवेगळ्या शाखेत बदल्या होत राहिल्या त्यांचा स्वभाव स्वाभिमानी असल्या मुळे शासनाचा आदेश शिरसावंद्य मानून ते त्यांची सेवा देत राहिले.त्यांच्या कार्य शैली मुळे त्यांना विविध पदे देखील मिळत कधी संघर्ष करावा लागला कधी न मागता मिळाले कधी डावलले गेले या सर्वाचा त्यांनी पुस्तकात खुलासा केला आहे .
वाय सी पवार हे तसे माझ्या पिढीच्या दृष्टीने असे जास्त ओळखीचे नाही कारण त्यांची कारकीर्द विसाव्या शतकाच्या सुरुवातीला संपली पण ह्या पुस्तकामुळे बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या जसे उल्हास नगर मधील रिंकू पाटील हिचे हत्याकांड ह्या प्रकरणा विषयी ऐकून होते कारण ते त्या हत्याकांडातील आरोपींनी वापरलेल्या मोडस ऑपेरांडी नुसार खूप भयंकर होती कारण एकतर्फी प्रेमातून आरोपीने एस एस सी बोर्डाची परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त असताना देखील ज्वालाग्राही पदार्थ टाकून रिंकू पाटील ला पेटवून दिले व त्यात तिचा मृत्यू झाला व पप्पू कलानी यांच्या समर्थकांनी घटना घडताच त्या स्थळाचे व्हिडिओ शूटिंग केले त्यातून प्रचंड तणाव निर्माण झाला होता. रिंकू पाटील प्रकरणानंतर त्यांचा मुंबई पोलिस दलात पोलिस उपायुक्त म्हणून प्रवेश धारावी सारख्या संवेदनशील भाग , अवैध दारू निर्मिती (हात भट्टी ची दारू ) आणि वरद राजन मुदलियार (विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित चा दयावान हा चित्रपट ह्याच्या आयुष्यावर बेतलेला आहे ) ह्या सर्वांशी एकहाती सामना त्याचं दरम्यान गुन्हेगाराकडून न्यायालयात खटले आणि पोलिस दलातील सहकार्याचा असहकार पण रिबेरो साहेब सारख्या वरिष्ठ नेतृत्व कडून झालेली पाठराखण व या संकटाचा बीमोडयाचं सह मुंबईच नव्हे संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या १९९३ बॉम्ब स्फोटाच्या कटाचा तपास आणि वाय सी यांचा त्यातील यशस्वी सहभाग पण काही चित्रपट आणि पुस्तके जसे हुसैन झैदी लिखित ब्लॅक फ्रायडे यांनी या प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून फक्त एका विशिष्ठ अधिकाऱ्याला फक्त श्रेय दिले आहे परंतु इतिहास तसा नसून त्या घटनेचा छडा लावण्यासाठी वाय सी यांचा सहभाग किती महत्वाचा आहे हे सर्व यातून समजते.
मुळात हे पुस्तक एका सीरिज साठी एक चांगला संदर्भ ठरू शकते यात शंका नाही
का वाचले पाहिजे
१.पोलिस दलातील अंतर्गत वाद
२. श्रेयासाठी पदकासाठी चे राजकारण
३. दलित असल्यामुळे भोगावे लागणारे त्रास
कोणी वाचले पाहिजे
१.पोलिस फक्त भ्रष्ट असतात असे मत असणाऱ्यांनी
२. पोलिसानं बद्दल प्रतिकूल मत असणाऱ्यांनी
३. प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी
#मीवायसी
#बुकरिव्ह्यू
#चिनारप्रकाशन
#IPS
Monday, September 28, 2020
सुसाट जॉर्ज
सुसाट जॉर्ज हे निळू दामले लिखित ख्रिस्तवासी जॉर्ज फर्नांडिस यांचे एक प्रोफाईल आहे. तसे आजपर्यंत निळू दामले यांनी लिहलेले हे दुसरे पुस्तक वाचून संपवले. माझ्या मते प्रत्येक चरित्रात्मक,आत्मचरित्रात्मक वाचन करणाऱ्या वाचकाच्या मनात बरेच व्यक्तिमत्व हे सदैव रुंझी घालत आणि त्या व्यक्तिमत्वाविषयी पुस्तके वाचनास साद घालत असतात . तसे मला देखील विविध क्षेत्रात काम केलेले आणि करणारे असे व्यक्तिमत्व सदैव त्यांच्या विषयी वाचण्यासाठी प्रवृत्त करतात .
