Thursday, April 28, 2022

मास्तरांची सावली


मास्तरांची सावली

जसा एच आर झालो तसा का कोण जाणे गिरणगाव, लालबाग परळ आणि तेथील गिरणी कामगार यांचा इतिहास याच्या प्रेमात पडलो. एच आर मधील आय आर आणि कामगार कायदे (औद्योगिक संबंध)हा माझा आवडता प्रांत आणि माझ्या समजुती प्रमाणे मुंबईतील कापड गिरण्याच्या नियमनासाठी कामगार कायदे आले .पुढे कामगारांनी त्यांच्या हक्कासाठी लढे उभे केल्या , कामगार संघटना , कामगार चळवळी उभ्या राहिल्या त्यामुळे आय आर ,कामगार कायदे मुळापासून समजून घेण्यासाठी मी सदैव त्या संबधित पुस्तकाच्या शोधत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून गुगल वर सदैव कामगार ,कामगार संघटना,कामगार कायदे कापड गिरण्या ,लालबाग परळ हे  शब्द टाकायचे आणि त्या संबंधीची पुस्तके, माहिती,डॉकमेन्ट्रीज  शोधत राहायच्या हा जणू दिनक्रमच झाला आहे .

एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शन मध्यंतरी  त्यांच्या मुलाखतीत बोलले होते की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. त्याच प्रमाणे  तत्कालीन साहित्य कविता ,गाणी ,कादंबऱ्या ,चरित्र ,आत्मचरित्रे ,चित्रपट ,नाटके  हे सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा इतिहास यातून डोकावत असतो . याच शोधात असतानां २०१७ ला कवी कै नारायण सुर्वे यांच्या कामगार आहे मी, तळपती तलवार आहे ह्या कवितेच्या खालील ओळी वाचण्यात आल्या

रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे,

तसा नारायण सुर्वे यांचे यांचे साहित्य न वाचता पण त्यांच्या डाव्या विचारसरणीशी असलेल्या बांधिलकी मुळे गिरण कामगार हा विषय वाचताना विविध ठिकाणी त्यांच्या  लिखाणाचा संदर्भ येत होता व त्या त्या वेळी तत्यांचे ते साहित्य वाचून संपवले पण त्यांच्या चरित्राचा शोध सुरुच होतो . २-३ वर्षांपूर्वी गूगल मंथनातून "मास्तरांची सावली "वर आले होते विकत घेऊन वाचायला मुहूर्त लागत नव्हता . शेवटी २०२२ च्या विश्व पुस्तक दिनी ते संग्रही आले आणि आल्या आल्या एका दमात संपवून टाकले.

मास्तरांची सावली हे कृष्णाबाई नारायण सुर्वे लिखित आत्मकथन हे कहाणी आहे किशा आणि तिच्या मास्तरांची .

किशा ही अशिक्षित, मंगलदास चाळीत राहणाऱ्या  मिल मध्ये काम करणाऱ्या कामगार दांपत्याची एकुलती एक मुलगी तिच्या समजुती प्रमाणे एके दिवशी कोणी तरी मूठ मारली आणि तिचे वडील हे जग सोडून गेले व वडिलांच्या पाठोपाठ इज्जतीला बट्टा लागू नये म्हणून आईने विषारी फळ खाऊन आत्महत्या केली. हे दोन्ही आघात किशाच्या न कळत्या वयात घडले की अगदी तिला तिच्या जन्मदात्याचे चेहरे पण आठवत नाहीत .ह्या अनाथ किशाचा सांभाळ तिच्या वडिलांच्या आई ने अगदी कष्टपूर्वक केला स्वतः  किशाने वयाच्या आठव्या वर्षापासून धुणी भांडी व मोलमजुरी करून आजी ला हातभार लावत होतीच .

