Sunday, May 9, 2021

फ्रॅक्चरेड फ्रीडम ए प्रिझन मेमॉयर


 

फ्रॅक्चरेड फ्रीडम प्रिझन मेमॉयर - कोबाद घांदी (Kobad Ghandy )

फेब्रु -२०२१ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य करणारे सुधीर सूर्यवंशी लिखित  "चेकमेट हाऊ बीजेपी वन अँड लॉस्ट महाराष्ट्र " ह्या पुस्तकांच्या परिचय लिहला त्यानंतर आज जवळ जवळ महिन्यानंतर पुस्तक परिचय लिहायला घेतला  आहे . मधल्या काळात वाचलं पण वेगवेगळ्या विषयांवर - पुस्तके अर्धवट वाचून मागे पडली अथवा शेवट पर्यंत वाचून पूर्ण  झालीत नाहीत अर्थात ती अर्धवट राहिलेली पुस्तके लवकरच वाचून  पूर्ण करणारच आहे . परंतु का कोण जाणे सध्या आजू बाजूला घडणाऱ्या गोष्टी चित्त सारखे विचलित करतायेत आणि वाचन पाहिजे तेवढ्या एकाग्रतेने होऊ शकत नाहीये.   त्यामुळे कदाचित पुस्तक पूर्ण पने  वाचून होत नाहीयेत आणि त्यावर पुस्तक परिचय राहिलेत असो मराठीत म्हटले आहे इच्छा असली तर मार्ग असतो आणि आवड असली तर सवड असते 

बऱ्याच जणांनी २०१२ च्या ऑगस्ट मध्ये श्री प्रकाश झा दिग्दर्शित अर्जुन रामपाल ,मनोज वाजपेयी ,ओम पुरी अभय देओल यांच्या प्रमुख भूमिका असणारा  "चक्रव्यूह " हा नक्षलवाद /माओवाद भारतीय संघ राज्याचा त्यांच्या बरोबर सुरु असणारा संघर्ष या विषयावर बेतलेला हा हिंदी सिनेमा बघितला असेल विसरले पण असतील . तसा हा सिनेमा काही खूप गाजला होता वा खूप काही सुपर डुपर हीट होता असे काही नाही . परंतु ह्या सिनेमाच्या प्लॉट मध्ये जो आरंभाचा  सीन आहे.  त्यात प्रा गोविंद सूर्यवंशी (स्व.ओम पुरी ) यांच्या अटकेचा प्रसंग आहे आणि त्यानंतर त्यांना न्यायालयात सादर केल्यावर प्रो गोविंद यांची ओळख करून दिली जाते ती अशी "यंहा से नंदीघाट तक दर्जनों अपराध दर्ज है इनके नाम ,गोविन्द राम सूर्यवंशी मुंबई के जाने माने व्यवसायी और धनी परिवार में जन्मे आपने देश के नामी डून स्कूल से पढाई करने के बाद लंदन स्कूल ऑफ़ इकोनॉमिक्स में अर्थ शास्त्र की पढाई की ऑक्सफ़ोर्ड यूनिवर्सिटी से डॉक्टरेट करने के बाद देश लौटे और गरीबोंके शोषण से प्रभावित हो कर सब कुछ त्याग दिया और माओइस्ट मूवमेंट में जुड़ गये पिछले ३० वर्षे गोविंदजी अंडर ग्राउंड रहे और इन्हे नक्सल मूवमेंट के सबसे मुख्य आइडियोलॉग के रूप में जाना जाता हैं |" सीन सरळ आज तक ह्या हिंदी न्यूज चॅनेल च्या स्टुडिओ मध्ये जातो .

आता कदाचित प्रश्न पडला असेल कि प्रो. गोविंद सूर्यवंशी  (स्व.ओम पुरी ) ,चक्रव्यूव्ह हा २०१२ चा सिनेमा यांचा २०२१  साली आलेल्या कोबाद घांदी लिखित फ्रॅक्चरेड फ्रीडम ए प्रिझन मेमॉयर पुस्तकांशी काय संबंध असेल तर तो असा होता की डॉ मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या पहिल्या तसेच दुसऱ्या कालखंडात माओवादी चळवळींनी बरीच उचल खाल्ली होती ती किती गंभीर होती तर पशुपती (नेपाळ ) ते तिरुपती (आंध्र प्रदेश,भारत ) हा भाग रेड कॉरिडॉर म्हणून गणला जात होता (दबक्या अवस्थेत आज पण आहे ) कारण आताच एप्रिल महिन्यात छत्तीसगढ मध्ये झालेल्या माओवाद्याच्या हल्ल्यात सीआरपीएफ चे  ३३ जवान शाहिद झाले तर १ जवानाचे  माओवाद्यांनी अपहरण केले बरं मग या सर्व हिंसाचारामागे कोण आहे तर वेगवेगळ्या माध्यमातील बातमीदारानुसार त्याना नक्षलवादी म्हंटले जातात किंवा माओवादी (भारतीय कम्युनिस्ट पार्टी -माओवादी सध्या ह्या पक्षावर बंदी आहे ) म्हटले जातात किंवा माध्यम जर अति डाव्या विचारसरणीचे असेल तर त्यांना क्रांतीकारी (रेव्होल्यूशनरी ) देखील म्हटले जाते. मग कोबाद घांदी यांचा या सर्वाशी संबंध काय तर ,द हिन्दू ह्या दैनिकाने  Kobad Ghandy's arrest: Major blow to Maoist movement हा मथळा असलेली  के श्रीनिवास रेड्डी बातमीदारानें २२ सप्टेंबर २००९ रोजी दिलेल्या बातमीत वर्णन केल्या प्रमाणे कोबाद ह्या सर्वोच्च् माओवादी नेत्याच्या अटकेने भारतीय नक्षलवादी चळवळीला जोरदार धक्का बसेल मध्य भारतात मजबूत पाय रोवलेल्या ह्या संघटनेच्या दक्षिण भारतातील विस्तारावर याचा प्रतिकूल परिणाम होईल. हा (कोबाद) महत्त्वाचा नक्षलवादी नेता गेल्या दीड वर्षांपासून देशाच्या राजधानीत राहून बेल्जिअम ,पेरू ,फिलिपिन्स ,तुर्की ,जर्मनी व नेपाळ (पशुपती ते तिरुपती ) या देशातील समविचारी क्रांतिकारी संघटनांशी संपर्क साधत होता आणि त्यास दिल्ली पोलिसांनी अटक केली .

