Tuesday, October 17, 2023

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी

स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस्क्रिप्शन नुकतेच संपले होते व मिर्झापूरच्या मुन्ना सारखे सोनी लिव्ह च्या सबस्क्रिप्शन विषयी "ऐसा मतलब immediate नही सोचे हैं but सोचेंगे" म्हणून रीन्यू करायचे टाळत होतो. पण टाळले गेले नाही तस सोनी लिव्ह पहिल्यांदा घेतले ते स्कॅम् १९९२ ही वेब सिरीज बघण्यासाठी त्यानंतर तनाव आणि जेहानाबाद वगळता खूप काही चांगले कंटेंट बघायला मिळाले नाही असो, आता वेब सिरीज बघितली मग दुधाची तहान ताकावर भागवू असे काही मला पटत नाही केली सुरुवात सीरिज ची कुळ, मुळ शोधायला सुरुवात केली ह्या शोधात पत्रकार श्री संजय सिंह यांची मटा यूट्यूब वाहिनीवरील मुलाखत बघितली व तेव्हा तेलगी एक रिपोर्टर की डायरी ह्या पुस्तकाविषयी माहिती समजली मग घेतलं पुस्तक आणि वाचून काढलं.

ब्रिटिश टाईम में भी होता था अभी भी हो रहा हैं आगे भी होगा "only persons have changed business has same" हे वाक्य आहे अब्दुल करीम लाडसाहब तेलगी याचे (यूट्यूब उपलब्ध आहे) आता तेलगी हे वाक्य म्हणाला म्हणजे पूर्वी पासून स्टॅम्प छापायला सर्वांना परवानगी होती याचा मी इतिहासात शोध घ्यायचा प्रयत्न केला मला स्टॅम्प विषयी काही सापडले नाही पण चलनाविषयी (Currency ) मला एक नाव सापडले ते होते मोहम्मद बिन तुघलक ह्याच्या काळात लोकांनी घरोघरी टांकसाळ उघडल्या होत्या म्हणजे पैसे घरीच छापत होती कारण त्याने सोन्या चांदीच्या ऐवजी कास्यांची नाणी पाडली होती (त्याच्या काळात सोन्या चांदी ची टंचाई झाली होती).


आता ह्याचा आणि पुस्तकाचा आणि सीरिज चा काय संबंध तर अब्दुल करीम लाडसाहब तेलगी ह्याने खरेखुरे स्टॅम्प पेपर छापायला सुरुवात केली आणि त्याने इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक जिथे देशातील सर्व स्टॅम्प पेपर छापले जातात त्या प्रेस समांतर अशी स्वतची प्रेस सुरु केली आणि कोट्यवधी ची माया कमावली आणि भारतातील घोटाळ्यांच्या मालिकेतला एक मोठा घोटाळा घडवला किती मोठा तर हा घोटाळा तर

तेलगी एक रिपोर्टर की डायरी ह्यात श्री संजय सिंग यांनी लिहिल्या प्रमाणे 

इंडिया में तमाम तरह के फर्जी कागजात के घोटाले होंगे और उनके आंकड़े भी लाखों करोड़ों को छू लेंगे, मगर तेलगी जैसा कोई घोटाला फिर नहीं होगा, जहां असली मशीन और असली ब्लॉक से स्टैंप छापे गए | तेलगी के उन्हीं स्टैंप पर हुई लाखों डील्स, सौदे ,संपत्ति की खरीद, एफिडेविट आदि अस्तित्व में है और उन सबको गैरकानूनी या गैरमान्य नहीं करार दिया गया | यानी तेलगी स्कैम की निशानियां हमेशा करोड़ों लोगों की लाइफ में रहेगी और उनको कभी नहीं पता चलेगा कि कौन से काम तेलगी के स्टैंप पेपर पर हुए हैं और कौन से सरकारी वाले पर दोनों को बीच में फर्क ढूंढना उतना ही मुश्किल है जितना की

"भालू के शरीर में झांट ढूंढना।"

बाकी सर्व वाचण्यासाठी तेलगी एक रिपोर्टर की डायरी हे पुस्तक वाचा मूळ पुस्तक हिंदी भाषेत असल्यामुळे मी हिंदी भाषेतच वाचले याव्यतिरिक्त मराठी, इंग्लिश मधील अनुवाद देखील उपलब्ध आहे आणि सीरिज पेक्षा पुस्तक जास्त सरस आहे.




Wednesday, June 28, 2023

श्रमिकांच्या अनोख्या जगात विवेक पटवर्धन

 


श्रमिकांच्या अनोख्या जगात विवेक पटवर्धन

श्रम म्हणजे काय ? कोण श्रमिक ? वर्ग म्हणजे काय ? आणि तो वर्गवादाचा संघर्ष म्हणजे काय ?

वरील सर्व आसपास असतात पण जवळपास नसतात मध्येच श्रमिकांच्या अनोख्या जगात सारखे पुस्तक येते आणि विचार करायला भाग पाडते .

श्रमिकांच्या अनोख्या जगात ह्या पुस्तकात श्री विवेक पटवर्धन यांनी  एचआर आयआर क्षेत्रातील अनेक वर्षाच्या अनुभवाची पोतडी खोलत त्यांचा भूतकाळातील भोवतालाचा पट मांडताना उद्योग विश्वाच्या कामगार व व्यवस्थापन संबंधाच्या वर्तमानाचा लेखाजोखा मांडला आहे.