अगदी स्वातंत्र्य पूर्व नी स्वातंत्रोत्तर भारतीय औद्योगिकरणाच्या इतिहासात आणि संपूर्ण भारतभर विविध कामगार संघटनात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या नी इतिहास घडवणाऱ्या कामगार चळवळीचे अर्ध्वयू मानले जाणारे नेते घडवण्यात महाराष्ट्राचा व मुंबई शहराच्या सिंहाचा वाटा आहे . अगदी नारायण मेघाजी लोखंडे पासून , कॉ. डांगे सारखे कट्टर डावे ,डॉक्टरी व्यवसायातून कामगार नेते झालेले डॉ दत्ता सामंत ,भारतीय मजदूर संघाचे दत्तो पंत ठेंगडी ,मुक्त कामगार चळवळीचे प्रणेते नी भांडवलवादी अर्थव्यवस्थेचे समर्थक असणारे आर जे मेहता , भारतीय कामगार सेनेचे वामनराव महाडिक , दत्ताजी साळवी,विडी कामगारांचे नेते आडम मास्तर ,सिटू चे कॉ गोविंद पानसरे ,कॉ. बी टी रणदिवे ,कॉ बगाराम तुळपुळे ,हिंद मजदुर सभेचे शरद राव ह्या सर्व कामगार नेत्यांच्यात एक महत्वाचे नी ज्याचे नाव घेतल्याशिवाय किंबहुना मुंबईचाच नव्हे तर उभ्या भारताच्या कामगार चळवळीचा नी कामगार नेत्यांचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही असा हा मुंबईचा पहिला बंद सम्राट ,जायंट किलर ,समाजवादी विचारसरणी वर नितांत श्रद्धा असणारा , भारताचे माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस.
जॉर्ज चा जन्म आजच्या कर्नाटकातील मंगलोर (मंगळुरु) मधील एका कर्मठ ख्रिस्ती परिवारात झाला होता .जॉर्जचे वडील हे शेती बरोबर विमा व्यवसाय करत ज्या प्रमाणे सर्व वडिलांच्या आपल्या पाल्यच्या करियर बद्दल अपेक्षा असतात त्याचप्रमाणे जॉर्जच्या वडिलांना जॉर्जने वकील व्हावे असे वाटत होते पण जॉर्जला काही वकील व्हावयाचे नव्हते त्याच्या ओढा कुठे दुसरी कडेच होता म्ह्णून जॉर्ज मॅट्रिक झाल्यावर मंगलोर मधील सेमिनारीत जाऊ लागला आणि पुढे भविष्यात त्याला बंगलोर येथील सेमिनारीत घालण्यात आले,तेथे देखील जॉर्ज स्वस्थ बसला नाही ख्रिस्ती धर्माबद्दल अखंड वाचन केले अगदी धर्माच्या सखोल ज्ञानासाठी जॉर्ज लॅटिन भाषा देखील शिकला कारण ख्रिस्ती धर्माचे मूळ तत्वज्ञान हे लॅटिन भाषेत आहे ,धार्मिक वाचनासोबत जॉर्ज चे अवांतर आणि इतर धर्माच्या तत्व ज्ञानाबद्दल ही प्रचंड वाचन आणि सखोल अभ्यास होता आणि वाचनाची जॉर्ज ची सवय अगदी अखेर पर्यंत टिकली होती . त्याच्या बंगलोर मधील खोलीत ,दिल्लीतील निवासस्थानात पुस्तकांचा प्रचंड संग्रह होता.