 आता कोबाद ची थोडक्यात ओळख झाली असेल पण खरोखरच कोबाद कोण आहे

कोबाद घांदी हे १९४७ मध्ये मुंबई मधील नर्गिस व अदी घांदी ह्या उच्च मध्यमवर्गीय पारशी दांपत्याच्या पोटी जन्माला आले. वडील अदी घांदी हे ग्लॅक्सो ह्या बहुराष्ट्रीय औषध निर्माण कंपनीत वित्त संचालक ह्या पदावरून सेवा निवृत्त झाले होते तर आई नर्गिस हि पाकिस्तानात असणाऱ्या मुररे ब्रेवरी ह्या प्रसिद्ध उद्योग समूह असणाऱ्या कुटुंबातुन होती. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण हे जगप्रसिद्ध डून स्कूल मधून झाले तेथील शिक्षण काळात संजय गांधी ,कमलनाथ ,नवीन पटनाईक हे  प्रसिद्ध राजकीय नेते तर गौतम व्होरा व इशात हुसैन यांच्या सारखे भारतीय खाजगी उदयॊग क्षेत्रातील प्रसिद्ध मान्यवर त्यांचे सोबती व वर्गमित्र  होते. डून स्कूल मधून शालेय शिक्षण तर मुंबईतील झेविअर्स या महाविद्यालयांतूनरसायन शास्त्रात बी एस्सी केल्यावर १९६८ मध्ये ते लंडनला सनदी लेखापाल होण्यासाठी गेले तेथील वास्तव्यात त्यांचा परिचय डाव्या विचारसरणीशी घडला व त्याच दरम्यान लंडन मधील वर्ण द्वेषाचा अनुभव आला व या  वर्ण द्वेष आणि भांडवलशाही  विरुद्ध आवाज उठवण्यासाठी चौक सभा घेतल्या प्रकरणी लंडन कोर्टात ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा पण भोगावी लागली .तिथून एका सुखवस्तू कुटुंबातील उच्च शिक्षित कोबाद चा  प्रवास हा मार्क्सवादी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून सुरु झाला . त्याची परिणीती त्यांनी १९७२ मध्ये सनदी लेखापालची पदवी न घेता मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला . 

६०-८० चे दशक हे जगात सर्वत्र वेगवेगळ्या चळवळीचे दशक मानले जाते . त्याकाळीतील  भारतात देखील बऱ्याच राजकीय ,सामाजिक घडामोडी आणि उलथापालथी घडत होत्या ,प्रथापितांविरुद्ध संघर्ष सुरु झाला त्यात महाराष्ट्रात दलित पॅन्थर च्या दलित पॅन्थर ने २५ वा स्वातंत्र्यदिन हा काळा  स्वातंत्र्य दिन म्ह्णून साजरा केला होता  तर नामदेव ढसाळ आपल्या जहाल शब्दातून व्यवस्थेविरुद्ध अंगार फुलवत होत्या त्याच्या "तुझे बोट धरून चाललो आहे" कवितेच्या खालील ओळी विद्रोहाचा प्रत्येय आणून देतात.

 

हा भाकरीचा जाहीरनामा

हा संसदेचा रंडीखाना

ही देश नावाची आई

राजरोस निजते कुबेराच्या सोबत

किंवा

तेच तेवढे आले आईच्या उदरातून ?

बाकीचे कुत्रा मांजराच्या

विद्रोही चळवळीने जोर धरला होता तसा तो कालखंड हा रोमँटिसिसम चा कालखंड मानला जातो ,जगातील तरुणाई ही  डाव्या चळवळीच्या मोठ्या प्रमाणात आकृष्ट झाली होती हे रोमँटिसिसम म्हणजे किती तर २०१० च्या प्रकाश झा यांच्या  " राजनीती " ह्या चित्रपटातील भारती राय ह्या युवतीने कॉ भास्कर सन्याल यांच्या नेतृत्त्वाखाली झेंडा घेऊन ज्या प्रमाणे आपल्या मुख्यमंत्री वडिलांच्या राजकीय प्रचार सभेतच बंडाचा झेंडा धरला होता त्याप्रमाणे ह्या चित्रपटातील दाखल्या  व्यतिरिक्त वास्तविक उदाहरण द्यायचे झाले तर काल परवा बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपा चे स्टार प्रचारक व कोब्रा असणारे श्री मिथुन चक्रवर्ती हे देखील नक्षलवादी चळवळीशी संबधीत होते तर असे एकदा ऐकले होते कि श्री गडकरी (रॊडकरी ) साहेबांना देखील ह्या चळवळीचे आकर्षण होते.

ह्या सर्व भारावलेल्या कालखंडात कोबाद ने  प्रोग्रेससीव्ह युथ मोव्हमेंट (प्रोयोएम/PROYOM ) तर्फे रुईया महाविद्यालयात घेण्यात "वैकल्पिक विद्यापीठ" (Alternative University ) च्या उन्हाळी  वर्गांना हजेरी लावली . ही प्रोग्रेससीव्ह युथ मोव्हमेंट (प्रोयोएम/PROYOM ) नक्षलवाद्याशी संबधित असणाऱ्या जनशक्ती ह्या संघटनेचे एक अंग होते त्यातून कोबाद चा परिचय दलित पॅन्थर , आव्हान ह्या संघटना बरोबर होत घेला त्यातून त्याने समाजातील दबलेल्या वर्गासाठी काम करण्याकरिता वरळीतील मायानगर ही दलित बहुल झोपडपट्टीतील मुलांसाठी तो वर्ग घेऊ लागला तसे त्याकाळी मुंबईत चालणाऱ्या कामगार चळवळीच्या देखील तो संपर्कात होता . दरम्यानच्या काळात कोबाद चा अनुराधा शानभाग ह्या एल्फिन्स्टन कॉलेज मधील विदयार्थी नेता असणाऱ्या समविचारी युवतीशी परिचय झाला दोघांचे एकमेकांवर प्रेम जुळले व त्यांचा प्रेम विवाह झाला . कोबाद आणि अनुराधा ही जोडी तशी एकमेकांना अनुरूप अशी जोडी होती अनुराधाच्या घरची पार्श्वभूमी ही  खुल्या व कम्युनिस्ट विचारसरणीची त्यामुळे तीही मुंबईतील त्या काळात घडणाऱ्या चळवळीत हिरहिरीने सहभागी होती . याव्यतिरिक्त ती देखील समाज शास्त्राची द्वि पदवीधर होती व पुढे ज्यावेळी ह्या दाम्पत्याने १९८२ ला नागपूर मध्ये स्थायिक व्हायचा निर्णय घेतला त्या वेळी तिने नागपूर विद्यापीठात प्राध्यापकी पण केली.

१९८२ नागपूर ते पुढील १५ वर्षे नंतर अनुराधाचे २ वर्षे बस्तर मध्ये अधिवास  तेथील आदिवासी स्त्रियांसाठी वर्ग  व त्यात तिला झालेल्या फाल्सीपेरम मलेरिया या रोगाची लागण व पुढे २००८ ला मुबंईत स्केलरॉसीसने निधन आणि २००९ ला कोबाद ला अटक व पुढे दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून ओळखला जाणाऱ्या यूएपीए (Unlawful Activities Prevention Act),भारतीय दंडविधान संहिताच्या (IPC ) कायद्याच्या वेगवेगळ्या कलमाखाली पुढील १० वर्षासाठी तुरुंगवास भोगावा लागला .

 खरोखरच कोबाद काही देश विघातक कारवाया करत होता का ? त्याच्यावर भारताच्या विविध राज्यात दाखल करण्यात आलेले गुन्हे सिध्द झालेत का ?कोबाद खरोखरच या सर्व तुरूंगवासास पात्र होता या सह भारतीय राज्यघटनेत नमूद करण्यात आलेले मूलभूत हक्क खरोखरच देशातील सर्व नागरिकांत समान आहेत कि ज्याप्रमाणे जॉर्ज ऑर्वेल च्या ऍनिमल फार्म ह्या कादंबरीत नमूद केले आहे त्याप्रमाणे "All are equal some are equal" ही परिस्थिती आहे की संविधानाच्या सरनाम्यात आश्वासित केलेल्या  न्याय ,समानता,स्वातंत्र्य , व बंधुत्व या मूल्यांवर आधारित सार्वभौम ,समाजवादी ,धर्मनिरपेक्ष व लोकशाही संघराज्य   आहे.