कायमस्वरूपी कामगार किंवा सर्वसामान्याच्या भाषेत एखाद्या नोकरीत कायम होणे (Permanent) हे दुर्मिळ असले तरी कुठल्याही औद्योगिक वसाहतीत अपवाद वगळता कारखाने बंद पडल्याचे ऐकवित नाही मग हे सर्व कारखाने त्याचे उत्पादन कसे तयार करतात आणि कोण ह्या कारखान्यात कामगार म्हणून काम करतात व कायम न करता उत्पादकता कशी सुरळीत ठेवली जाते व त्यासाठी समाजातील कोणत्या घटकांचा बळी जातो आणि माणूस म्हणून जगताना आवश्यक असणाऱ्या सुविधापासून वंचित राहतात किँवा ठेवले जातात हे उदाहरण देऊन मांडले आहे .

हे पुस्तक ४ भागात विभागले आहे त्या ४ भागापैकी बिल हे वूड (अमेरिकेतील कामगार नेते ) चे कोडे ह्या भागात त्यांनी कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात होणाऱ्या वेतन करारांची ,कंत्राटी व हंगामी कामगार व त्यांचे वेतन तसेच काम मिळण्यातील अनियमितता आणि वेतनाचा दर ,अचानक बंद पडलेल्या कारखान्यामुळे कामगारांवर पडलेली बेकारीची कुऱ्हाड ,पिरंगुट मध्ये १८ महिला कर्मचाऱ्याचे प्राण घेणाऱ्या आगीची घटना बाबत लिखाण केले आहे हा भाग एचआर म्हणून काम करताना खूप अंतर्मुख करते. 

पुस्तक लिहिताना त्यांनी उद्योग जगतातील औद्योगिक संबंधाची फक्त नकारात्मक बाजू न मांडता जिथे सी ई ओ च्या व्यक्तिगत तत्त्वावर ए आर धोरण ठरतात ह्या प्रकरणात श्री रामकृष्ण एक्सपोर्ट प्रा लि चे मालक श्री गोविंद काका यांनी त्यांच्या संस्थेत केलेल्या सकारात्मक बदलाची माहितीपण देतात तसेच बॉश ,चाकण, ASAL भोसरी ,थरमॅक्स या संस्थेतील कामगार संघटनांनी पारंपरिक कामगार संघटना पेक्षा संघटनेतील सदस्यासाठी व कंपनी साठी केलेल्या सकारात्मक प्रयोगाची ही त्यांनी तपशिलाने नोंद घेतली आहे.

पुस्तकाचा शेवटच्या भाग वाचताना मला पी साईनाथ यांच्या विदर्भातील शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरील निरो ज् गेस्ट ह्या प्रसिद्ध डॉक्युमेंटरी मधील पी साईनाथ यांनी उपस्थितांना व व्यवस्थेला प्रश्न विचारला आहे "Who is Nero's Guest " आणि अगतिक पणे उत्तर ही दिले आहे "We all are Nero's Guest". कदाचित विवेक सरांना उद्योग विश्वातील कामगार विषयाशी संबंधित स्टेकहोल्डर्स ला (Stakeholders) पुस्तकाद्वारे हाच प्रश्न तर विचारायचा असेल का ?

श्रमिकांच्या अनोख्या जगात ह्या पुस्तकांचे लेखक श्री विवेक पटवर्धन हे एशियन पेंट्स ह्या संस्थेच्या एच आर हेड या पदावरून निवृत्त असून विवेकस वर्ल्ड (www.vivekvsp.com) ह्या ब्लॉग द्वारे नियमित त्यांचे लेख प्रकशित होत असतात. कधीतरी एचआर आय आर बद्दल वाचताना विवेक सरांचा ब्लॉग वाचनात आला व नियमित त्यांचा ब्लॉग वाचायला सुरवात केली सुरुवातीला ब्लॉग वाचताना असे वाटायचे की सरांचे लिखाण हे युनियनच्या किंवा कामगारांच्या बाजूने झुकणारे होते आणि दुसरी बाजू समजावून न घेता मी आपल मत बनवून टाकले कि माणूस सेवानिवृत्त झाला की ज्या व्यवस्थेचा प्रतिनिधी म्हणून काम करतो तिच्या विरुद्ध बोलायला सुरवात करतो (नोटीस पिरियड असणारा कर्मचारी जसे खुले पणाने बोलू लागतो तसे ). 

पण मला सरांची बाजू पुण्यात सदर पुस्तकांचे प्रकाशन सोहळ्यात कळली कि सर एशियन पेंट्स मध्ये कार्यरत असताना एशियन पेंट्सच्या भांडुप कारखान्यात "तुतारी" (मालकाने स्वतःच्या कामगाराच्या शिक्षणासाठी चालवले मासिक) या मासिकाचे संपादक होते आणि त्यांना जो जैसा है वैसा मांडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य के राजगोपालचारी साहेबांनी त्यांना दिले होते त्यामुळे सरांचे लिखाणाची शैली ही वास्तववादी होत गेली.कदाचित एशियन पेंट्स मधील ह्या Open Culture जडणघडणी मुळे आजही ते तेवढयाच परखडपणे लिहू शकतात असे मला वाटते.