अगदी ह्याच किशा सोबत तिचे मास्तर ही मंगलदास चाळीत वाढत होते . तिचे मास्तर म्हणजे गंगाराम सुर्वे ह्या वुलन मिल मध्ये काम करणाऱ्या मिल कामगाराने रस्त्यावरून उचलून आणलेले मुलगा जशी किशा वयाने वाढत होती तशी तिचे मास्तर हे ह्याच चाळीत वाढत . मास्तर म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते अगदी पूर्ण गिरणगाव  चळवळीचे पत्रके लावणे ,प्रौढ साक्षरता वर्ग घेणं ,सभेत भाषणे देणे अशी सर्व उद्योग मास्तर करत असत (त्या वेळी मास्तर फक्त तिसरी शिकले होते). अश्याच एका प्रौढ साक्षरता वर्गात किशाची आणि मास्तरांची भेट झाली आणि कालांतराने एकमेकांच्या प्रेमाचे बंध घट्ट होत गेले.

मास्तर हे रस्त्यावर सापडलेले पोर त्यामुळे त्याच्या जाती पातीचा काही ठाव ठिकाणा नव्हता आणि ही गोष्ट किशाच्या चुलत्यांना खटकायची आणि त्याच्या ह्या प्रेमाला विरोध होता . त्यामुळे एके दिवशी दोघांनी रजिस्टर पद्धतीने कोर्टात जाऊन विवाह उरकून टाकला त्यानंतर सुरु झाले दोघांच्या संसाराचे दशावतार कारण ह्या विवाहाला किशाच्या चुलत्यांचा विरोध ह्या चुलत्यांच्या भीती मुळे मास्तरांचे वडील आपली चाळीतील खोली सोडून गावाकडे निघून आणि लग्नाच्या पहिल्याच दिवशी दोघांच्या डोक्यावरचे छप्पर गेले आणि हे संसाराचे भोगभोगत आणि आलेल्या संकटाशी दोन हात करत कधी फूट पाथ वर,कधी झोपडीत तर कधी घाणीने बरबटलेल्या अंधाऱ्या चाळीत त्यांचा संसार उमलत पण गेला . 

त्या संकटाच्या काळात एका कम्युनिस्ट चळवळीतील शिक्षण विभागातील असणाऱ्या  एका महिला अधिकाऱ्यांना किशाला आणि मास्तरांना महानगर पालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून कामाला लावले व दोघांच्या आयुष्यात स्थिरता आणली पण दोघांच्या संसाराचा मार्ग हा काट्या कुट्यांनी भरलेला होता . दरम्यानच्या काळात त्यांच्या ह्या संसाररूपी वेलावर फुले ही उमलू लागली होती . पहिल्या अपत्यासोबत मास्तर सातवीची परीक्षा देऊन खरेखुरे शाळा मास्तर (शिक्षक )झाले .आणि उत्त्तरोउत्तर मास्तर एक साहित्यिक म्हणून नावा रुपाला आले की अगदी ते कुसुमाग्रजांचे मानस पुत्र झाले .

पण किशा चा संघर्ष काही संपला नाही उलट तो  उत्त्तरोउत्तर अगदी गडद होत गेला एका बाजूला शिपायांची नोकरी तर दुसऱ्या बाजूला घरात मुलांची व्यसनाधीनता आणि त्यात अगदी कमी वयात दोघे कर्त्या मुलांचे आणि सुनांच्या मृत्यू पचविण्याचे दुखत प्रसंग ही आले .ह्यात भर कमी कि काय तिचे जीवापाड प्रेम असणारे मास्तर ही तिला एकाकी सोडून गेले .

किशा तिच्या मास्तरांसाठी लिहते त्या प्रमाणे "शेवटी मृत्यू हा अटळच आहे, पण तो असा आजारीरुपात येऊ नये, आनंदात हसत हसत यावा. तुम्हांलाही आणि मलाही. म्हणूनच फक्त तुम्हांला ज्या गोष्टींत आनंद मिळतोय त्या गोष्टी मीही आनंदानं करीन. कारण मला पैसा, दौलत काहीच नकोय. फक्त माझ्या मास्तरांचं कर्तृत्व त्यांच्या मागेही समाजात राहावं, एवढीच माझी इच्छा आहे. बाकी मी तुमच्यासोबतच तुमची सावली म्हणूनच राहणार, आणि तुमचीही सावली माझ्यावर सतत राहू दे. बाकी मला काहीही नको."

कोण होती किशा कोण होते तीचे मास्तर आणि त्यांचे असे काय कर्तृत्व समाजात राहिले या सर्वासाठी जरूर वाचा "मास्तरांची सावली "
 

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...