खरोखरच सर्वाना न्याय मिळतो का आणि कोबाद ला न्याय मिळाला का या आणि अधिक माहिती साठी जरूर वाचा

फ्रॅक्चरेड फ्रीडम प्रिझन मेमॉयर- कोबाद घांदी (Kobad Ghandy )

Monday, February 8, 2021

चेकमेट हाऊ बीजेपी वन अँड लॉस्ट महाराष्ट्र

 




चेकमेट हाऊ बीजेपी वन अँड लॉस्ट महाराष्ट्र (Checkmate: How the BJP Won and Lost Maharashtra)


चेकमेट हाऊ बी जे पी विन अँड लॉस्ट महाराष्ट्र हे श्री सुधीर सुर्यवंशी लिखित २९६ पानी पुस्तक गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिक योग्य पणे सांगायचं झाल्यास महा विकास आघाडी सरकार स्थापनेचा विस्तृत आढावा घेणारे पुस्तक आहे .२०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात घडलेल्या राजकीय घटनाक्रमाचा धांडोळा घेणारी इंग्रजी भाषेत चेकमेट सह अजून कमलेश सुतार लिखित '३६ डेज : ए पॉलिटिकल क्रॉनिकल ऑफ अॅम्बिशन, डिसेप्शन, ट्रस्ट अॅण्ड बिट्रेयल' व जितेंद्र दीक्षित लिखित '३५ डेज : हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्र चेंज्ड फॉरेव्हर इन २०१९' पुस्तके आलीत .पण विचारांती चेकमेट ला अंतिम पसंती आणि पुस्तक माझ्या संग्रही आले.
महाराष्ट्राची १४ व्या विधानसभेची निवडणूक कार्यक्रम, प्रत्यक्ष मतदान व त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी रंगलेले राजकारणाचे विविध खेळ नी वेगवेगळ्या आघाड्या या सर्वासाठी ही निवडणूक सर्वार्थाने गाजली .
अर्थात निवडणुका ,मतदान ,सरकार स्थापना थोडक्यात लोकशाही चे हे अंग १९९६ च्या लोकसभा निवडणुकी नंतर थोडं थोडं समजायला लागलं आणि त्यात जास्त रस निर्माण व्हायला लागला . सुरवातीला आजच्या सत्ताधारी पक्षाच्या विचारांनी भुरळ घातली परंतु का कोण जाणे कालांतराने सर्वच पक्षीय विचारधाराचा तटस्थ पणे धांडोळण्यात अधिक रुची वाटू लागली . अगदी शेतकरी कामगार पक्ष ,हिंदू महासभा ,फॉरवर्ड ब्लॉक ते काँग्रेस ,बी जे पी ,शिवसेना ,भाकप ,माकप ,लाल निशाण पक्ष आणि अगदी तरुण असणारे मनसे नी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच पक्षाच्या ध्येय धोरणांचा ,राजकीय विचारांचा ,स्थापनेचा आणि उगमाचा,तडजोडीचा (पक्षीय ,राजकीय ),आघाड्यांचा थोडाबहू इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतोय .
भारताच्या राज्यघटनेचे स्वरूप संघराज्यिय स्वरूपाचे आहे त्यामुळे कदाचित नेशन (राष्ट्र ) विरुद्ध स्टेट (राज्य) हा कायमस्वरूपी भेद व वाद राहिला आहे .मग कधी त्याचे स्वरूप कधी भाषिक असते तर प्रांतिक अस्मितेचा असते त्या वादाचे पडसाद महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी उमटून गेले होते मुंबई सह महाराष्ट्र की मुंबई विना महाराष्ट्र असे असेल किंवा अजूनही सुरु असलेल्या बेळगाव ,कारवार,निपाणी व भालकी महाराष्ट्रात आल्याचं पाहिजेत किंवा वेगळा विदर्भ झालाच पाहिजे इथपर्यंत टिकून आहे . ह्या सर्व वादाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर व सत्ता सोपानावर सतत परिणाम झाले आहे कधी क्षमता असूनही योग्य पदासाठी महाराष्ट्रातील नेते डावलले गेले किंवा महाराष्ट्रात केंद्रीय नेतृत्त्वाला सोयीचे नेत्यांना नेतृत्व सोपवण्यात आले .
सर्वसाधारणपणे केंद्रात राजीव गांधी यांचे सरकार हे एकपक्षीय सत्ता व संपूर्ण बहुमत असणारे शेवटचं सरकार होते . त्या आधी कै मोरारजी भाई देसाई व चौधरी चरण सिंह यांच्या काळात केंद्रात आघाडीच्या राजकारणाचा प्रयोग (काँग्रेस विरुद्ध सारे ) असा झाला होता . पण १९८९ च्या ९ व्या लोकसभेपासून ते २०१४ च्या १६व्या लोकसभेच्या काळ हा केंद्रात आघाडीच्या सरकारचा आणि राजकारणाचा होता . तर महाराष्ट्राच्या विधानसभेत १९७८ च्या निवडणुकीपावेतो काँग्रेस ची एकपक्षीय सत्ता होती . अगदीच महाराष्ट्र्र टाइम्सचे तत्कालीन संपादक दिवंगत गोविंदराव तळवलकर यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास "हे राज्य जावे, ही श्री ची इच्छा" पासून ते "पाठीत खंजीर खुपसला" नी महाराष्ट्रात आघाडीच्या सरकारची स्थापना झाली .
१९७८ च्या श्री शरद पवार साहेब यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी निवड झाली . १९७८ ची निवडणूक आणि २०१९ ची निवडणूक थोड्याबहू अर्थाने काही साम्य स्थळे असणारी आहे . अर्थात आ. पवार साहेब हे नशीबवान नेते आहेत ते यासाठी कारण १९७८च्या निवडणुकीत जनता पार्टी हा ९९ आमदारांसह सर्वात मोठा पक्ष होता व जनता पार्टी तर्फे उत्तर महाराष्ट्रातीलच पैगंबरवासी निहाल अहमद (मालेगाव ) व स्व उत्तमराव पाटील (पारोळा-भडगाव ) यांच्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच चालू होती पण पवार साहेबांनी बेरजेचे राजकारण करत या दोन्ही नेत्यांना आपल्या मंत्रिमंडळात सामील करून सरकार स्थापन करून टाकले व उत्तर महाराष्ट्रापासून दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पद दूर गेले . याही आधी कै भाऊसाहेब हिरेंना पण एकदा मुख्यमंत्री पदाने चकवा दिला होता .
अर्थात या निवडणुकींनी पवार साहेबांची विश्वासहार्यतेवर कायमस्वरूपी एक प्रकारचे प्रश्नश्चिन्ह निर्माण झाले तरीदेखील पवार साहेब सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत आणि अजूनही महाराष्ट्राच्या जनतेवर व राजकारणावर त्यांचा करिष्मा,गारुड टिकून आहेत.असे असले तरीदेखील कै .वसंतराव चव्हाण या वैदर्भीय नेत्यांचा अपवाद वगळता १३ व्या विधानसभेत श्री देवेंद्र फडणवीस हे वैदर्भीय नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होई पर्यंत कोणतेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ५ वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही अगदी स्व यशवंतराव चव्हाण साहेब देखील नाही . श्री देवेंन्द्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी टिकणारे पहिले बिन काँग्रेसी मुख्यमंत्री होते कारण याआधीचे सेना भाजप युतीच्या सरकारने आपला कार्यकाळ देखील पूर्ण न करता १९९९ मध्ये विधान सभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकी सोबत घेण्यासाठी श्री नारायण राणे यांनी आधीच राजीनामा दिला होता .
प्रस्तुत पुस्तक हे एकूण १८ प्रकरणात विभागले गेले आहे पुस्तकांची सुरवात ही अ रिसाऊंडिंग व्हिक्टरी या प्रकरणाद्वारे होते त्यात २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल आणि भाजपाला मिळालेले स्पष्ट बहुमत ,सर्व विरोधी पक्षांची झालेली पीछेहाट याचा आढावा आणि भाजपाचे जनमानसात घट्ट होत असलेले स्थान व टिकून राहिलेले मोदी लाट यावर भाष्य करते तर ,बर्थ ऑफ महाराष्ट्रा यात महाराष्ट्राची जन्मकथा ,संयुक्त महाराष्ट्राचा लढा व तेव्हा पासून रूढ झालेला मराठी विरुद्ध गुजराथी हा वाद पण अधोरेखित करते ,पुढे इमरजन्स ऑफ शिवसेना या प्रकरणात शिवसेनेची स्थापना व वाटचाल . तत्कालीन मराठी माणसाची मुंबईतील स्थिती यावर अगदी मुंबईतील गुजराथी भाषिकांकडून वापरण्यात येणाऱ्या भांडी घासा आमची बॉम्बे घ्या तुमची हे समर्पक विधान वापरात स्पष्ट केली आणि त्यातून पुढे शिवसेनेच्या वेळोवेळो घेतलेल्या भूमिका ही सांगितल्या आहे . अगदी सेनेचा कम्युनिस्टा बरोबर असलेला वाद ,परळचे आमदार कृष्णा देसाई यांचा खून, सेनेची वसंत सेना ही संभावना ,सेना व काँग्रेस यांची राजकीय जवळीक करिअप्पा यांना दिलेला पाठिंबा , पुढे सेनेने धरलेली हिंदुत्त्वाची कास रिडल्स चे प्रकरण असेल किंवा मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीच्या काळात गाजलेली घरात नाही पीठ कशाला हवे विद्यापीठ ही भूमिका असेल या सर्वांचा आढावा घेत २०१९ च्या निवडणुकीत ठाकरे घराण्यातील श्री आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे राहिल्या केम छो वरली म्हणत मतांचा मागलेला जोगवा असेल या सर्वावर प्रकाश टाकला आहे .

युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असते त्या प्रमाणे राजकारणात ही कोणी कोणाचा काही कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू राहत नाहीत . अगदी शिवसेनेची मुंबईत काही काळासाठी मुस्लिम लीग सोबत युती होती (त्यासंदर्भात वंदनीय बाळासाहेबांनी जि एम बनातवाला यांच्या सोबत व्यासपीठावरून प्रचार करतानाचे छायाचित्र राज ठाकरे यांनी प्रकाशित केलेल्या फोटो बायोग्राफीत आहेत ) .शिवसेनेनं हिंदुत्वाची कास धरल्यावर भाजपाशी नैसर्गिक युती झाली पण २०१४ च्या १९८५ मध्ये आधी एकदा भाजपा सेनेला एकटे सोडून पवार साहेबाच्या समाजवादी काँग्रेस सोबत गेल्याचा इतिहास आहे . कदाचित ह्याच १९८५ च्या संबंधातून २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेस ने भाजपाला महाराष्ट्रातील सरकार स्थापन करायला मदत केली असेल का ?

या सर्वांसह अजित दादा पवार यांच्या वर बऱ्याच विस्तृत पणे लिहलेलं आहे व अजित दादा यांच्या वर पवार साहेबांचे प्रेम अधोरेखित करणारे राजकारण गेले चुलीत मला माझा अजित पाहिजे हे खुमासदार तितकेच हृदयस्पर्शी वाक्य देखील चपखल पणे पेरले आहे

पुढे २०१४ च्या भाजपा व राष्ट्रवादीच्या सत्ता स्थापनेच्या चर्चा ,पुन्हा एकदा २०१७ मध्ये भाजपा राष्ट्रवादी यांची एकत्र येण्याची तयारी व या सर्वात अजित दादा यांचे फडणवीस यांच्या सोबत पहाटे ५ वाजता सरकार स्थापन करण्याचा निर्णय यांचे मूळ . याच सह आमदाराची झालेली पळवापळवी हरियाणातून राष्ट्रवादीच्या आमदाराची सुटका ,जयपूरला पंचतारांकित रिसॉर्ट मध्ये पिठले भाकरी मागणाऱ्या आमदारांचा खुमासदार किस्सा यासाठी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे .

या पुस्तकांच्या लेखकाविषयी मला थोडे विस्तृत पणे लिहावेसे वाटते कारण श्री सुधीर सूर्यवंशी हे डीएनए ह्या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करत होते परंतु आर्थिक कारणामुळे २०१९ मध्ये डीएनएने त्यांच्या छापील आवृत्या बंद करण्याचा निर्णय घेतला व त्यामुळे श्री सुधीर नोकरीतून बाहेर पडले . वृत्तपत्र बंद होण्यामुळे ते नुसते नोकरीतून बाहेर पडले नव्हते तर त्यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा पत्रकार म्हणुन मागोवा घेण्यापासून वंचित करणारी ही घटना होती . पण म्हणतात इच्छा असेल तर मार्ग असतो . त्या इच्छेला साथ मिळाली समाजमाध्यमाची त्यांनी ट्विटर वर कट्टान्यूज हे हँडल सुरु केले त्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीच्या वार्ताकंनाची सुरवात केली .ह्याच कट्टा न्यूज च्या माध्यमातून २० नोव्हे २०१९ रोजी दुपारी ०१:०६ वाजता केल्या ट्विट द्वारे अजित दादा हे राष्ट्रवादीतून ३५ आमदारांसह बाहेर पडून भाजपा सोबत सरकार स्थापन करणार हे जाहीर करण्यात आले होते आणि नंतर घडला तो सर्व इतिहास आपल्या सर्वांसमोर आहेच .