सुरवातीच्या काळात जॉर्ज ने चर्च वरील विश्वास उडाल्यावर स्थानिक कामगारांच्या संघटनाची बांधणी केली त्यात विडी कामगार हॉटेल मधील कामगार याच्या संघटना बांधल्या "युवक "नावाचे कोकणी मासिक चालवलेलं त्याच दरम्यान मुंबईतून तडीपार असलेले रॉय वादी गोदी कामगारनेते पी डिमेलो हे मंगलोर येथे येऊन राहत होते . त्यांच्याशी जॉर्ज ची ओळख झाली त्या दरम्यान पी डिमेलो यांनाही त्या संघटनेत काम करण्यासाठी एका सहकाऱ्याची गरज होती व त्यांच्या दृष्टीने जॉर्ज हा योग्य सहकारी होता . त्या दोघांनी मिळून मंगलोरात बस कामगाराचा संप घडवून आणला होता . पण कालांतराने साधारणतः १९५० ला जॉर्ज मित्राच्या आग्रहाखातर नी मित्रांनी दिलेले २० रुपये घेउन मुंबईत आला व मुंबईचा झाला .
मुंबईत स्थिरावणे नी घट्ट पाय रोवणे तसे येरा गबाळ्याचे काम नोहे परंतु जॉर्ज हा स्वभावतः निर्भय ,संघर्षशील,चिवट आणि लढाऊ होता . सुरवातीच्या काळात जॉर्ज ने बरेच कामे केलीत अगदी हॉटेलात ,संगीत रेकॉर्डच्या दुकानात ,टाइम्स मध्ये प्रूफ रीडर म्हणून विविध प्रकारची कामे केलीत . दरम्यानच्या काळात पी डिमेलो हे वापस मुंबईत आले व ह्या दोघांनी मिळून गोदीत कामगाराच्या ड्रायव्हराच्या संघटना बांधल्या येेेेथे जॉर्ज अगदी हाजी मस्तान सारख्या गुंडाला देखील भिडला नी जॉर्ज ची मुंबईतील कामगार जगतात एक ब्रँड म्हणून ओळख बनायला सुरुवात झाली हळू हळू गोदी कामगार संघटना ते बेस्ट कामगार, मुंबई महानगर पालिका साफसफाई कामगाराची संघटना एक एक करत पादक्रांत करत विविध क्षेत्रातील कामगा राच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देण्यास सुरुवात केली , संप पुकारले . सरते शेवटी २५ जुलै १९५८ रोजी मुंबई बंद केली आणि नवाकाळ ह्या दैनिकाने बातमी करून जॉर्ज ला "बंद सम्राट" ही उपाधी बहाल केली. कामगार नेता म्हणून अगदी जे आर डी टाटा यांनी जॉर्ज ला बॉम्बे हाउस मध्ये बोलवून टाटा उद्योग समूहाच्या हॉटेल उद्योगातील कामगाराची संघटना चालवायची गळ घातली होती हे विशेष होते.
जॉर्ज चे गुरू पी डिमेलो हे निवडणुकीच्या रिंगणात हरले होते ,परंतु जॉर्ज सर्व प्रथम मुंबई महानगर पालिकेत नगरसेवक झाला पण जॉर्ज चा पिंडच मुळी खतरों से खेलने वाला होता. त्याने १९६७ साली मुंबई प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष , खासदार, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट स का पाटील यांच्या विरुद्ध खासदारकीची निवडणूक लढविण्याचे जाहीर केले खरे तर स का पाटील यांच्या समोर जॉर्ज काहीच नव्हते .पण लोकांनी ही निवडणूक स्वतः लढवली स का पाटील हे जायंट होते तर त्यांना ह्या निवडणुकीत हरवून जॉर्ज जायंट किलर ठरला. याच सह या पुस्तकात लेखकाने जॉर्ज संबंधी त्यांचा आणीबाणी काळातील भूमिगत प्रवास ,बडोदा डायनामाईट प्रकरण , नंतर जॉर्ज चा बिहारच्या निवडणूक रिंगणात प्रवेश जनता सरकार मध्ये उद्योग मंत्री, कोको कोला , आय बी एम सारख्या कंपन्यांना देशाबाहेर घालवायचा निर्णय, रेल्वे मंत्री , काश्मीर मंत्री म्हणून कारकीर्द या संबंधी बरीच माहिती दिली आहे.
