Sunday, September 19, 2021

भुरा- प्रा शरद बाविस्कर

 


भुरा- प्रा शरद बाविस्कर


उत्तर महाराष्ट्रातील मुख्यत्वे नाशिक जिल्ह्यातील काही तालुके, धुळे, नंदुरबार व जळगाव हे भौगोलिक क्षेत्र अहिराणी भाषिक भाग म्हणून ओळखला जातो .तसा हा भाग सर्व साधारण पणे पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा भाग आहे . त्यामुळे तापी ,गिरणा,पांझरा व कान नद्यांच्या काठाचा गावांचा व जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक तालुक्यांच्या अपवाद वगळता इतर भागात शेती ही सर्वस्वी निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे व शेतीचे उत्पन्न हे अत्यल्प असून कारखानदारी व औद्योगिकीकरण देखील कमी प्रमाणात आहेत . त्यामुळे खाजगी क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकऱ्याची संधी देखील नगण्य प्रमाणात आहेत, त्यामुळे उपजिविकेसाठी व जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही . कदाचित ह्या संघर्षाच्या वृत्तीमुळे अहिराणी भाषिक ( खान्देशी) व्यक्ती देशात व विदेशात विविध क्षेत्रात जबाबदारीच्या पदावर आज विराजमान आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे.


कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याबरोबर त्या पदापर्यंत पोहचण्याचा संघर्ष त्यात आलेल्या अडीअडचणी ,खाच खळगे ,अनिश्चितता यावर मात केलेला हा संघर्ष पूर्ण प्रवास हे इतर सहपथिकांना पथ दर्शक ठरतो तसेच भविष्यात येणाऱ्या अडीअडचणींवर मात करण्यास मार्ग दाखवू शकते . त्यामुळे हा संघर्ष शब्दबद्ध होणे हे फार महत्त्वाचे असते .

भुरा हे आत्मचरित्र ह्याच अहिराणी भाषिक भागातील धुळे जिल्ह्यातील रावेर ह्या छोट्याशा खेड्यातील भुरा प्रवास आहे प्रथम वाचनानंतर मला ढोबळमानाने लेखकांचा हा आत्मचरित्र प्रवास मुख्यतः खालील भागात विस्तारलेला दिसतो .

१. रावेर ता -धुळे ते धुळे


२. धुळे ते लखनौ


३. लखनौ ते दिल्ली ते जे एन यू फ्रेंच विभाग


४. दिल्ली ते युरोप


५. युरोप ते जे एन यु मधील फ़्रेंच विभागात युवा प्राध्यापक 

अगदी थोडक्यात मांडायचे झाले धुळे जिल्ह्यातील गाळण टेकड्या पासून ते उत्तर भारतात दक्षिण अरवलीच्या डोंगर रांगात (व्हाया आल्प्सच्या पर्वतरांगा) स्वतःला घट्ट रोवण्याचा हा प्रवास आहे. जरी वरकरणी बघितला तर प्रवास जगण्याच्या संघर्षात भौगोलिक स्थलांतराचा वाटत असेल तरी त्याला वर्ग संघर्षाची किनार आहे ,समाजशास्त्राचे पैलू आहे व सरते शेवटी तत्वज्ञानाचा व वैचारिक बैठकीचा पाया आहे.

हा सर्व वर्ग संघर्ष नाही रे पासून आहे रे पर्यंतच प्रवास हा सर्व वाचकांना तसेच गावांगावात निश्चल अवस्थेत पडलेल्या भुरांना प्रेरणा देईल आणि त्या सर्व भुरांचा प्रवास शरद पर्यंत होईल यात तिळमात्र शंका नाही

२०१३ मध्ये लोकसत्ता ह्या वृत्तपत्रात प्रत्येक शनिवारी राजधानीवर मराठी मोहोर नावाचे एक सदर यायचे . ह्या सदरात मूळचे महाराष्ट्राच्या विविध भागातील मराठी भाषिक असणारे परंतु कामाधंद्यानिमित्त भारताच्या राजधानीत स्तिरावलेल्या यशस्वी व्यक्तिमत्त्वांचा प्रवास मांडला होता . यात महाराष्ट्राच्या विविध भागातील व्यक्तीमत्वात लोकसत्ताने माझ्या स्मृती प्रमाणे २ खानदेशीय व्यक्त्तींची लोकसत्ताने दखल घेतली होती एक होते पदमभूषण श्री राम सुतार (प्रसिद्ध शिल्पकार ) व दुसऱ्या होत्या श्रीमती अमिता बाविस्कर (लेखिका व प्राध्यापक पर्यावरण ,समाज शास्त्र व मानववंश शास्त्र विभाग ,दिल्ली विद्यापीठ).


