Sunday, September 19, 2021

भुरा- प्रा शरद बाविस्कर

 


भुरा- प्रा शरद बाविस्कर


उत्तर महाराष्ट्रातील मुख्यत्वे नाशिक जिल्ह्यातील काही तालुके, धुळे, नंदुरबार व जळगाव हे भौगोलिक क्षेत्र अहिराणी भाषिक भाग म्हणून ओळखला जातो .तसा हा भाग सर्व साधारण पणे पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा भाग आहे . त्यामुळे तापी ,गिरणा,पांझरा व कान नद्यांच्या काठाचा गावांचा व जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक तालुक्यांच्या अपवाद वगळता इतर भागात शेती ही सर्वस्वी निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे व शेतीचे उत्पन्न हे अत्यल्प असून कारखानदारी व औद्योगिकीकरण देखील कमी प्रमाणात आहेत . त्यामुळे खाजगी क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकऱ्याची संधी देखील नगण्य प्रमाणात आहेत, त्यामुळे उपजिविकेसाठी व जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही . कदाचित ह्या संघर्षाच्या वृत्तीमुळे अहिराणी भाषिक ( खान्देशी) व्यक्ती देशात व विदेशात विविध क्षेत्रात जबाबदारीच्या पदावर आज विराजमान आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे.


कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याबरोबर त्या पदापर्यंत पोहचण्याचा संघर्ष त्यात आलेल्या अडीअडचणी ,खाच खळगे ,अनिश्चितता यावर मात केलेला हा संघर्ष पूर्ण प्रवास हे इतर सहपथिकांना पथ दर्शक ठरतो तसेच भविष्यात येणाऱ्या अडीअडचणींवर मात करण्यास मार्ग दाखवू शकते . त्यामुळे हा संघर्ष शब्दबद्ध होणे हे फार महत्त्वाचे असते .

भुरा हे आत्मचरित्र ह्याच अहिराणी भाषिक भागातील धुळे जिल्ह्यातील रावेर ह्या छोट्याशा खेड्यातील भुरा प्रवास आहे प्रथम वाचनानंतर मला ढोबळमानाने लेखकांचा हा आत्मचरित्र प्रवास मुख्यतः खालील भागात विस्तारलेला दिसतो .

१. रावेर ता -धुळे ते धुळे


२. धुळे ते लखनौ


३. लखनौ ते दिल्ली ते जे एन यू फ्रेंच विभाग


४. दिल्ली ते युरोप


५. युरोप ते जे एन यु मधील फ़्रेंच विभागात युवा प्राध्यापक 

अगदी थोडक्यात मांडायचे झाले धुळे जिल्ह्यातील गाळण टेकड्या पासून ते उत्तर भारतात दक्षिण अरवलीच्या डोंगर रांगात (व्हाया आल्प्सच्या पर्वतरांगा) स्वतःला घट्ट रोवण्याचा हा प्रवास आहे. जरी वरकरणी बघितला तर प्रवास जगण्याच्या संघर्षात भौगोलिक स्थलांतराचा वाटत असेल तरी त्याला वर्ग संघर्षाची किनार आहे ,समाजशास्त्राचे पैलू आहे व सरते शेवटी तत्वज्ञानाचा व वैचारिक बैठकीचा पाया आहे.

हा सर्व वर्ग संघर्ष नाही रे पासून आहे रे पर्यंतच प्रवास हा सर्व वाचकांना तसेच गावांगावात निश्चल अवस्थेत पडलेल्या भुरांना प्रेरणा देईल आणि त्या सर्व भुरांचा प्रवास शरद पर्यंत होईल यात तिळमात्र शंका नाही

२०१३ मध्ये लोकसत्ता ह्या वृत्तपत्रात प्रत्येक शनिवारी राजधानीवर मराठी मोहोर नावाचे एक सदर यायचे . ह्या सदरात मूळचे महाराष्ट्राच्या विविध भागातील मराठी भाषिक असणारे परंतु कामाधंद्यानिमित्त भारताच्या राजधानीत स्तिरावलेल्या यशस्वी व्यक्तिमत्त्वांचा प्रवास मांडला होता . यात महाराष्ट्राच्या विविध भागातील व्यक्तीमत्वात लोकसत्ताने माझ्या स्मृती प्रमाणे २ खानदेशीय व्यक्त्तींची लोकसत्ताने दखल घेतली होती एक होते पदमभूषण श्री राम सुतार (प्रसिद्ध शिल्पकार ) व दुसऱ्या होत्या श्रीमती अमिता बाविस्कर (लेखिका व प्राध्यापक पर्यावरण ,समाज शास्त्र व मानववंश शास्त्र विभाग ,दिल्ली विद्यापीठ).


आता किंवा येणाऱ्या भविष्यात किंवा कोणी जर अश्या महाराष्ट्रातून भारताच्या राजधानीत स्थलांतरित झालेल्या महाराष्ट्रातील यशस्वी व्यक्तीमत्त्वांचा इतिहास मांडेल त्यावेळी मला विश्वास आहे की तो इतिहास ह्या भूराची (प्रा शरद बाविस्कर ) यांची दखल घेतल्याशिवाय पूर्ण होऊच शकणार नाही.


लिखाणाच्या ओघात पुस्तकात बऱ्याच ठिकाणी काही इंग्लिश व फ्रेंच शब्द आणि वाक्ये आली आहेत तरी त्यांचे सर्व सामान्य वाचकाच्या सोयीसाठी मराठीत भाषांतर पुढील आवृत्तीत उपलब्ध करून द्यावे . या व्यतिरिक्त भुरा हे प्रा.श्री.शरद बाविस्कर यांचे आत्मचरित्र असले तरी त्यात त्याच्या वेगळ्या धाटणीच्या व्यवसायिक कारकिर्दीचा प्रवास आहे . त्यामुळे त्यांच्या पदव्या व त्या पदव्या कोणत्या संस्थातून मिळवल्या यांच्या बद्दल देखील माहिती देण्यात यावी त्यामुळे भुरा हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक करिअर गाईड म्हणून त्यांच्या भविष्याचा निर्णय घेण्यास सहाय्यक ठरेल.  

म्हणूनच सर्वांनी गावातील कच्ची वडांग पासून ते झिजीन मरानं ,पण थिजीन नहीं मरानं ह्या जीवनाचा संदेश देणारे भुरा हे आत्मचरित्र जरूर वाचावे .  



3 comments:

  1. 👌👌👌 छान.. खान्देशी ची ही वाटचाल नक्कीच उल्लेखनीय आहे.

    ReplyDelete

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...