१९९६ नंतर जॉर्ज चे राजकारण कमालीचे बदलले ज्यांचा आयुष्य भर विरोध केला त्याच्याशीच युती केली त्याचं युतीचा (राष्ट्रीय विकास आघाडीचा) जॉर्ज हा समन्वयक बनला, वाजपेयी सरकार मध्ये संरक्षण मंत्री पद सांभाळलं पण २००४ नंतर जसे वाजपेयींचा करिश्मा हरवू लागला तसा जॉर्ज देखील राष्ट्रीय राजकारणातून मागे फेकला जाऊ लागला. नंतर नंतर जॉर्ज ला अल्झाईमर (स्मृतीभंश) या आजाराने ग्रासले , वाजपेयी जी पण ह्याचं आजाराने ग्रस्त होते असे म्हणतात की एके काळच्या ह्या दोघं सहकाऱ्यांना समोरासमोर आणले असते तर त्यांनी एकमेकांना ओळखलं नसते. अखेरच्या दिवसात जॉर्ज चा स्मृतीभ्रंश गडद होऊ लागला होता आणि जॉर्ज चा ताबा मिळवण्यासाठी जॉर्ज ची पत्नी लैला कबीर आणि सहकारी जया जेटली यांच्यात न्यायालयीन लढाया झाल्या जॉर्ज ताबा काही दिवस अगदी बाबा रामदेव यांच्या कडे देखील होता .
या सर्व गोष्टी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी जरूर वाचा सुसाट जॉर्ज
#RajhansPrakashan
#सुसाटजॉर्ज
#निळूदामले
#बुकरिव्ह्यू
#जायंटकिलर
Nilu Damle
Sunday, September 13, 2020
मन गंगेच्या काठावर
मन गंगेच्या काठावर
मन गंगेच्या काठावर हे पुस्तक पूर्वोत्तर भारतातील ज्येष्ठ आणि पहिल्या महिला पत्रकार असणाऱ्या श्रीमती सबिता गोस्वामी लिखित मनो गोंगार तिरोत ह्या मूळ आसामी भाषेत लिहलेल्या आत्मचरित्राचा श्रीमती सविता दामले यांनी मराठी भाषेत केलेला अनुवाद .
आसाम आणि पूर्वोत्तर भारतातील राजकारण ,जनतेच्या दिल्लीश्र्वराकडून अपेक्षा आणि आसामच्या नी पूर्वोत्तर भारतातील जनतेच्या भावनांची , अपेक्षांची कमी अधिक प्रमाणात दिल्लीश्र्वराकडून झालेली हेळसांड आणि त्यातून तेथील जनतेच्या मनात निर्माण झालेली दुरावल्याची भावना अर्थात त्याला केंद्रीय सत्ताधाऱ्यांची ध्येय धोरणे आणि देशाच्या त्या भागाबद्दल असणारी अनास्था देखील तेथे निर्माण झालेल्या असंतोषस कारणीभूत होती.