आता किंवा येणाऱ्या भविष्यात किंवा कोणी जर अश्या महाराष्ट्रातून भारताच्या राजधानीत स्थलांतरित झालेल्या महाराष्ट्रातील यशस्वी व्यक्तीमत्त्वांचा इतिहास मांडेल त्यावेळी मला विश्वास आहे की तो इतिहास ह्या भूराची (प्रा शरद बाविस्कर ) यांची दखल घेतल्याशिवाय पूर्ण होऊच शकणार नाही.


लिखाणाच्या ओघात पुस्तकात बऱ्याच ठिकाणी काही इंग्लिश व फ्रेंच शब्द आणि वाक्ये आली आहेत तरी त्यांचे सर्व सामान्य वाचकाच्या सोयीसाठी मराठीत भाषांतर पुढील आवृत्तीत उपलब्ध करून द्यावे . या व्यतिरिक्त भुरा हे प्रा.श्री.शरद बाविस्कर यांचे आत्मचरित्र असले तरी त्यात त्याच्या वेगळ्या धाटणीच्या व्यवसायिक कारकिर्दीचा प्रवास आहे . त्यामुळे त्यांच्या पदव्या व त्या पदव्या कोणत्या संस्थातून मिळवल्या यांच्या बद्दल देखील माहिती देण्यात यावी त्यामुळे भुरा हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक करिअर गाईड म्हणून त्यांच्या भविष्याचा निर्णय घेण्यास सहाय्यक ठरेल.  

म्हणूनच सर्वांनी गावातील कच्ची वडांग पासून ते झिजीन मरानं ,पण थिजीन नहीं मरानं ह्या जीवनाचा संदेश देणारे भुरा हे आत्मचरित्र जरूर वाचावे .  



Saturday, September 4, 2021

द लव्हर बॉय ऑफ बहवालपूर


 लव्हर बॉय ऑफ बहवालपूर   -राहुल पंडिता 

 

"गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त"  अमिर खुसरो च्या या पंक्ती वाचल्या तर एव्हाना सर्वांना भारतातील नव्हे जगातील स्वर्ग असणाऱ्या जम्मू काश्मिर ची आठवण जरूर झाली असणार ,पण भारताचे हे नंदनवन खरोखरच नंदनवन आहे की शापित नंदनवन आहे.

हे नंदनवन का शापित आहे त्याची कारण मीमांसा विविध अंगाने होऊ शकते . पण आजच्या पुस्तकाचा विषय काश्मिरात कायम अशांतता माजवण्यासाठी अहोरात्र चालविण्यात येणारे अतिरेकी कारवाया पैकीच २०१९ साली लेथपुरा (Lethpora) जिल्हा पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ( सि आर पी एफ ) वाहन ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची कहाणी आहे .

१९९० नंतर काश्मिरात अतिरेकी कारवायात लक्षणीय वाढ झाली त्याचा परिणाम म्हणून काश्मिर खोऱ्यातील  पंडित (काश्मीर खोरे -ज्यात १० जिल्हे आणि १५००० चौ किमी भूभाग येतो ) हे विस्थापित झाले . त्या काळात जे काही काश्मिरी पंडितांचे स्थलांतरण झाले ते कलाशिकानोव्हच्या (एके -४७ रायफली ) जोरावर घडवून आणण्यात आलेले . त्या काळात अतिरेकी कारवायांनी अगदी कळस गाठला होता भारताच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कन्येचे देखील ह्या अतिरेक्यांनी अपहरण केले होते . परंतु तदनंतर गेल्या  दशकांत काश्मिरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले .भारतीय भूमीवर काही राज्याच्या अपवाद वगळता बऱ्याच राज्यात देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न भूतकाळात होते आणि  काही राज्यात अजूनही आहेत त्यात बऱ्याच आंतरराष्ट्रीय शक्ती , शेजारील शत्रू राष्ट्रे सहभागी आहेत आणि त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे.अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानात बऱ्याच प्रकारचे (मानवी बॉम्ब , कार बॉम्ब .) आत्मघातकी हल्ले भूतकाळात झालेत .या आत्मघातकी अतिरेकी हल्ल्यात भारताच्या माजी पंतप्रधानांना पण त्यांचे प्राण गमवावे लागले .