( कोण होते Nero's Guest हे पुढील लिंक द्वारे वाचू शकतात https://acrazymindseye.wordpress.com/2012/02/13/being-a-guest-at-neros-party/)


Sunday, December 18, 2022

दाल गंडोरी-चाल जाऊ आपला देस ले

 

दाल गंडोरी-चाल जाऊ आपला देस ले
जवय हाऊ मोबाईल फोने सणे जमारा नव्हथा तवय म्हना खानदेस मधल्या सासुरवाश्या मायबहिणी आया बाया दर सने सुदे नी दिवाई ,आखाजीना टाइमले घर म्होरला कावळा कडे डोळा लाई बशेल ऱ्हाये तो कावया कोकायना की त्या आया बाया अंदाज बांधेत का आज सकाय मा तिले लेवाले मुराई यी आन ती माहेरले जाई सन मसालानी नही ते साधी खिसडी खाई .....
अम्हणी अहिराणी बोली मा खिचडी ले खिसडी म्हणतेस रोज संध्याकाळे तुम्हीन जर खानदेसना गावो गाव न्या गल्ल्यास मा भवडी उनात ते ह्या खिसडी वास सरशे तुम्हान पोट भरी जाई .हाई खिसडी खानदेसना लोके गहिरी आवडी आवडी खातास ह्या खिसडी चर्चा इतली शे का ती खानदेस ना गा गीतेस मा बी यी लागेल शे म्हणून श्री अशोक भाऊ कोतवाल यासना दाल गंडोरी ह्या पुस्तकं म्हाईन मे ते गीत खास तुम्हांना साठे आठे अन शे
मन्हा खानदेसमझार,केई ,कपासी ना खेते
नही तांदुईना दाना ,भात खिसाडीना साठे
आंडेर (लेक) उनी माहेरले ,रांधू घाऱ्या आनी पुऱ्या
तोंड लावले शिजाडू ,मुंग चवयीन्या घुगऱ्या
ईन जवाई लेवाले ,तवय तांदूई लयसू
दूध मलईनी खीर ,भज्या ,गुलगुल्या तयसु ….
वरील गीतात एक स्त्री सांगते आहे कि खान्देशात कपाशी ,केळी महामूर पिकते पण खिचडी साठी डोळ्यांना तांदुळाचा दाणा दिसत नाही . मुलगी माहेरला आली तर तिला मूग ,चवळीच्या घुगऱ्या खाऊ घालाव्या लागतात . जेव्हा जावई न्यायला येईल तेव्हा मी बाजारातून तांदूळ आणून त्याच्यासाठी दूध मलईची खीर बनवीन . अशी गरीबी तरी आलोखी पण तांदुळाचा तुडवडा त्या काळी होता . अर्थात नंतर तांदुळाचे भरघोस उत्पन्न संध्याकाळी खिचडी करून खाणे ही पर्वणीच समजली जाऊ लागली आणि खान्देशात खिचडीची लाटाच आली ,असं म्हटलं तर वावगं ठरू नये !
पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत नमूद केल्या प्रमाणे खानदेशी माणसाच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या खानदेशी स्त्रियांच्या चवदायी हातांना .... हे पुस्तक अर्पण करण्यात आले आहे त्याचं सुगरणीने एखादा खाद्य पदार्थ शेवट्याच्या क्षणी उपलब्ध असणाऱ्या जिन्नस सामानातून कसा जन्माला घातला व आयडिआ करून भुकेल्याच्या भूकेचा सयड्या कसा मारला याच्या कथा ,किस्से खुमासदार पद्धतीने संपूर्ण पुस्तकांत पेरलेल्या आहेत जे वाचकांची प्रत्येक कथेबरोबर पुस्तक वाचनाची भूकही ही वाढवता आणि पुस्तक पूर्ण वाचून करून बौद्धिक भूक तृप्तीचा आनंदी ढेकर देण्यास भाग पाडतात.
भारतात दर सव्वा कोसांवर भाषा बदलते असे म्हटले जाते आणि त्या भाषेबरोबरच मग राहणीमान व खाद्य संस्कृतीही ही बहरते . त्या खाद्यसंस्कृतीच्या बहरण्याला त्या परिसरातील जमीन ,हवा, पाणीचा पीक पद्धतीची भूमिका फार महत्वपूर्ण असते.अशीच अहिराणी भाषे सोबत खानदेशी जमीन ,हवा ,पाणी आणि पीक पद्धती वैशिष्ट्य पूर्ण आहे . ह्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्य संस्कृतीतून श्री अशोक कोतवाल यांनी दाल गंडोरी ह्या कथा संग्रहाद्वारे ११ वेगवेगळ्या खानदेशी खाद्य व्यंजनाची व खानदेशी माणसाच्या अगत्याची ओळख करून दिली.
शिक्षण ,काम धंदा ना निमित खाल तुम्हण आम्हण गाव सुटणं कुठं यी लागनूत ह्या दूर देस ले आते काम ना व्याप ना पायरे आठून काई निघणं होत ,पन तीन्ही सांजा झायात का मन काहि आठे ठेरत नही ते निघंस मंग भवडाले गाव वर सोडी येईल वावरे शिवरेस मा ,जास गव्हाणनी खुट्टाले बांधेल ढोरे ढाकरे स मा , गावना मारोती , म्हसोबानं ,आया माउलीसनी ना पार वर जर तुम्हले बी ह्या यादा येती व्हतीन ते उठा तुम्हणी निंघा गावकडे आन जर तुम्हनी लाडी नशी जर शी येत
तिले समजाडा साठे ह्या दोन ओळी म्हनाले चुकू नका
उठ वो लाडी नेस वो साडी
चाल जाऊ आपला देस ले
लाडीस ले बी सांगणे शे तुम्हना लाड्या न मन कायी मोडू नका नी ख़ुशी सांगा
चाल रे लाडा येस मी आते
चाल जाऊ आपला देस ले ..... ।।
म्हनीसन श्री अशोक कोतवाल यासनी मराठी साहित्य ना चुल्हा मांडीशीन त्यानं वर जी दाल गंडोरी शिजाडेल शे अन पुस्तक ना रूप मा तुम्हांना आम्हना म्होरे वाढेल शे ते बठ्ठा सनी वाचो व त्या मा देईल सर्वा पाककृती आपला घर मा बनाडी आपला अजु बाजु ना स ले चुल्हा ले निवतं दी सन खावाडो व खुस होवोत हाई आपलें हात जोडी इनंती शे !!!