Like
Comment
Share

Monday, January 11, 2021

अंगार मळा


अंगारमळा 

शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन करार आणि कृषीसेवा करार विधेयक २०२०(The Farmers (Empowerment and Protection) Agreement on Price Assurance and Farm Services Act, 2020 ) , 'कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२० (Farmers’ Produce Trade and Commerce (Promotion and Facilitation) Ordinance, 2020) व अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, २०२० (Essential Commodities (Amendment) Act, 2020 ) असे तीन कायदे भारतीय संसदेने आवाजी मतदानाने मंजूर केले . द वायर ह्या संकेस्थळाच्या संदर्भानुसार भारतीय संसदेने ४ तासाच्या कालावधीत ७ विधेयके संमत करून घेतली , मनाला थोडी सुखावणारी भावना होती . अगदी गेली ६०-६५ वर्षे गोगलगायीच्या गतीने रांगणारे भारताचे कायदे मंडळाने मनापेक्षा (माझ्या मते जगातील सर्वात वेगवान गोष्ट ही मन आणि मनाचे विचार आहे कारण ते काही निमिष स्थिर राहू शकतात अन्यथा फुल पाखरा प्रमाणे ते बागडत असतात) जास्त वेगाने निर्णय घ्यायला सुरवात केली . परिणाम स्वरूप गेल्या अडीच ते तीन महिन्यापासून राष्ट्रीय राजधानीच्या (नवी दिल्लीच्या) विविध सीमा वरून होणारी वाहतूक पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यातील साधारणत ४०० हून अधिक शेतकरी संघटनांनी अडवायला सुरुवात करून दिल्ली भोवती सर्व बाजूंनी पाश आवळायला सुरुवात केली आणि आज रोजी देखील ते पाश सुटायचे नाव घेत नाहीये तर दिवसेंदिवस गहिरे होत चालले आहेत.

अर्थातच आजच्या ह्या सर्व लिखाणाचा उद्देश हा कृषी कायदे कसे चांगले किंवा वाईट आहेत, सध्याचे केंद्रातील सरकार उत्तम आहे वा टाकावू आहे . याबद्दल तर अजिबातच नाही कारण आपण अस्मादिक काय लय तोफ लागून गेलेला नाही किंवा सूर्याच्या खाली दिसणाऱ्या आणि घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर आपले मत मांडले पाहिजेच नी असेलच पाहिजे,पण काय करतात पुण्यात आल्यापासून नी सदाशिव पेठेत शिकल्यामुळे,  प्रत्येक गोष्टीत आपल्या  प्राप्त माहितीतून मांडलीच पाहिजे ना …

असो अर्थात गेल्या अडीच ते तीन महिन्यापासून सुरू असणाऱ्या ह्या आंदोलनाने बऱ्याच चर्चा चरवितचर्वण सुरू झाले आहे . आम्हा भारतीयाचा सर्वात आवडता एक छंद म्हणजे प्रत्येक गोष्ट इतिहासाशी पडताळून पाहायला खूप सुख वाटतं अमक्याच्या काळात एवढा मोठा मोर्चा झाला होता . अमक्याने तमक्याला अशी धोबी पछाड देऊन खाली लोळवले होते , तमक्याने रेकॉर्ड ब्रेक उपोषण केले की त्यांची चक्क गिनीज बुकमध्ये नोंद झाली,कोणी तरी कोणालातरी कात्रजचा घाट दाखवला होता इत्यादी इत्यादी .अजून सध्या चालू असलेल्या शेतकरी आंदोलनात कसे अतिरेकी सामील झालेले आहेत त्यांना विदेशातून निधी येतो आहे . शेवटी हे शेतकरी कसे पंचतारांकित सुविधा उपभोगत आहे आणि बरेच काही  .  


ह्या सर्व चर्चा सुरू असताना महाराष्ट्रामधील एका दिवंगत शेतकरी नेतृत्वाची पण चर्चा सुरू झाली , की ते जर आज असते तर काय झाले त्यांनी काय निर्णय दिला असता.  त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रातील  शेतकरी पेटून उठले असते की सत्ताधाऱ्याच्या सुरात सूर मिसळला असता पण म्हणतात इतिहासात जर तर ला स्थान नसते . कदाचित म्हणूनच दिवंगत व्यक्ती व्यक्ती शरीराने वर्तमानात नसली तरी त्यांच्या विचार त्यांनी लिखित साहित्य रूपात शिदोरी  पिढ्यान् पिढ्या मार्ग दर्शन करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे .

ह्या सर्व परिप्रेक्षात शेतकऱ्याचे पंच प्राण असणारे दिवंगत कै.शरद जोशी यांचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील शेतकरी चळवळ आणि तिचे नेतृत्व यांचा इतिहास पूर्ण होऊच शकणार नाही .म्हणूनच त्यांचे लिखाण वाचावे  व त्यातून काही त्यांच्या विचारांचा त्यांनी तत्कालीन घेतलेल्या भूमिकांचा ,व्यवस्थेशी केलेल्या संघर्षाचा धांडोळा घेण्यासाठी  अंगारमळा ह्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा आत्मकथन विभागासाठी प्रथम पुरस्कार प्राप्त झालेल्या पुस्तकांची मी निवड केली . तसे कै शरद जोशी ह्यांच्या बद्दल माझ्या संग्रही अंगारमळा व्यतिरिक्त श्री .भानू काळे लिखित अंगारवाटा शोध शरद जोशींचा व वसुंधरा काशीकर लिखित शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा हे देखील आहेत .

तसे पाहता अंगारमळा व अंगारवाटा शोध शरद जोशींचा  हे माझ्या संग्रही २०१८ पासून होते . वेळ मिळेल तेव्हा किंवा काही संधर्भ लागला की तुकड्या तुकड्यात वाचले पण म्हणतात बैठक मारून एका बैठकीत पुस्तक संपविण्याचा आनंद काही औरच त्या शिवाय ते पुस्तक वाचल्याचा व रिचवल्याचा आनंद येतच नाही ना . म्हणून गेल्या आठवड्यात ही दोन्ही पुस्तके उचलेली आणि वाचून फडशा पाडला . तसे अंगारमळा हे स्वतः शरद जोशींनी लिहलेले १९ प्रकरणे आणि १९३ पाने असणारे छोटेखानी आत्मकथन ह्यात शेतकरी संघटनेचे नियतकालिक असलेल्या 'साप्ताहिक ग्यानबा ' व 'साप्ताहिक वारकरी ' यातील काही राहून गेलेले लेख आहेत . ज्यात शेतकरी संघटनेची सुरवातीची जडणघडण एक सनदी अधिकारी ते शेतकरी नेता आणि त्या वाटचालीत लाभलेले सहकारी यांच्या आठवणी आहेत .


मुळात अंगारमळा वाचताना बरेच प्रश्न पडले की का ह्या व्यक्तीला आपल्या सरळधोपट मार्गाने आणि अगदी सुखासीन पद्धतीने विदेशातील (स्वित्झर्लंड मधील ) नोकरी सोडून भारतात येऊन चाकण जवळ २५ एकर शेती घेऊन त्यात प्रयोग करावेसे वाटले असतील काय असेल मानसिकता.  कारण शरद जोशी हे काही साधेसुधे नव्हते व्यक्तीमहत्व नव्हते अगदी ज्या काळात भारतात सुशिक्षितांचा वानवा त्या साठीच्या दशकात ते सिडनहॅम महाविद्यालयातून कॉमर्स शाखेत द्विपदवीधर झाले होते आणि अगदी महाविद्यालयीन शिक्षण संपताच केंद्रीय लोकसेवा आयोगाची सनदी सेवेची कठीणतम् परीक्षा ते उत्तीर्ण होऊन भारतीय टपाल सेवेतील अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली होती व पुढे ह्याही सेवेचा राजीनामा देऊन स्वित्झर्लंड येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियन मध्ये नोकरी देखील रुजू झाले होते. कदाचित असेल खतरो से खेलने का शौक म्हणून दिला असेल का राजीनामा आणि असतील का भारतात ,की खरंच भारतातील शेतकऱयांचे जीवनमान त्यांना उंचवायचे असेल असेलही .

