Sunday, May 29, 2022

शितू


 

शितू गो नी दांडेकर

आजकाल व्हॉट्स ॲप विद्यापीठात एक विनोद फिरत कायम असतो की तुम्ही आज काही नाही केले तर उद्या उतारवयात काय सांगणार .ह्या विनोदाच्या अनुषंगाने माझ्या शालेय जीवनात बालभारतीच्या अभ्यासक्रमातील पहिली पासून ते आठवी पर्यंत प्रत्येक वर्षी ,एक ना एक पद्य किंवा गद्य (धडा वा कविता) ह्या आयुष्यभर पुरतील अश्या आठवणी देऊन गेल्या आहेत .

१९९० च्या आधी जन्माला आलेली पिढी ही बऱ्याच बाबतीत नशीबवान होती कारण इंटरनेट , आभासी समाज माध्यमे ही त्यांच्या जीवनात नव्हती . त्यामुळे  मैदानी खेळ,वाचन , मामांचे गाव किंवा शाळेतून मिळालेले सुट्टीचा गृहपाठ हे त्यांचे सुट्ट्या मधील हँगिंग स्पेसस होत्या आणि आजच्या सारखी मुलं आणि मुली यांच्या तील संवादा मध्ये मोकळीक नव्हती आणि जे बिनधास्त मुले मुली सोबत फिरत वा संवाद साधत ते थोर क्रांतिकारक असतं आणि उरलेली समस्त जनता ही त्यांच्या पुस्तकातील पात्रासोबत रोमान्स करत असत.

ह्या उमलत्या वयातील काही धडे आजही अगदी लख्ख आठवतात मग तो तिसऱ्या इयत्तेत बालभारतीच्या पुस्तकातील खोडकर, बेदरकार आणि तितकाच संवेदनशील असलेला झेल्या असेल ( आजही तो झेल्या मनाच्या कोपऱ्यात जागा अडवून बसला आहे ) किंवा सातव्या इयत्तेतील शितू  ..

सातवीच्या बालभारतीच्या पुस्तकात भेटलेल्या शितूचे काल ओघात विस्मरण झाले होते पण धडयाच्या काही ओळी अश्या होत्या

हातातून रक्त वाहणारी शितू अंगणाच्या पायऱ्या उतरताना पाहिली ,तसं घाबरून हिच्या कडे धावत ते म्हणाले ,

"काय केलेस पोरी ? विसू कुठं आहे ? हातात छर्रे घुसले की -"

तिच्या पाठोपाठ विसू पायऱ्या उतरत होता . सगळं सांगण्याच्या अवसानात पुढे झाला तोच शितू म्हणाली ,

"नाही हुप्प्याने हात फोडला ! "

ह्या वाक्याने कदाचित  २०-२२ वर्षेनंतर ही शितूच्या आठवणी मनात ताज्या होत्या आणि निमित्त झाले स्टोरी टेल ॲपचे अचानक पुन्हा एकदा शितू ही ऑडियो बुकच्या रूपाने भेटली एका दमात आप्पांचे (गो नी  दां   चें) शितू आणि पवना काठाचा धोंडी ही दोन पुस्तके ऐकून संपवलीत .एकूणच पुस्तक ऐकणे हा माझ्या साठी नवीन प्रकार होता,पण का कोण जाणे जास्त रुचला नाही ,पुस्तक ऐकणे हे दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार आहे. म्हणून शेवटी पुन्हा एकदा पुस्तक आणून वाचले तेव्हा कुठं जीवात जीव आला आणि मनाला समाधान लाभलं.

शितू ही तशी छोटेखानी कथा कादंबरी आहे  एका कोकणी कन्येची की दूर्दैवाने जिच्यावर अगदी बालपणात दोन वेळा वैधत्व आले लागोपाठ दोन नवऱ्याच्या मृत्यूमुळे तिला समाजाने पांढऱ्या पायची ठरवली गेली .पण ह्याच कोकणकन्येला वेळशीच्या अप्पा खोत यांनी आश्रयच दिला नाही तर कुळवाड्याच्या ह्या कन्येवर सर्व ब्राह्मणी संस्कार पण घडवले . आप्पांच्या घरात शितू सोबत विसू हा आप्पांचा लहान पुत्र पण वाढत होता . विसूच्या जन्माच्या वेळी विसूची आई बाळंतपणात अप्पांना आणि विसू पोरकं करून सोडून गेली आणि जाता जाता अप्पांना

"जगायची इच्छा होती ;पण ती अपुरी राहिली . बाळाचं उण पडू देऊ नका मी वरून पाहत राहीन ." हे शब्द देऊन गेली

त्यामुळे अप्पांचा विसू वर खूप जीव आणि ह्यामुळेच आप्पांचा हा लहान मुलगा व्रात्य आणि खोडकर होता .त्यांच्या खोड्यांनी सारे गाव परेशान होते पण खोताचा पोरगा म्हणून गावकरी त्यांच्या कडे दुर्लक्ष्य करत ,विसू जरी व्रात्य आणि खोडकर होता तरी तो आप्पा खोताप्रमाणे प्रेमळ आणि दयाळू होता त्यामुळेच ज्यावेळी शितूचा जन्मदाता बाप तिला बालविधवा म्ह्णून मारायला निघतो त्यावेळी विसू तिला तिच्या बापाच्या तावडीतून सोडवतो .
 
एकाच वेळी सोशिक शितू आणि तितकाच व्रात्य खोडकर विसू अप्पांच्या घरात वाढत असताना त्यांच्यात प्रेमाचे व प्रीतीचे नाते बहरात जाते त्या नात्यात काही काळासाठी विरहही येतो आणि एका कठीण प्रसंगी शितूच एका दूर्दैवी घटनेच्या मानसिक आघातामुळे मोडून पडलेल्या विसूला आयुष्यात पुन्हा उभे राहण्यासाठी प्रवृत्त करते पण ह्या दोघांच्या तरल प्रेमात असे काही वादळ येते की शितू आणि विसू मध्ये बहरणारे प्रेम आणि प्रिती दुभंगून जाते .

काय होते ते वादळ ,कोणते मानसिक आघात विसू वर झालेत आणि विशेषतः पुन्हा एकदा आपले बालपण जगण्यासाठी  

गो नि दां नी भाषीय संस्कार करून वाचकांच्या हाती सोपवलेली स्वतःची अत्यंत लाडकी ,पण जन्मभर सोसावी लागलेली मानसकन्या शितू  "चित्ता अति हळुवारपण आनौनिया " वाचावी    . 

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...