Saturday, November 26, 2022

अंतर्यामी खजुराहो


 अंतर्यामी खजुराहो

ऐतिहासिक कादंबऱ्या वगळता,कादंबरी,कथा आणिकविता संग्रह हासाहित्य प्रकार आजपर्यंत मी जे काही थोडं फार वाचतो त्या वाचन सवयीतून दुर्लक्षित असलेला किंवा कटाक्षाने टाळलेला साहित्य प्रकार होता .अगदी शाळेत इसापनीतीच्या चातुर्य कथा- आणि बिरबल अकबराच्या कथा चे वाचन वगळता ,कथासंग्रह हा साहित्य प्रकार माझ्या वाचनात दुर्लक्षितच आहे. परंतु गेल्या एक दोन वर्षात वाचन करत असताना सातत्याने वाचनात कथासंग्रहआणि कादंबरींचे उल्लेख हे मला ठळकपण जाणवू लागले व त्यामुळे कै.भाऊ पाध्ये व कै.जयंत पवार यांच्या लिखाणाशी थोड्याफार प्रमाणात ओळख झाली . किंबहुना म्हणूनच मी चरित्र ,आत्मचरित्र ह्या वास्तववादी साहित्य प्रकाराकडून कथा, कादंबरी सारख्या लेखकाच्या प्रचंड अश्या कल्पनाशक्ती व सृजनातून निर्मिलेला साहित्य प्रकार प्रयत्नपूर्वक वाचतोय.
अशाच कादंबऱ्या धुंडाळताना मला गोपाळ आजगावकर यांची अंतर्यामी खजुराहो ही कादंबरीअगदी अनपेक्षित रित्या गवसली . मुळात वाचन करताना मी बहुतांश वेळा ते उद्देश ठेवून वाचत असतो आणि वाचनाचे विषय हे कामगार आणि औद्योगिकक्षेत्रा संबंधित जास्त असतात . त्यामुळे जेव्हा ह्या कादंबरी संबधी माहिती वाचताना मुंबईतील गिरणीकामगाराचा संप हा शब्द दिसताच विकत घेतली आणि अधाश्या सारखी वाचून काढली.
मुळात मानवी मन हे भूतकाळात जास्त रमते त्यामुळेच आजकाल आपण सर्व गोष्टी ह्या रेट्रो (retro ) स्वरुपाच्या शोधत असतो .म्हणूनच आजकाल कपडेलत्ते,राहणीमान किंवा वाहनाच्या डिझाइन (Design ) ही ह्या परत ६०-७० च्या दशकाकडे पुन्हा एकदा झुकू लागल्या आहेत. History is cyclical असा वैचारिक प्रवाद देखील आहे.
प्रा. हरिश्चंद्र थोरात यांनी ब्लर्बमध्ये कादंबरीची प्रशंसा करताना लिहले आहे की “गोपाळ आजगांवकर यांच्या या कादंबरीमधून सत्तरीच्या दशकातील महानगरीय सामाजिक-सांस्कृतिक विश्व प्रत्ययकारक रीतीने उभे राहते ”. मराठी सामाजिक कादंबरीतून ग्रामीण समाज जीवन आणि त्याचे चित्रण मोठया प्रमाणात लिहले गेले आहे परंतु ,महानगरीय समाजजीवनाच्या बाबतीत सामाजिक चित्रण हे फार थोड्या प्रमाणात आहे किंवा ते माझ्या वाचनात आलेले नाही . ती कमी अंतर्यामी खजुराहो ही कादंबरी भरून काढताना दिसते .
७०च्या दशकापासूनचा कालखंड हा सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या बंडखोरीचा किंवा प्रस्थापितांपासून वेगळे अस्तित्व मांडणारा कालखंड मानला आणि ह्याच सत्तरीच्या दशकात नुकत्याच उदयास आलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या दासू ह्या नायकावर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा सामाजिक दृष्ट्या काय परिणाम होतो याचे विवेचन लेखकाने ताकतीने केले आहे .
कादंबरी येणारे स्त्री पुरुष यांच्यातील शरीर संबंध ,स्त्री पुरुष जनेंद्रिया संबंधित येणारे वाकप्रचार,म्हणी ,गुप्त नावे किंवा नायकाने स्वतःच्या लैंगिक भानाचा निचरा करताना वापरलेले वाकप्रचार आणि ह्याच लैंगिक संबंधाच्या बाबतीत नायकाचे नैतिकता आणि अनैतिकतेच्या व्याख्या विषयी चालणाऱ्या विचारांचे चित्रण वाचून कादंबरी अश्लीलतेकडे झुकते की काय असे बऱ्याचदा वाटते.
अगदी ह्या नैतिकता आणि अनैतिकतेच्या व्याख्या विषयी वैचारिक हिंदोळे घेत असताना नायकाच्या मनातून मन आणि शरीर या बद्दल एक विचार करायला भाग पाडणारा स्वसंवाद अगदी सहजच येतो "मन आणि शरीर यांच्यात मोठा फरक आहे. मनाने काहीही केलं तरी चालतं . ते दडून राहत . त्याचा फारसा त्रास होत नाही . पण शरीराने काही केलं की ते कर्म होतं आणि ते आयुष्यभर आपणाला चिटकून राहते".हा विचार अगदी झटकन वर्तमानात आणून सॊडतो कारण आपण देखील कदाचित आपल्या कटुंबातून व सामाजिक जडणघडणीतून प्रत्येक शाररिक कृती ही नैतिकतेच्या आणि अनैतिकतेच्या कसोटीवर ताडून बघत असतोच ना ?
नायकाच्या या मनोकायिक आख्यानाबरोबर ७०च्या दशकांत मुंबई महानगराच्या राजकीय पटलावर बजाव पुंगी हटाव लुंगी सारख्या तीक्ष्ण भाषिक आणि प्रांतीय विभाजनाच्या जाणीवा असणाऱ्या हिंद सेना नामक संघटनेचा उगम आणि वाटचाल ही तेवढ्याच ताकतीने कादंबरीत मांडण्यात आलेली आहे.ह्या हिंद सेनेच्या वाढत जाणाऱ्या शाखा व त्या गिरण कामगारांच्या मुलाचा सहभाग हा कुठेतरी प्रस्थापित डाव्या पक्षांचा बिमोड करून क्षीण होत चाललेल्या डाव्या संघटनांची जागा घेताना दिसतो.
मानवी मन राजकीय विचार करताना , शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि शरीर सुखातून समाधान मिळवण्यासाठी सातत्याने- संधी शोधात राहते व कृती करण्याअगोदर हे विचार नैतिक अनैतिकतेच्या चौकटीतून मनातल्या मनात तावून सुलाखून ही घेते पण कृती करताना स्खलन पावते . मग ह्या स्खलनातून येणारे सुखाचा आस्वाद घेण्या बरोबरच शारीरिक कृती पाप पुण्याच्या कसोटीत मोजत बसते याचा प्रत्यय कादंबरी वाचताना सातत्याने येतो .
कादंबरीच्या नावाची फोड करून जर शब्दश अर्थ काढल्यास अंतर्यामी म्हणजे मनात आणि चंदेल राजांनी बांधलेले खजुराहो येथील वास्तू शिल्प हे कश्यासाठी प्रसिद्ध आहेत रसिक वाचकास सांगण्याची गरज नाही .
त्यामुळे वर वर कितीही सोज्वळतेचा आव आणला तरीही प्रत्येकाच्या मनात खजुराहो हे आकार घेतच राहते!!

