Monday, September 28, 2020

सुसाट जॉर्ज


 सुसाट जॉर्ज


सुसाट जॉर्ज हे निळू दामले लिखित ख्रिस्तवासी जॉर्ज फर्नांडिस यांचे एक प्रोफाईल आहे. तसे आजपर्यंत निळू दामले यांनी लिहलेले हे दुसरे पुस्तक वाचून संपवले. माझ्या मते प्रत्येक चरित्रात्मक,आत्मचरित्रात्मक वाचन करणाऱ्या वाचकाच्या मनात बरेच व्यक्तिमत्व हे सदैव रुंझी घालत आणि त्या व्यक्तिमत्वाविषयी पुस्तके वाचनास साद घालत असतात . तसे मला देखील विविध क्षेत्रात काम केलेले आणि करणारे असे व्यक्तिमत्व सदैव त्यांच्या विषयी वाचण्यासाठी प्रवृत्त करतात . 

अगदी स्वातंत्र्य पूर्व नी स्वातंत्रोत्तर भारतीय औद्योगिकरणाच्या इतिहासात आणि संपूर्ण भारतभर विविध कामगार संघटनात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या नी  इतिहास घडवणाऱ्या कामगार चळवळीचे अर्ध्वयू मानले जाणारे नेते घडवण्यात महाराष्ट्राचा व  मुंबई शहराच्या सिंहाचा वाटा आहे . अगदी नारायण मेघाजी लोखंडे पासून , कॉ. डांगे सारखे कट्टर डावे ,डॉक्टरी व्यवसायातून कामगार नेते झालेले डॉ दत्ता सामंत ,भारतीय मजदूर संघाचे दत्तो पंत ठेंगडी ,मुक्त कामगार चळवळीचे प्रणेते नी भांडवलवादी  अर्थव्यवस्थेचे समर्थक असणारे आर जे मेहता , भारतीय कामगार सेनेचे वामनराव महाडिक , दत्ताजी साळवी,विडी कामगारांचे नेते आडम  मास्तर ,सिटू चे कॉ गोविंद पानसरे ,कॉ.  बी टी रणदिवे ,कॉ बगाराम तुळपुळे ,हिंद मजदुर सभेचे शरद राव ह्या सर्व कामगार नेत्यांच्यात एक महत्वाचे नी ज्याचे नाव घेतल्याशिवाय किंबहुना मुंबईचाच नव्हे तर उभ्या भारताच्या कामगार चळवळीचा नी कामगार नेत्यांचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही असा  हा मुंबईचा पहिला बंद सम्राट ,जायंट किलर ,समाजवादी विचारसरणी वर नितांत श्रद्धा असणारा , भारताचे माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस.        


जॉर्ज चा जन्म आजच्या कर्नाटकातील मंगलोर (मंगळुरु) मधील एका कर्मठ ख्रिस्ती परिवारात झाला होता .जॉर्जचे वडील हे शेती बरोबर विमा व्यवसाय करत ज्या प्रमाणे सर्व वडिलांच्या आपल्या पाल्यच्या करियर बद्दल अपेक्षा असतात त्याचप्रमाणे जॉर्जच्या वडिलांना जॉर्जने वकील व्हावे असे वाटत होते पण जॉर्जला  काही वकील व्हावयाचे नव्हते त्याच्या ओढा कुठे दुसरी कडेच होता म्ह्णून जॉर्ज मॅट्रिक झाल्यावर मंगलोर मधील सेमिनारीत जाऊ लागला आणि पुढे भविष्यात त्याला बंगलोर येथील सेमिनारीत घालण्यात आले,तेथे देखील जॉर्ज स्वस्थ बसला नाही ख्रिस्ती धर्माबद्दल अखंड वाचन केले अगदी धर्माच्या सखोल ज्ञानासाठी जॉर्ज लॅटिन भाषा देखील शिकला कारण ख्रिस्ती धर्माचे मूळ तत्वज्ञान हे लॅटिन भाषेत आहे ,धार्मिक वाचनासोबत जॉर्ज चे अवांतर आणि इतर धर्माच्या तत्व ज्ञानाबद्दल ही प्रचंड वाचन आणि सखोल अभ्यास होता आणि वाचनाची जॉर्ज ची सवय अगदी अखेर पर्यंत टिकली होती . त्याच्या बंगलोर मधील खोलीत ,दिल्लीतील निवासस्थानात पुस्तकांचा प्रचंड संग्रह होता.

सुरवातीच्या काळात जॉर्ज ने चर्च वरील विश्वास उडाल्यावर स्थानिक कामगारांच्या संघटनाची बांधणी केली त्यात विडी कामगार हॉटेल मधील कामगार याच्या संघटना बांधल्या "युवक  "नावाचे कोकणी मासिक चालवलेलं त्याच दरम्यान मुंबईतून तडीपार असलेले रॉय वादी गोदी कामगारनेते पी डिमेलो हे मंगलोर येथे येऊन राहत होते . त्यांच्याशी जॉर्ज ची ओळख झाली त्या दरम्यान पी डिमेलो यांनाही त्या संघटनेत काम करण्यासाठी एका सहकाऱ्याची गरज होती व त्यांच्या दृष्टीने जॉर्ज हा योग्य सहकारी होता . त्या दोघांनी मिळून मंगलोरात बस कामगाराचा संप घडवून आणला होता . पण कालांतराने साधारणतः १९५० ला जॉर्ज मित्राच्या आग्रहाखातर नी मित्रांनी दिलेले २० रुपये घेउन मुंबईत आला व मुंबईचा झाला . 