तसा जम्मू काश्मिरात आत्मघातकी हल्ला हा प्रकार नवीन नाही किंबहुना २०१९ चा पुलवामा हल्ला घडण्याच्या अगोदर असे हल्ले झालेच नाहीत असेही नाही .२००१ मध्ये जैश  मोहंमद ह्या अतिरेकी संघटनने श्रीनगर मध्ये जम्मू काश्मीर च्या जुन्या विधान भवनावर स्फोटकांनी भरलेली सुमो कार द्वारे मोठा आत्मघातकी हल्ला घडवला होता . त्यात ३८ नागरिक मृत पावली होती . त्या हल्ल्याचे मास्टर माईंड तसेच हल्लेखोर हे पाकिस्तानी नागरिक होते .

लेखकाच्या पुस्तकातील निवेदनाप्रमाणे काश्मीरी व्यक्ती तसा खूप धाडसी वा आक्रमक नसतो . कारण पुलवामा हल्ल्यात हल्लेखोर वाचण्याची काडी मात्र शंका नव्हती . पण पुलवामा हल्ल्याच्या हल्लेखोर (ज्याने प्रत्यक्ष स्फोटकांनी भरलेली कार सी आर पी एफ च्या ताफ्याला जावून धडकवली ) हा भारतीय होता . .

१९८९-९० च्या अतिरेकी कारवाया पराकोटीला पोहचल्या होत्या बऱ्याच जणांना काश्मीर हा भारताच्या ताब्यातून जाणार ही शक्यता वाटायला लागली होती . त्याच स्वरूपाचे काहीशी अनिश्चितता ही काश्मीर खोऱ्यात २०१६ च्या जुलै महिन्यात आली होती . इंटरनेट वरील समाज माध्यमे (फेसबुकयुट्युब ,  इतरभारतातील इतर भागात रुजून तरुणाई ला आकर्षित करत होती आणि  तरुणाईचे  आयडॉल या माध्यमातून निर्माण व्हायला लागली होती . अनियमित  विस्कळीत इंटरनेट सेवा असून पण काश्मिर ची तरुणाई ही यात कोठेही मागे नव्हती . काश्मीरी अतिरेक्यांच्या पटलावर बुरहान वानी ह्या हिजबुल मुजाहिद्दीन ह्या अतिरेकी संघटनेच्या नवीन तरुण अतिरेक्यांचा उदय होत होता आणि त्याची मोडस ओपरेंडी ही परंपरागत अतिरेक्यापेक्षा काहीशी वेगळी होती.त्याने समाज माध्यम तून (फेसबुक   युट्युब द्वारे  ) प्रसिध्दी मिळवायला सुरुवात केली होती आणि त्याचा एक फॅन फॉलोवर वर्ग काश्मीर खोऱ्यात तयार झाला होता.  त्या प्रसिद्धीच्या परमोच बिंदू वर असताना ०८-जुलै -२०१६ ला तो एका लष्करी कारवाईत मारला गेला . त्या नंतर काश्मिरात हिंसेचा एक आग डोंब उमळला होता .लष्करी पथके ,अर्धसैनिक दले यांच्या वरील दगडफेकी च्या कारवायात लक्षणीय वाढ झाली होती . तदनंतरच्या हिंसाचारात १०० हून अधिक माणसे मृत्यू मुखी पडली तर १५००० माणसे जखमी झाली होती .