Monday, November 14, 2022

हे सांगायला हवं


 आजचा पुस्तक परिचय लिहायला हाती घेताना बऱ्याच दिवसांनी वाचन पूर्णत्वास गेल्याची भावना आहे .अगदी ब्रम्ह मुहूर्तावर पहाटे ०४:०० वाजता जाग आली आणि रेंगाळत चाललेले न्या. मृदुला भाटकर लिखित "हे सांगायला हवे" हे पुस्तक वाचून संपवले.


गो नी दा च्या "शितू" नंतर मधल्या काळात  वाचन सुरूच होते पण पूर्णत्वास जात नव्हते आणि जे काही पूर्णत्वास गेले त्याचा परिचय लिहायला सुर जुळून येत नव्हते.

आज सकाळी पुस्तक हाती घेतले तेव्हा उरलेल्या पानांची संख्या बघून लक्षात आले की सकाळी ०६:०० वाजेपर्यंत पुस्तक वाचून पूर्ण होईल मग लगेच पुस्तक परिचय लिहण्याची सुरसुरी आली ."हे सांगायला हवे" हे पुस्तक  २-३ दा वेगवेगळ्या संदर्भात सुचले होते पण टायमिंग जुळून येत नव्हता. शेवटी २ आठवड्यापूर्वी झाडीपट्टीतील तूरडाळ विषयीची फेसबुक पोस्ट वाचली आणि पुस्तक वाचायचे ठरवले.

कै. श्री. रमेश भाटकर (प्रसिद्ध नाट्य आणि सिने अभिनेते ) यांना  बलात्काराच्या  खोट्या केस मध्ये ठरवून अडकविण्यात आले होते आणि ह्या एका केस ने न्या.मृदुला भाटकर आणि कै. श्री. रमेश भाटकर यांच्या जीवनात काय बदल घडवून आणले हा उपरोक्त पुस्तकांचा मूळ गाभा आहे आणि ह्या गाभ्या भोवती बऱ्याच आठवणी सरकारी व्यवस्थेतील कुरघोड्या, राजकारण्यांचा राजकीय स्वार्थासाठी न्याय व्यवस्थेतील हस्तक्षेप ,या सर्व प्रकारातून आलेल्या नैराश्य व वैफल्य याविषयीच्या कहाणी सदर पुस्तकात मांडल आहे.

न्या मृदुला भाटकर यांनी  राज्याच्या आणि देशाच्या जनमानसात सदृढ  न्याय व्यवस्थेचे महत्व अधोरेखित करणाऱ्या बऱ्याच महत्त्व पूर्ण खटल्यांवर न्यायाधीश म्हणून काम केले व स्वतःचा ठसा उमटवला आहे . त्यात जळगाव वासनाकांड ,मुंबई लोकल बॉम्ब स्फोट , मालेगाव बॉम्ब स्फोट यासारखे महत्वपूर्ण खटल्यात न्यायमूर्ती म्हणून काम केले तसेच त्या मोक्का न्यायालयाच्या न्यायमूर्ती असताना सारा सहारा सारखे संवेदनशील प्रकरण निकाली काढले .