साधारण २००६ साली राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला . त्या पक्षाच्या ब्लू प्रिंट प्रमाणे राज ठाकरेंना अभिप्रेत असलेला शेतकरी हा जीन्स टी शर्ट मधला पण कदाचित ब्लू प्रिंट तयार करणाऱ्याला कदाचित शरद जोशी माहित नसावे किंवा त्यांचा उल्लेख टाळायचा असावा . नुकतेच विदेशातून आल्यामुळे अगदी पूर्ण वेळ शेतकरी म्हणून शेती करत असताना देखील सुरवातीचे बरेच वर्षे शरद जोशी जीन्स टी शर्ट मध्येच वावरत होते . अगदी बऱयाच सहकार्यांनी सल्ला देऊन देखील त्यांनी तो पेहराव बदलला नव्हता .   


अगदी शरद जोशीनी शेती व्यवसायाबद्दल मते व्यक्त करताना लिहून ठेवले आहे कि

जगातील पहिला व्यवसाय शेती हाच आहे . प्रकृती आणि मनुष्य एकत्र आल्यावर तो निर्माण झाला . पंच महाभूतांच्या लक्षावधी वर्षाच्या साठलेल्या ऊर्जा माणसाच्या श्रमाचा स्पर्श होताच गुणाकार करीत फळाला येतात . एका दाण्यातून शंभर दाणे तयार होण्याचा चमत्कार शेतीच होतो . ज्या दिवशी हे लक्षात आले ,त्या दिवसापासून शेतीमध्ये तयार झालेली हि बचत लुटून न्यायला सुरवात झाली . आज पर्यंतच्या इतिहासाची खरी प्रेरणा हि शेतीमध्ये होणार गुणाकार लुटण्याची आहे .

कदाचित ह्या सर्व लुटी पासूनच त्यांना शेतकऱयाला वाचवायचे असेल काहो कि अजून काही असेल त्यांच्या मनात .ह्या सर्वासाठी आणि किंबहुना याहून अधिक मला भावलेल्या खालील दोन प्रकरणासाठी अंगारमळा जरूर वाचा

प्रकरण ११ :एका कामगार चळवळीचा अंत : हे प्रकरण कै. कामगारनेते दत्ता सामंत यांच्या शरद जोशी व शेतकरी संघटनेशी असलेल्या नात्यावर आहे .

प्रकरण १७:'अनिल ' जादूच्या दिव्यातील राक्षस : हे पूर्वश्रमीचे राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे नंतर शेतकरी संघटनेत आलेले आणि आजच्या वर्तमानात महाराष्ट्रात लोकसंग्राम नामक पक्ष चालवणाऱ्या श्री अनिल अण्णा गोटे यांच्यावर बेतलेलं आहे . हे प्रकरण वाचून अगदी थक्क व्हायला होते कारण मला श्री गोटे माहिती पडले ते तेलगी घोटाळ्यामुळे पण हे नव्हते माहित कि त्यांनी त्यांच्या पूर्वायुष्यात एवढा मोठा संघर्ष केला आहे .प्रसंगी लाठ्याकाठ्या खाल्या आहेत . अगदी शरद जोशी त्यांना बहिर्जी नाईक यांची उपमा देतात असेलही कारण पुस्तकात लिहल्या प्रमाने जे छगन भुजबळ साहेब १९९१-९२ साली काँग्रेस मध्ये गेले व त्यांना शिवसेनेतून फोडण्याचे श्रेय आदरणीय पवार साहेबांना मिळाले ते श्रेय श्री अनिल गोटे यांना १२ डिसेम्बर १९८७ रोजीच मिळाले असते जर श्री भुजबळ त्यांना येऊन मिळाले असते .





Monday, December 21, 2020

राडा


 राडा 

भाऊ पाध्ये लिखित ही माझ्या वाचनात आलेली दुसरी कादंबरी, १९७५ साली फॉरवर्ड पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या कादंबरीला १९९७ साली जेव्हा अक्षर प्रकाशनाने पुन्हा प्रकाशित केली तेव्हा प्रसिद्ध मराठी लेखक , देशीवादाचे जनक , खंडेराव, पांडुरंग सांगवीकर या नायकाचे जन्मदाते श्री भालचंद्र नेमाडे यांनी प्रस्तावना लिहली आहे व त्यांच्या मते राडा ही लघु कादंबरी आहे.

तशी ही भाऊ पाध्ये लिखित लघु कादंबरी त्यांच्या वासूनाका, करंटा व बॅरिस्टर धोपेश्वर या पुस्तका नंतर प्रकाशित झालेली आहे .त्यातील वासूनाका या कादंबरी वर त्या काळात बरीच चर्चा झाली होती अगदी प्र. के. अत्रे यांनी त्यातील अश्लीलते बद्दल अगदी टोकाची टीका केली होती . परंतु वासूनाका ला देखील विजय तेंडुलकर, दुर्गा भागवत, दिलीप चित्रे या सारख्या दिग्गजांची समीक्षा लाभली आहे.

तसे भाऊच्या कादंबऱ्या ह्या तत्कालीन वास्तवतेचे दर्शन घडवणाऱ्या व तेव्हाही आणि आज देखील त्याज्य मानल्या गेलेल्या मानवी भाव भावना , लैंगिकता , कौटुंबिक नातेसंबधांची विण एकमेकांविषयीची आकर्षणे , लज्जा व खोट्या सामाजिक प्रतिष्ठेपोटी मनातील भावनांचे घोटले जाणारे गळे या भोवती विणलेल्या आहेत व ते कितीही नाकारले तरी वास्तव आहे.

असो राडा ही लघु कादंबरी त्यावेळी तशी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. शिवसेनेने प्रकाशकास ह्या कादंबरीच्या प्रती विक्रीस आणण्यास मनाई केली होती . अर्थात ही सेना स्टाईल आहे .कारण प्रस्तुत कादंबरीची गुंफण ही औद्योगिक संबंध, कामगार संघटना मधील रस्सीखेच , त्या काळात उदयोन्मुख असणाऱ्या शिवसेनेच्या शाखा व सदानंद अन्नेगिरी ह्या मराठी उद्योजकाचे एकमेव वारस असणाऱ्या मंदार अन्नेगिरी ह्या रोमँटिसिझम मध्ये असणाऱ्या वांड युवकाचा शिवसेना शाखा प्रमुख श्री नाना खारकरशी आणि गोरेगावातील शिवसैनिक यांच्या शी उघड उघड पंगा या सर्व बाबी वर ह्या कादंबरीचे कथानक बेतले आहे.

तसे शिवसेनेच्या रोषाचा साहित्यिका मध्ये श्री विजय तेंडुलकर यांना देखील घाशीराम कोतवाल या नाटकाच्या वेळी सामना करावा लागला होता . अर्थात त्याचा ह्या पुस्तक प्रकाशनाशी व कथेशी काहीही संबंध नाही.