मुंबईत स्थिरावणे नी घट्ट पाय रोवणे तसे येरा गबाळ्याचे काम नोहे परंतु जॉर्ज हा स्वभावतः निर्भय ,संघर्षशील,चिवट आणि लढाऊ होता . सुरवातीच्या काळात जॉर्ज ने बरेच कामे केलीत अगदी हॉटेलात ,संगीत रेकॉर्डच्या दुकानात ,टाइम्स मध्ये प्रूफ रीडर म्हणून विविध प्रकारची कामे केलीत .   दरम्यानच्या काळात पी डिमेलो हे  वापस मुंबईत आले व ह्या दोघांनी मिळून गोदीत  कामगाराच्या ड्रायव्हराच्या संघटना बांधल्या येेेेथे जॉर्ज अगदी हाजी मस्तान सारख्या गुंडाला देखील भिडला नी जॉर्ज ची मुंबईतील कामगार जगतात एक ब्रँड म्हणून ओळख बनायला सुरुवात झाली हळू हळू गोदी कामगार संघटना ते बेस्ट कामगार, मुंबई महानगर पालिका साफसफाई कामगाराची संघटना एक एक करत पादक्रांत करत विविध क्षेत्रातील कामगा राच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देण्यास सुरुवात केली , संप पुकारले . सरते शेवटी २५ जुलै १९५८ रोजी मुंबई बंद केली आणि नवाकाळ ह्या दैनिकाने बातमी करून जॉर्ज ला "बंद सम्राट" ही उपाधी बहाल केली. कामगार नेता म्हणून अगदी जे आर डी टाटा यांनी जॉर्ज ला बॉम्बे हाउस मध्ये बोलवून टाटा उद्योग समूहाच्या हॉटेल उद्योगातील कामगाराची संघटना चालवायची गळ घातली होती हे विशेष होते.

जॉर्ज चे गुरू पी डिमेलो हे निवडणुकीच्या रिंगणात हरले होते ,परंतु जॉर्ज सर्व प्रथम मुंबई महानगर पालिकेत नगरसेवक झाला पण जॉर्ज चा पिंडच मुळी खतरों से खेलने वाला होता. त्याने १९६७ साली मुंबई प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष , खासदार, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट स का पाटील यांच्या विरुद्ध खासदारकीची निवडणूक लढविण्याचे जाहीर केले खरे तर स का पाटील यांच्या समोर जॉर्ज काहीच नव्हते .पण लोकांनी ही निवडणूक स्वतः लढवली स का पाटील हे जायंट होते तर त्यांना ह्या निवडणुकीत हरवून जॉर्ज जायंट किलर ठरला. याच सह या पुस्तकात लेखकाने जॉर्ज संबंधी त्यांचा आणीबाणी काळातील भूमिगत प्रवास ,बडोदा डायनामाईट प्रकरण , नंतर जॉर्ज चा बिहारच्या निवडणूक रिंगणात प्रवेश जनता सरकार मध्ये उद्योग मंत्री, कोको कोला , आय बी एम सारख्या कंपन्यांना देशाबाहेर घालवायचा निर्णय, रेल्वे मंत्री , काश्मीर मंत्री म्हणून कारकीर्द या संबंधी बरीच माहिती दिली आहे.

१९९६ नंतर जॉर्ज चे राजकारण कमालीचे बदलले ज्यांचा आयुष्य भर विरोध केला त्याच्याशीच युती केली त्याचं युतीचा (राष्ट्रीय विकास आघाडीचा) जॉर्ज हा समन्वयक बनला, वाजपेयी सरकार मध्ये संरक्षण मंत्री पद सांभाळलं पण २००४ नंतर जसे वाजपेयींचा करिश्मा हरवू लागला तसा जॉर्ज देखील राष्ट्रीय राजकारणातून मागे फेकला जाऊ लागला. नंतर नंतर जॉर्ज ला अल्झाईमर (स्मृतीभंश) या आजाराने ग्रासले , वाजपेयी जी पण ह्याचं आजाराने ग्रस्त होते असे म्हणतात की एके काळच्या ह्या दोघं सहकाऱ्यांना समोरासमोर आणले असते तर त्यांनी एकमेकांना ओळखलं नसते. अखेरच्या दिवसात जॉर्ज चा स्मृतीभ्रंश गडद होऊ लागला होता आणि जॉर्ज चा ताबा मिळवण्यासाठी जॉर्ज ची पत्नी लैला कबीर आणि सहकारी जया जेटली यांच्यात न्यायालयीन लढाया झाल्या जॉर्ज ताबा काही दिवस अगदी बाबा रामदेव यांच्या कडे देखील होता .

या सर्व गोष्टी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी जरूर वाचा सुसाट जॉर्ज

#RajhansPrakashan

#सुसाटजॉर्ज 

#निळूदामले

#बुकरिव्ह्यू

#जायंटकिलर

Nilu Damle

No comments:

Post a Comment

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...