कदाचित त्यांच्या ह्या निष्पक्ष आणि निर्भिड न्यायदानाच्या शैली मुळे व्यवस्थेत त्यांचे बरेच हितशत्रू निर्माण झाले आणि त्यांनी पुस्तकात नमूद केल्या प्रमाणे त्यांच्या ह्या शैली ची किंमत कै रमेश भाटकर यांच्या चारित्र्यावर चिखलफेक करून हिशोब चुकते करण्याच्या किंवा त्यांना झुकवण्याचा प्रयत्न करण्यात आला ह्या सर्व प्रकाराला त्या कश्या सामोऱ्या गेल्या या सर्वासाठी तसेच,

इंटरनेटच्या क्रांती मुळे उदयास आलेल्या विविध आभासी समाज माध्यमात व २४ चालणाऱ्या वृत्त वाहिन्यात सातत्याने चालणाऱ्या  चर्चा सत्रातून  न्यायव्यवस्थेला समांतर अशी न्यायालये चालवली जाऊ लागली आहेत आणि या समांतर न्याय व्यवस्थेने जल्पकांच्या (Trollers) टोळ्या जन्माला घातल्या आहेत अशासच एका जल्पकाचा (Troller) न्या मृदुला भाटकर यांना त्यांनी एका सामजिक संस्थेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भात न्याय बुध्दीला स्मरून दिलेल्या निकालावरून सामना करावा लागला काय होता तो निकाल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य व देशद्रोह म्हणजे काय विषयाची तपशील जाणून घेण्यासाठी जरूर वाचा "हे सांगायला हवं"

Sunday, May 29, 2022

शितू


 

शितू गो नी दांडेकर

आजकाल व्हॉट्स ॲप विद्यापीठात एक विनोद फिरत कायम असतो की तुम्ही आज काही नाही केले तर उद्या उतारवयात काय सांगणार .ह्या विनोदाच्या अनुषंगाने माझ्या शालेय जीवनात बालभारतीच्या अभ्यासक्रमातील पहिली पासून ते आठवी पर्यंत प्रत्येक वर्षी ,एक ना एक पद्य किंवा गद्य (धडा वा कविता) ह्या आयुष्यभर पुरतील अश्या आठवणी देऊन गेल्या आहेत .

१९९० च्या आधी जन्माला आलेली पिढी ही बऱ्याच बाबतीत नशीबवान होती कारण इंटरनेट , आभासी समाज माध्यमे ही त्यांच्या जीवनात नव्हती . त्यामुळे  मैदानी खेळ,वाचन , मामांचे गाव किंवा शाळेतून मिळालेले सुट्टीचा गृहपाठ हे त्यांचे सुट्ट्या मधील हँगिंग स्पेसस होत्या आणि आजच्या सारखी मुलं आणि मुली यांच्या तील संवादा मध्ये मोकळीक नव्हती आणि जे बिनधास्त मुले मुली सोबत फिरत वा संवाद साधत ते थोर क्रांतिकारक असतं आणि उरलेली समस्त जनता ही त्यांच्या पुस्तकातील पात्रासोबत रोमान्स करत असत.

ह्या उमलत्या वयातील काही धडे आजही अगदी लख्ख आठवतात मग तो तिसऱ्या इयत्तेत बालभारतीच्या पुस्तकातील खोडकर, बेदरकार आणि तितकाच संवेदनशील असलेला झेल्या असेल ( आजही तो झेल्या मनाच्या कोपऱ्यात जागा अडवून बसला आहे ) किंवा सातव्या इयत्तेतील शितू  ..

सातवीच्या बालभारतीच्या पुस्तकात भेटलेल्या शितूचे काल ओघात विस्मरण झाले होते पण धडयाच्या काही ओळी अश्या होत्या

हातातून रक्त वाहणारी शितू अंगणाच्या पायऱ्या उतरताना पाहिली ,तसं घाबरून हिच्या कडे धावत ते म्हणाले ,

"काय केलेस पोरी ? विसू कुठं आहे ? हातात छर्रे घुसले की -"

तिच्या पाठोपाठ विसू पायऱ्या उतरत होता . सगळं सांगण्याच्या अवसानात पुढे झाला तोच शितू म्हणाली ,

"नाही हुप्प्याने हात फोडला ! "

ह्या वाक्याने कदाचित  २०-२२ वर्षेनंतर ही शितूच्या आठवणी मनात ताज्या होत्या आणि निमित्त झाले स्टोरी टेल ॲपचे अचानक पुन्हा एकदा शितू ही ऑडियो बुकच्या रूपाने भेटली एका दमात आप्पांचे (गो नी  दां   चें) शितू आणि पवना काठाचा धोंडी ही दोन पुस्तके ऐकून संपवलीत .एकूणच पुस्तक ऐकणे हा माझ्या साठी नवीन प्रकार होता,पण का कोण जाणे जास्त रुचला नाही ,पुस्तक ऐकणे हे दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार आहे. म्हणून शेवटी पुन्हा एकदा पुस्तक आणून वाचले तेव्हा कुठं जीवात जीव आला आणि मनाला समाधान लाभलं.