हे पुस्तक मुळी वाचावे कश्यासाठी तर मानवी भाव भावना, नाते संबंधाची वीण , ६० ते ७० च्या दशकातील युवा पिढीतील रोमँटिसिझम त्यांचे उजवे डावे की अजून काही वेगळे  राजकीय विचार धारा वर होणारे हिंदोळे त्यांच्या मनात चालणारे कल्लोळ , उद्योग घराण्यात जन्माला येऊन पण वांड पणात रमणारा मंदार ह्या नायकाचा आयुष्यात नशेत असताना एक अगदी टोकाची घटना घडते आणि मंदार अंतर्बाह्य हादरतो ?? की त्यामुळे त्याच्या वांड व्यक्तिमत्वाला खोट्या सामाजिक प्रतिष्ठेचे वेसण घातले जाते की त्याला त्याचे नाईलाजाने जोखड म्हणून आयुष्य भर वागवावे लागते यासाठी जरूर वाचा "राडा"

माझ्या मते ह्या कादंबरीच्या कथानकावर एक झक्कास सीरिज बनू शकते.


#भाऊपाध्ये

#राडा 

#बुकरिव्ह्यू

#कादंबरी

Sunday, November 29, 2020

करंटा



करंटा

करंटा ही भाऊ पाध्ये लिखित साठीच्या दशकातील कामगार चळवळ, तत्कालीन कामगार नेत्यांचे आयुष्य , कामगार चळवळीच्या कार्यात झोकून घेणारे आणि स्व ताची नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची या कामगार चळवळीसाठी नी पक्षाच्या कामगार संघटने साठी आहुती देणाऱ्या फुल टायमर कार्यकर्ता असणाऱ्या शांताराम वहिले उर्फ आझाद चाचा या पात्रा भोवती विणलेली एक अप्रतिम कादंबरी .

तसा कामगार चळवळ आणि कामगार संघटना   जगताशी. जी तोंड ओळख झाली ती एम .बी. ए .एच आर  झाल्यानंतरच व एच आर म्हणून औद्योगिक क्षेत्रात काम करायला लागल्यावर . त्यातून या क्षेत्राबद्दल जिज्ञासा जागृत झाली नी मग त्या अनुषंगाने वाचन करायला लागलो . त्यातून विविध राजकीय विचारसरणीचा, नेत्याच्या नी त्यात सामावलेल्या आर्थिक विचाराच्या व गणिताचा परिचय घडायला लागला अगदी वेल्थ ऑफ नेशन चा स्कॉटिश निर्मात ॲडम्स स्मिथ असेल किंवा दास कॅपिटल चा निर्माता जर्मन निर्माताकार्ल मार्क्स असेल किंवा फ्रेडरिक अंगल्स असेल ह्या विदेशी तत्वज्ञा सोबतच बरीच भारतीय नावे देखील खुणावू लागलीत. त्यात प्रामुख्याने डाव्या पक्षातील कॉ डांगे , कॉम्रेड बगाराम तुळपुळे , कॉम्रेड बी टी रणदिवे , समाजवादी जॉर्ज फर्नांडिस, पी डिमेलो आणि बरेच नेते विचारवंत यांचे विचार अनुषंगिक पने वाचण्याचा व समजण्याचा प्रयत्न केला व करतोय वरील लेखक , विचारवंत , पुढारी यांचे लिखाण व विचार हे अनुभवा वर आधारलेले व जोखलेले तत्वज्ञान आहे . ती एक विचार धारा आहे .

परंतु कादंबरीचे विश्व हे सभोवतालात घडणाऱ्या घटना भोवती बेतलेलं असते नी त्या तील पात्र अगदी आपल्याशी बोलतात किंवा आपल्या भोवती अस्तित्वात असल्याचा अनुभव घडवून आणण्याचे काम करत असतात. कामगार संघटना किंवा कामगार चळवळ त्यांचे कुटुंब यांच्या जीवनावर होणारे परिणाम या देशोदेशी बरेच लिहले गेले .अगदी काल परवा डग्लस स्टुअर्ट ह्या अमेरिकी लेखकाने इंग्लंड मध्ये मार्गारेट थॅचर यांनी राष्ट्रीय उद्योगाचे केलेल्या खाजगीकरणामुळे स्कॉटलंड मधील ग्लासगो शहरातील माणुसकीत आलेल्या कुरूप तेचे दर्शन घड वणाऱ्या शगी बेन ह्या कादंबरीला यंदाचा साहित्य क्षेत्रात मानाचा मानला जाणारा बुकर पुरस्कार प्राप्त झाला आहे.

मुंबई मधील कामगार चळवळ आणि संघटना व त्यांचे फुल टायमर कार्यकर्ते हे देखील एक अजब जग होते म्हणजे संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते ह्यांनी संघटने कडून मिळणाऱ्या फुटकळ मानधनावर अगदी स्वतःचे अस्तित्व संघटनेच्या नावावर करून दिले होते. कदाचित आज हे शब्द काल सुसंगत आहे वाटते. परंतु तो जमाना होता निस्वार्थ निष्ठेचा , पक्षासाठी  अगदी सर्वस्वाचा त्याग करण्याचा आणि त्यासाठी देखील अहमिका लागलेली असे. अगदी दीवार (मेरा बाप चोर है वाला) ह्या सिनेमात दाखवलेल्या युनियन नेत्या प्रमाणे, करंटा ह्या कादंबरीतील आझाद चाचा हे देखील असेच एक पात्र की जे पक्ष कामगार संघटनेचे फुल टायमर कार्यकर्ते त्यांचा दिन रात एकच उद्योग म्हणजे कामगाराचे प्रश्न सोडवणे वेळी अवेळी अडल्या नडल्या कामगाराला मदत करणे. कामगाराचा प्रश्नासाठी लेबर ऑफिस, लेबर कोर्ट , इंडस्ट्रिअल कोर्ट यांचे उंबरठे झिजवने, गेट मीटिंगा घेणे , कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी संपाची तयारी करणे, संपा काळात कामगाराचे मनोबल टिकून राहण्यासाठी सतत जागृत राहणे . यासह अनेक लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे उद्योग आजाद चाचा करत होते.सुरवातीला चाचाच्या घरातून देखील या सर्वाला प्रोत्साहन तर होतेच .पण त्यांची मुलगी तारा, मुलगा कुमार , पत्नी मंजुळा यांचा सक्रिय सहभाग होता. परंतु काळानुरूप आझाद चाचाच्या कामगार संघटनेला लागलेली घरघर दिवसेंदिवस घटत जाणारी संघटनेची सदस्य संख्या व त्यामुळे अटलेला युनियनचा निधी. या सर्वाची परिणीती म्हणजे ह्या फुल टायमर च्या घरात दुरापास्त झालेले लक्ष्मी दर्शन व या सर्वाचा परिपाक म्हणजे परिवाराची झालेली फाटाफूट या मुळे आझाद चाचाने भोगलेली दुःख या सर्व माहिती साठी जरूर वाचा करंटा !!!!