वानगीदाखल उदाहरण द्यायचेच झाले तर स्वातंत्र्य मिळताना स्वातंत्र्य आपणास तुकड्यात मिळाले भारताची फाळणी होऊन दोन देश निर्माण करण्यात आले भारत नी पाकिस्तान स्वातंत्र्याच्या वेळी आजचा बांगलादेश असणारे राष्ट्र हे पूर्व पाकिस्तान होते आणि फाळणीच्या वेळी आजचा आसाम हा पाकिस्तानात समाविष्ट करण्याची तयारी देखील तत्कालीन नेत्यांनी चालवली होती परंतु आसामचे प्रथम मुख्यमंत्री गांधीवादाचे पुरस्कर्ते ,भारतरत्न लोकप्रिय गोपीनाथ बारदोलाई यांच्या प्रयत्नामुळे आसाम हे राज्य आजच्या भारतीय संघराज्याच्या सीमेत समाविष्ट झाले ,दुसरे उदाहरण द्यायचे झाले तर १९६२ च्या चिनी आक्रमणात चीनचे सैन्य तेजपुर पर्यंत येऊन ठेपले होते आणि त्यावेळी नेहरूंनी त्याच्या प्रतिसादात केलेल्या भाषणात My Heart Goes with People of Assam ह्या वाक्य मुळे आसामच्या जनतेच्या मनात जी न बरी होणारी जखम झाली ती कायम ठस ठसत राहिली.
नंतर पूर्व पाकिस्तानात पश्चिम पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी केलेल्या अत्याचारामुळे हजारो तत्कालीन पाकिस्तानी (बांगला) नागरिकाच्या झालेल्या स्थलांतरामुळे आसाम मध्ये बिघडलेला सामाजिक आणि आर्थिक समतोल हा कायम एक विवादास्पद मुद्दा राहिला आणि त्यातून पुढे आसाम मध्ये मोठे जन आंदोलन उभे राहिले. १९७८ मध्ये आसाम मधील मंगलदोई लोकसभा मतदारसंघाच्या तत्कालीन खासदार हरीलाल पटवारी यांचे आकाली निधन झाले आणि व नवीन लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी तेथे पोटनिवडणूक लागली नी मग झाला आसाम जन आंदोलन चा जन्म , त्यात झाले असे की १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्राम युध्दामुळे मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक आसामात स्थलांतरित (घुसखोर )झाले त्यात मुख्यत बंगाली भाषिक मुस्लिम , आणि ह्या स्थलांतरांची ( घुसखोरांची ) मग नावे स्थानिक मतदार याद्या मध्ये नोंदविली गेली होती परिणाम मूळ आसामी जनतेने त्या विरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि त्यातून सुरु झाले आसूचे (ऑल आसाम स्टुडंट्स युनियन ) आंदोलन मागणी होती की विदेशी घुसखोरांची नावे मतदार याद्यातून काढल्याशिवाय आसाम मध्ये पुढील निवडणुका घेऊ नये ,पण भारतीय कोण आणि बांगलादेशी घुसखोर कोण हे ठरवायचे कसे आणि स्थलांतरित कोणत्या वर्षी भारतात आला त्याचे आधारभूत वर्षे कोणते घ्यायचे १९५१ की १९७१ यासारखे यक्ष प्रश्न होतेच परंतु आसू ची मुख्य मागणीच होती ह्या सर्व घुसखोरांना आसाम बाहेर घालवल्याशिवाय निवडणुकांचं घेऊ नये सकृतदर्शनी हे आंदोलन विद्यार्थ्यांनी गांधीजी च्या विचारसरणी नुसार शांततेच्या मार्गाने चालवलेले आंदोलन होते पण जसा जसा काळ पुढे जात गेला तसे आंदोलनाला वेगवेगळ्या दिशा येत गेल्या उल्फा (युनाइटेड लिब्रेशन फ्रंट ऑफ आसाम ) चा जन्म झाला उल्फा ही अतिरेकी संघटनाच होती . बोडोलँड ची मागणी ,उदयाचल ची मागणी ,आसूंचे रूपांतर आसाम गणो परिषद या पक्षात झालेले रूपांतर आणि स्वतंत्र्य भारताच्या इतिहासात कधी न घडलेली घटना म्हणजे महाविद्यालयाच्या वसतिगृहातून विध्यार्थी सरळ राज्याच्या मंत्रीपदी , मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. श्री .प्रफुल्ल महंतो हे वयाच्या ३३ व्या वर्षी देशातील कोणत्याही संपूर्ण राज्याचे (केंद्रशासित प्रदेशाबाबत वेगळे रेकॉर्ड आहे ) सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. या आणि बऱ्याच राजकीय घडामोडीचा लेखिकेने बिबीसी (ब्रिटिश ब्रॉडकॉस्टिंग कॉर्पोरेशन ),ब्लिटीझ या सारख्या प्रथितयश माध्यमाच्या प्रतिनिधी म्ह्णून मागोवा घेतला या आंदोलनाची दुसरी बाजूही जगासमोर आणणाऱ्या बातम्या दिल्या त्यात नेल्लि येथील नृशंस हत्याकांड स्टुडंट्स टर्न राज्याचे मंत्री मुख्यमंत्री झालेल्या नेत्यांचे वागणे,१९८५ च्या आसाम करारांचे पुढे काय झाले ,खरोखरच आसाम घुसखोर मुक्त झाला का यासारख्या बऱ्याच गोष्टीची या पुस्तकातून माहिती मिळते .