शितू ही तशी छोटेखानी कथा कादंबरी आहे  एका कोकणी कन्येची की दूर्दैवाने जिच्यावर अगदी बालपणात दोन वेळा वैधत्व आले लागोपाठ दोन नवऱ्याच्या मृत्यूमुळे तिला समाजाने पांढऱ्या पायची ठरवली गेली .पण ह्याच कोकणकन्येला वेळशीच्या अप्पा खोत यांनी आश्रयच दिला नाही तर कुळवाड्याच्या ह्या कन्येवर सर्व ब्राह्मणी संस्कार पण घडवले . आप्पांच्या घरात शितू सोबत विसू हा आप्पांचा लहान पुत्र पण वाढत होता . विसूच्या जन्माच्या वेळी विसूची आई बाळंतपणात अप्पांना आणि विसू पोरकं करून सोडून गेली आणि जाता जाता अप्पांना

"जगायची इच्छा होती ;पण ती अपुरी राहिली . बाळाचं उण पडू देऊ नका मी वरून पाहत राहीन ." हे शब्द देऊन गेली

त्यामुळे अप्पांचा विसू वर खूप जीव आणि ह्यामुळेच आप्पांचा हा लहान मुलगा व्रात्य आणि खोडकर होता .त्यांच्या खोड्यांनी सारे गाव परेशान होते पण खोताचा पोरगा म्हणून गावकरी त्यांच्या कडे दुर्लक्ष्य करत ,विसू जरी व्रात्य आणि खोडकर होता तरी तो आप्पा खोताप्रमाणे प्रेमळ आणि दयाळू होता त्यामुळेच ज्यावेळी शितूचा जन्मदाता बाप तिला बालविधवा म्ह्णून मारायला निघतो त्यावेळी विसू तिला तिच्या बापाच्या तावडीतून सोडवतो .
 
एकाच वेळी सोशिक शितू आणि तितकाच व्रात्य खोडकर विसू अप्पांच्या घरात वाढत असताना त्यांच्यात प्रेमाचे व प्रीतीचे नाते बहरात जाते त्या नात्यात काही काळासाठी विरहही येतो आणि एका कठीण प्रसंगी शितूच एका दूर्दैवी घटनेच्या मानसिक आघातामुळे मोडून पडलेल्या विसूला आयुष्यात पुन्हा उभे राहण्यासाठी प्रवृत्त करते पण ह्या दोघांच्या तरल प्रेमात असे काही वादळ येते की शितू आणि विसू मध्ये बहरणारे प्रेम आणि प्रिती दुभंगून जाते .

काय होते ते वादळ ,कोणते मानसिक आघात विसू वर झालेत आणि विशेषतः पुन्हा एकदा आपले बालपण जगण्यासाठी  

गो नि दां नी भाषीय संस्कार करून वाचकांच्या हाती सोपवलेली स्वतःची अत्यंत लाडकी ,पण जन्मभर सोसावी लागलेली मानसकन्या शितू  "चित्ता अति हळुवारपण आनौनिया " वाचावी    . 

Thursday, April 28, 2022

मास्तरांची सावली


मास्तरांची सावली

जसा एच आर झालो तसा का कोण जाणे गिरणगाव, लालबाग परळ आणि तेथील गिरणी कामगार यांचा इतिहास याच्या प्रेमात पडलो. एच आर मधील आय आर आणि कामगार कायदे (औद्योगिक संबंध)हा माझा आवडता प्रांत आणि माझ्या समजुती प्रमाणे मुंबईतील कापड गिरण्याच्या नियमनासाठी कामगार कायदे आले .पुढे कामगारांनी त्यांच्या हक्कासाठी लढे उभे केल्या , कामगार संघटना , कामगार चळवळी उभ्या राहिल्या त्यामुळे आय आर ,कामगार कायदे मुळापासून समजून घेण्यासाठी मी सदैव त्या संबधित पुस्तकाच्या शोधत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून गुगल वर सदैव कामगार ,कामगार संघटना,कामगार कायदे कापड गिरण्या ,लालबाग परळ हे  शब्द टाकायचे आणि त्या संबंधीची पुस्तके, माहिती,डॉकमेन्ट्रीज  शोधत राहायच्या हा जणू दिनक्रमच झाला आहे .

एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शन मध्यंतरी  त्यांच्या मुलाखतीत बोलले होते की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. त्याच प्रमाणे  तत्कालीन साहित्य कविता ,गाणी ,कादंबऱ्या ,चरित्र ,आत्मचरित्रे ,चित्रपट ,नाटके  हे सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा इतिहास यातून डोकावत असतो . याच शोधात असतानां २०१७ ला कवी कै नारायण सुर्वे यांच्या कामगार आहे मी, तळपती तलवार आहे ह्या कवितेच्या खालील ओळी वाचण्यात आल्या

रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे,

तसा नारायण सुर्वे यांचे यांचे साहित्य न वाचता पण त्यांच्या डाव्या विचारसरणीशी असलेल्या बांधिलकी मुळे गिरण कामगार हा विषय वाचताना विविध ठिकाणी त्यांच्या  लिखाणाचा संदर्भ येत होता व त्या त्या वेळी तत्यांचे ते साहित्य वाचून संपवले पण त्यांच्या चरित्राचा शोध सुरुच होतो . २-३ वर्षांपूर्वी गूगल मंथनातून "मास्तरांची सावली "वर आले होते विकत घेऊन वाचायला मुहूर्त लागत नव्हता . शेवटी २०२२ च्या विश्व पुस्तक दिनी ते संग्रही आले आणि आल्या आल्या एका दमात संपवून टाकले.

मास्तरांची सावली हे कृष्णाबाई नारायण सुर्वे लिखित आत्मकथन हे कहाणी आहे किशा आणि तिच्या मास्तरांची .