#करंटा

#भाऊ #पाध्ये

#बुकरिव्ह्यू

#युनियन

#इंडस्ट्री

#इंडस्ट्रिअल #रेलेशन्स

#Industrial #Relations 

Monday, October 19, 2020

मी वाय सी


 मी वाय सी

तसं मी वाय सी दुसऱ्यांदा वाचायला घेतलेलं आत्मचरित्र पहिल्यांदा २००७–०८ मध्ये सार्वजनिक वाचनालय (सावाना), नाशिक चा सदस्य असताना वाचले होते. पण काही पुस्तके असतात वारंवार वाचावी अशी की जी मनाच्या कोपऱ्यात कायम स्थान करून बसलेली असतात जशी संधी मिळाली की डोकावतात आणि परत परत वाचायला उद्युक्त करत असतात त्या पैकीच एक मी वाय सी.

मी वाय सी हे मी मुंबई पोलिस दलाचे एक धाडसी आणि धडाडी चे अधिकारी होते . श्री.यादवराव पवार (वाय सी ) यांचे चरित्र परत वाचण्याचे आणखी एक कारण म्हणजे ते खानदेशातील त्यांचे मूळ गाव हे धुळे जिल्ह्यातील निमगुळ आहे  आणि मी स्वतः खानदेशातील असल्या मुळे म्हणा तो सॉफ्ट कॉर्नर मनाच्या कोपऱ्यात कायम असतोच नी आहे.

श्री वाय सी पवार यांनी त्यांच्या नोकरीची सुरुवात गुणवत्ता निरीक्षण विभागातून सुरू केली , पुढे ते राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास होऊन तहसीलदार ह्यां पदी निवड झाली पण तेथे जीव रमत नव्हता अंगावर वर्दी घालण्याचा शौक होता त्यामुळे पुन्हा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बसले  यशस्वी होऊन त्यांची पोलिस उपअधीक्षक पदी नेमणूक झाली .त्यांची पोलिस उपअधीक्षक पदी निवड झाल्या नंतर चा पोलिस प्रशिक्षण अकादमी तील प्रशिक्षण  काळा नंतर त्यांनी त्यांची पोलिस विभागातील कारकीर्द नाशिक जिल्ह्यात सुरू केली ही सर्व कारकीर्द १९७० च्या दशकातील त्यात त्यांनी सिन्नर शहरातील दंगल आणि तणावग्रस्त स्थिती यशस्वी पणे हाताळली . त्यावेळी नाशिक जिल्ह्यात गाजलेल्या शुभांगी सोहनी खून खटल्याचा तपास अतिशय काळजीपूर्वक करून या प्रकरणातील आरोपींना गजाआड केले.

नाशिक शहरातील त्यांची ही कारकीर्द बघून त्यांना नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे उभ्या महाराष्ट्रात जातीय दंगली आणि दोन धर्मातील तणावामुळे अशांत शहर अशी ओळख असणाऱ्या मालेगाव शहराच्या पोलिस उपअधीक्षक पदी बदली झाली आणि याचं मालेगाव शहरातील अनुभवांनी त्यांना परिपक्व बनवले.मग त्यातील मालेगावातील गणपती ची मिरवणूक असेल त्यात निर्माण झालेला तणाव ,माजी आमदार बरोबर चा पंगा आणि त्याच बरोबर त्यांना मिळालेले मालेगाव करांचे प्रेम. मालेगावातील यशस्वी २ वर्षाच्या कार्य काळानंतर त्यांची महाराष्ट्रातील विविध शहरात नी पोलिस विभागाच्या वेगवेगळ्या शाखेत बदल्या होत राहिल्या त्यांचा स्वभाव स्वाभिमानी असल्या मुळे शासनाचा आदेश शिरसावंद्य मानून ते त्यांची सेवा देत राहिले.त्यांच्या कार्य शैली मुळे त्यांना विविध पदे देखील मिळत कधी संघर्ष करावा लागला कधी न मागता मिळाले कधी डावलले गेले या सर्वाचा त्यांनी पुस्तकात खुलासा केला आहे .

वाय सी पवार हे तसे माझ्या पिढीच्या दृष्टीने असे जास्त ओळखीचे नाही कारण त्यांची कारकीर्द विसाव्या शतकाच्या सुरुवातीला संपली पण ह्या पुस्तकामुळे बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या जसे उल्हास नगर मधील रिंकू पाटील हिचे हत्याकांड ह्या प्रकरणा विषयी ऐकून होते कारण ते त्या हत्याकांडातील आरोपींनी वापरलेल्या मोडस ऑपेरांडी नुसार खूप भयंकर होती कारण एकतर्फी प्रेमातून आरोपीने एस एस सी बोर्डाची परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त असताना देखील ज्वालाग्राही पदार्थ टाकून रिंकू पाटील ला पेटवून दिले व त्यात तिचा मृत्यू झाला व पप्पू कलानी यांच्या समर्थकांनी घटना घडताच त्या स्थळाचे व्हिडिओ शूटिंग केले त्यातून प्रचंड तणाव निर्माण झाला होता. रिंकू पाटील प्रकरणानंतर त्यांचा मुंबई पोलिस दलात पोलिस उपायुक्त म्हणून प्रवेश  धारावी  सारख्या संवेदनशील भाग , अवैध दारू निर्मिती (हात भट्टी ची दारू ) आणि वरद राजन मुदलियार (विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित चा दयावान हा चित्रपट ह्याच्या आयुष्यावर बेतलेला आहे ) ह्या सर्वांशी एकहाती सामना त्याचं दरम्यान गुन्हेगाराकडून न्यायालयात खटले आणि पोलिस दलातील सहकार्याचा असहकार पण रिबेरो साहेब सारख्या वरिष्ठ नेतृत्व कडून झालेली पाठराखण व या संकटाचा बीमोडयाचं सह मुंबईच नव्हे संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या १९९३ बॉम्ब स्फोटाच्या कटाचा तपास आणि वाय सी यांचा त्यातील यशस्वी सहभाग पण काही चित्रपट आणि पुस्तके जसे हुसैन झैदी लिखित ब्लॅक फ्रायडे यांनी या प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून फक्त एका विशिष्ठ अधिकाऱ्याला फक्त श्रेय दिले आहे परंतु इतिहास तसा नसून त्या घटनेचा छडा लावण्यासाठी वाय सी यांचा सहभाग किती महत्वाचा आहे हे सर्व यातून समजते.

मुळात हे पुस्तक एका सीरिज साठी एक चांगला संदर्भ ठरू शकते यात शंका नाही


का वाचले पाहिजे

१.पोलिस दलातील अंतर्गत वाद

२. श्रेयासाठी पदकासाठी चे राजकारण

३. दलित असल्यामुळे भोगावे लागणारे त्रास


कोणी वाचले पाहिजे

१.पोलिस फक्त भ्रष्ट असतात असे मत असणाऱ्यांनी

२. पोलिसानं बद्दल प्रतिकूल मत असणाऱ्यांनी

३. प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी

#मीवायसी

#बुकरिव्ह्यू

#चिनारप्रकाशन

#IPS

एम्प्लॉयी रेलेशन्स डेमिस्टीफाइड रिअल लाइफ एक्सपेरियन्सस - जेकब वर्गीस

एम्प्लॉयी रेलेशन्स डेमिस्टीफाइड रिअल लाइफ एक्सपेरियन्सस - जेकब वर्गीस उद्योग धंदा (कारखाना व आस्थापना ) हे विविध विभागांच्या एकत्रित प्रयत्न...