ज्याप्रमाणे ब्रम्हपुत्रेतील माजुली बेटे ब्रम्हपुत्रेच्या प्रवाहाचे दोन प्रवाहात करतात त्याच प्रमाणे लेखिकेचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य हे देखील दोन वेगळे प्रवाहच जरी लेखिका आणि त्यांचे यजमान यांचा प्रेम विवाह होता तरी देखील त्यांना संसार करण्यासाठी ,मुलीच्या शिक्षणासाठी बराच संघर्ष करावा लागला, कारण त्यांचे यजमान दुभंगलेली मनोस्थितिने (स्चीझोफ्रेनियाने ) ग्रस्त होते.हा सर्व विरोधाभास असून देखील लेखिकेने कश्या प्रकारे ह्या सर्व गोष्टी चा सामना केला त्यांच्या एक शिक्षिका ते पूर्वोत्तर भारतातील आंतरराष्ट्रीय माध्यमाचे प्रथम महिला पत्रकार या पर्यंतचा प्रवास म्हणजेच मन गंगेच्या काठावर .
पुस्तक कोणी वाचावे
१. ज्यांना एन आर सी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन ),कॅब (सिटीझन शिप अमेंडमेंट बिल) ,सी ए ए (सिटीझन शिप अमेंडमेंट ऍक्ट ) चे मूळ काय आहे हे आणि त्याची आसामात का सुरवात झालीहे जाणून घ्यायचे आहे त्यांनी
२. बांगलादेशी घुसखोरीची समस्या काय आहे आणि तिचे आसाम शी नाते काय
३.बोडोलँड ची मागणी काय आहे
४.आणि व्यक्तिगत आयुष्यात हरलेल्याची भावना मनात निर्माण झालेली आहे अश्या सर्वानी
हे पुस्तक जरूर वाचावे.
Rajhans Prakashan
#RajhansPrakashan
एम्प्लॉयी रेलेशन्स डेमिस्टीफाइड रिअल लाइफ एक्सपेरियन्सस - जेकब वर्गीस
एम्प्लॉयी रेलेशन्स डेमिस्टीफाइड रिअल लाइफ एक्सपेरियन्सस - जेकब वर्गीस उद्योग धंदा (कारखाना व आस्थापना ) हे विविध विभागांच्या एकत्रित प्रयत्न...
-
फ्रॅक्चरेड फ्रीडम ए प्रिझन मेमॉयर - कोबाद घांदी (Kobad Ghandy ) फेब्रु - २०२१ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर भाष...
-
राडा भाऊ पाध्ये लिखित ही माझ्या वाचनात आलेली दुसरी कादंबरी, १९७५ साली फॉरवर्ड पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या कादंबरीला १९९७ साली जेव्हा ...
-
द लव्हर बॉय ऑफ बहवालपूर - राहुल पंडिता " गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्...