किशा ही अशिक्षित, मंगलदास चाळीत राहणाऱ्या  मिल मध्ये काम करणाऱ्या कामगार दांपत्याची एकुलती एक मुलगी तिच्या समजुती प्रमाणे एके दिवशी कोणी तरी मूठ मारली आणि तिचे वडील हे जग सोडून गेले व वडिलांच्या पाठोपाठ इज्जतीला बट्टा लागू नये म्हणून आईने विषारी फळ खाऊन आत्महत्या केली. हे दोन्ही आघात किशाच्या न कळत्या वयात घडले की अगदी तिला तिच्या जन्मदात्याचे चेहरे पण आठवत नाहीत .ह्या अनाथ किशाचा सांभाळ तिच्या वडिलांच्या आई ने अगदी कष्टपूर्वक केला स्वतः  किशाने वयाच्या आठव्या वर्षापासून धुणी भांडी व मोलमजुरी करून आजी ला हातभार लावत होतीच .

अगदी ह्याच किशा सोबत तिचे मास्तर ही मंगलदास चाळीत वाढत होते . तिचे मास्तर म्हणजे गंगाराम सुर्वे ह्या वुलन मिल मध्ये काम करणाऱ्या मिल कामगाराने रस्त्यावरून उचलून आणलेले मुलगा जशी किशा वयाने वाढत होती तशी तिचे मास्तर हे ह्याच चाळीत वाढत . मास्तर म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते अगदी पूर्ण गिरणगाव  चळवळीचे पत्रके लावणे ,प्रौढ साक्षरता वर्ग घेणं ,सभेत भाषणे देणे अशी सर्व उद्योग मास्तर करत असत (त्या वेळी मास्तर फक्त तिसरी शिकले होते). अश्याच एका प्रौढ साक्षरता वर्गात किशाची आणि मास्तरांची भेट झाली आणि कालांतराने एकमेकांच्या प्रेमाचे बंध घट्ट होत गेले.

मास्तर हे रस्त्यावर सापडलेले पोर त्यामुळे त्याच्या जाती पातीचा काही ठाव ठिकाणा नव्हता आणि ही गोष्ट किशाच्या चुलत्यांना खटकायची आणि त्याच्या ह्या प्रेमाला विरोध होता . त्यामुळे एके दिवशी दोघांनी रजिस्टर पद्धतीने कोर्टात जाऊन विवाह उरकून टाकला त्यानंतर सुरु झाले दोघांच्या संसाराचे दशावतार कारण ह्या विवाहाला किशाच्या चुलत्यांचा विरोध ह्या चुलत्यांच्या भीती मुळे मास्तरांचे वडील आपली चाळीतील खोली सोडून गावाकडे निघून आणि लग्नाच्या पहिल्याच दिवशी दोघांच्या डोक्यावरचे छप्पर गेले आणि हे संसाराचे भोगभोगत आणि आलेल्या संकटाशी दोन हात करत कधी फूट पाथ वर,कधी झोपडीत तर कधी घाणीने बरबटलेल्या अंधाऱ्या चाळीत त्यांचा संसार उमलत पण गेला . 

त्या संकटाच्या काळात एका कम्युनिस्ट चळवळीतील शिक्षण विभागातील असणाऱ्या  एका महिला अधिकाऱ्यांना किशाला आणि मास्तरांना महानगर पालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून कामाला लावले व दोघांच्या आयुष्यात स्थिरता आणली पण दोघांच्या संसाराचा मार्ग हा काट्या कुट्यांनी भरलेला होता . दरम्यानच्या काळात त्यांच्या ह्या संसाररूपी वेलावर फुले ही उमलू लागली होती . पहिल्या अपत्यासोबत मास्तर सातवीची परीक्षा देऊन खरेखुरे शाळा मास्तर (शिक्षक )झाले .आणि उत्त्तरोउत्तर मास्तर एक साहित्यिक म्हणून नावा रुपाला आले की अगदी ते कुसुमाग्रजांचे मानस पुत्र झाले .

पण किशा चा संघर्ष काही संपला नाही उलट तो  उत्त्तरोउत्तर अगदी गडद होत गेला एका बाजूला शिपायांची नोकरी तर दुसऱ्या बाजूला घरात मुलांची व्यसनाधीनता आणि त्यात अगदी कमी वयात दोघे कर्त्या मुलांचे आणि सुनांच्या मृत्यू पचविण्याचे दुखत प्रसंग ही आले .ह्यात भर कमी कि काय तिचे जीवापाड प्रेम असणारे मास्तर ही तिला एकाकी सोडून गेले .

किशा तिच्या मास्तरांसाठी लिहते त्या प्रमाणे "शेवटी मृत्यू हा अटळच आहे, पण तो असा आजारीरुपात येऊ नये, आनंदात हसत हसत यावा. तुम्हांलाही आणि मलाही. म्हणूनच फक्त तुम्हांला ज्या गोष्टींत आनंद मिळतोय त्या गोष्टी मीही आनंदानं करीन. कारण मला पैसा, दौलत काहीच नकोय. फक्त माझ्या मास्तरांचं कर्तृत्व त्यांच्या मागेही समाजात राहावं, एवढीच माझी इच्छा आहे. बाकी मी तुमच्यासोबतच तुमची सावली म्हणूनच राहणार, आणि तुमचीही सावली माझ्यावर सतत राहू दे. बाकी मला काहीही नको."

कोण होती किशा कोण होते तीचे मास्तर आणि त्यांचे असे काय कर्तृत्व समाजात राहिले या सर्वासाठी जरूर वाचा "मास्तरांची सावली "
 

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...