बुऱ्हान वानी च्या खात्म्यानंतर काश्मिरात आत्मघातकी हल्ल्याच्या घटना ह्या घडतंच होत्या मधल्या काळात उरी हल्ला आणि त्याचे प्रतिउत्तर ही भारतीय संरक्षक दलांनी दिले होते . उरी हल्ल्याच्या सर्जिकल स्ट्राइकवर अगदी सिनेमा पण येउन गेला होता . परंतु २०१९ चा सी आर पी एफ च्या ताफ्यावर जो आत्मघातकी हल्ला झाला तो इतका भयंकर आणि भीषण होता की अगदी ४० जवानाच्या शरीराच्या चिंध्या झाल्या होत्या आणि अवयव हे घटनेच्या संपूर्ण परिसरात विखुरले गेले होते . ज्या वाहनात स्फोटके भरून धडकवण्यात आले होते ते वाहन अगदी चक्काचूर झाले  त्यामुळे ह्या हल्लयांचे गूढ उकलने हे एनआयए ह्या तपास यंत्रणे समोरील एक मोठे आव्हान होते .

वरील सर्व आव्हान तपास यंत्रणेनं कसे पेललेले एनआयए चे कोण निष्णात अधिकारी होते की ज्यांनी घटनास्थळापासून काही अंतरावर मिळलेल्या एका किल्ली आणि अंगठ्याच्या साह्याने ह्या सर्व हल्ल्याचे गूढ उकलून काढलेप्रस्तुत पुस्तक अगदी आपणास गाझी बाबा (२००१ साली भारतीय ससंद भवनावर झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड ) याचा संरक्षक दलांनी कसा खात्मा केलाश्रीनगर मध्ये अतिरेक्यांना लपण्यासाठी कश्याप्रकारची भूलभुलैया रचना असणारी घरा अंतर्गत  गुप्त रचना असलेल्या जागा निर्माण केल्या जातात . याउपर वरील सर्व हल्ल्यासाठी आत्मघातकी हल्ल्यासाठी हल्लेखोरांची निवड कशी करण्यात आली . ह्या सर्व हल्ल्याच्या घटनेत वापरण्यात आलेला मोबाइल फोन हा ह्या हल्ल्याच्या ऑपेरेटरचे आदेश असूनही नष्ट करण्यात आला नाही  आणि तो मोबाइल संच तपास यंत्रणेला कसा मिळाला आणि त्यात तपास यंत्रणांना काय मिळाले,सर्व भारतीयाचा आवडता असा चर्चेचा मुद्दा बालाकोट सर्जिकल स्ट्राइक (ज्या वरून नंतर बरेच राजकारण ही रंगले ) ह्या आणि अजून सर्व तपशीलासाठी प्रस्तुत पुस्तक वाचणे हे जरुरीचे आहे .

 

हे पुस्तक २०१९ च्या सी आर पी एफ दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचे आणि तदनंतरच्या तपासाचे तसेच हल्ल्याच्या पार्श्वभूमीचे  त्या संबंधीच्या घटनांच्या बाबतीत एक निश्चित महत्वपूर्ण दस्तऐवज आहे यात काडी मात्र शंका नाही आणि असायचे काही कारण ही नाही . परंतु ह्या वेळी पुस्तक परिचय लिहिण्याच्या अगोदर मी पुस्तकाच्या लेखकाच्या बऱ्याच मुलाखती मी विविध समाज माध्यमात ऐकल्यात त्याच मुलाखतीतील एक स्मरणीय मुलाखत ही  वायर ह्या वाहिनीचे पत्रकार श्री करण थापर यांनी घेतलेली मुलाखत त्यांच्या ह्या पुस्तकाबद्दलच्या केलेल्या खालील विधानामुळे जास्त स्मरणात राहिली

Pandita has an incredible story to tell which some may find hard to believe. Others may be sceptical [...] But there will also be many who will accept Pandita’s detailed story

वरील करण थापर यांच्या विधानाचा स्वैर मराठी अनुवाद

पंडिताची (राहुल पंडितांची ) एक अविश्वसनीय कथा आहे ज्यावर काहींना विश्वास ठेवणे कठीण वाटेलइतरांना शंका असू शकते [...] पण असे बरेच लोक असतील जे पंडितांची तपशीलवार कथा स्वीकारतील 

राहुल पंडिता हे मुक्त पत्रकार असून त्यांचे हॅलो बस्तर (नक्षलवाद ) ,आवर मून हॅज ब्लड क्लाट्स (काश्मीर आणि काश्मिरी पंडित ) ही पुस्तके देखील वाचनीय आहे
  


 

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...