Saturday, September 4, 2021

द लव्हर बॉय ऑफ बहवालपूर


 लव्हर बॉय ऑफ बहवालपूर   -राहुल पंडिता 

 

"गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त"  अमिर खुसरो च्या या पंक्ती वाचल्या तर एव्हाना सर्वांना भारतातील नव्हे जगातील स्वर्ग असणाऱ्या जम्मू काश्मिर ची आठवण जरूर झाली असणार ,पण भारताचे हे नंदनवन खरोखरच नंदनवन आहे की शापित नंदनवन आहे.

हे नंदनवन का शापित आहे त्याची कारण मीमांसा विविध अंगाने होऊ शकते . पण आजच्या पुस्तकाचा विषय काश्मिरात कायम अशांतता माजवण्यासाठी अहोरात्र चालविण्यात येणारे अतिरेकी कारवाया पैकीच २०१९ साली लेथपुरा (Lethpora) जिल्हा पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ( सि आर पी एफ ) वाहन ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची कहाणी आहे .

१९९० नंतर काश्मिरात अतिरेकी कारवायात लक्षणीय वाढ झाली त्याचा परिणाम म्हणून काश्मिर खोऱ्यातील  पंडित (काश्मीर खोरे -ज्यात १० जिल्हे आणि १५००० चौ किमी भूभाग येतो ) हे विस्थापित झाले . त्या काळात जे काही काश्मिरी पंडितांचे स्थलांतरण झाले ते कलाशिकानोव्हच्या (एके -४७ रायफली ) जोरावर घडवून आणण्यात आलेले . त्या काळात अतिरेकी कारवायांनी अगदी कळस गाठला होता भारताच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कन्येचे देखील ह्या अतिरेक्यांनी अपहरण केले होते . परंतु तदनंतर गेल्या  दशकांत काश्मिरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले .भारतीय भूमीवर काही राज्याच्या अपवाद वगळता बऱ्याच राज्यात देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न भूतकाळात होते आणि  काही राज्यात अजूनही आहेत त्यात बऱ्याच आंतरराष्ट्रीय शक्ती , शेजारील शत्रू राष्ट्रे सहभागी आहेत आणि त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे.अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानात बऱ्याच प्रकारचे (मानवी बॉम्ब , कार बॉम्ब .) आत्मघातकी हल्ले भूतकाळात झालेत .या आत्मघातकी अतिरेकी हल्ल्यात भारताच्या माजी पंतप्रधानांना पण त्यांचे प्राण गमवावे लागले .

तसा जम्मू काश्मिरात आत्मघातकी हल्ला हा प्रकार नवीन नाही किंबहुना २०१९ चा पुलवामा हल्ला घडण्याच्या अगोदर असे हल्ले झालेच नाहीत असेही नाही .२००१ मध्ये जैश  मोहंमद ह्या अतिरेकी संघटनने श्रीनगर मध्ये जम्मू काश्मीर च्या जुन्या विधान भवनावर स्फोटकांनी भरलेली सुमो कार द्वारे मोठा आत्मघातकी हल्ला घडवला होता . त्यात ३८ नागरिक मृत पावली होती . त्या हल्ल्याचे मास्टर माईंड तसेच हल्लेखोर हे पाकिस्तानी नागरिक होते .

लेखकाच्या पुस्तकातील निवेदनाप्रमाणे काश्मीरी व्यक्ती तसा खूप धाडसी वा आक्रमक नसतो . कारण पुलवामा हल्ल्यात हल्लेखोर वाचण्याची काडी मात्र शंका नव्हती . पण पुलवामा हल्ल्याच्या हल्लेखोर (ज्याने प्रत्यक्ष स्फोटकांनी भरलेली कार सी आर पी एफ च्या ताफ्याला जावून धडकवली ) हा भारतीय होता . .

१९८९-९० च्या अतिरेकी कारवाया पराकोटीला पोहचल्या होत्या बऱ्याच जणांना काश्मीर हा भारताच्या ताब्यातून जाणार ही शक्यता वाटायला लागली होती . त्याच स्वरूपाचे काहीशी अनिश्चितता ही काश्मीर खोऱ्यात २०१६ च्या जुलै महिन्यात आली होती . इंटरनेट वरील समाज माध्यमे (फेसबुकयुट्युब ,  इतरभारतातील इतर भागात रुजून तरुणाई ला आकर्षित करत होती आणि  तरुणाईचे  आयडॉल या माध्यमातून निर्माण व्हायला लागली होती . अनियमित  विस्कळीत इंटरनेट सेवा असून पण काश्मिर ची तरुणाई ही यात कोठेही मागे नव्हती . काश्मीरी अतिरेक्यांच्या पटलावर बुरहान वानी ह्या हिजबुल मुजाहिद्दीन ह्या अतिरेकी संघटनेच्या नवीन तरुण अतिरेक्यांचा उदय होत होता आणि त्याची मोडस ओपरेंडी ही परंपरागत अतिरेक्यापेक्षा काहीशी वेगळी होती.त्याने समाज माध्यम तून (फेसबुक   युट्युब द्वारे  ) प्रसिध्दी मिळवायला सुरुवात केली होती आणि त्याचा एक फॅन फॉलोवर वर्ग काश्मीर खोऱ्यात तयार झाला होता.  त्या प्रसिद्धीच्या परमोच बिंदू वर असताना ०८-जुलै -२०१६ ला तो एका लष्करी कारवाईत मारला गेला . त्या नंतर काश्मिरात हिंसेचा एक आग डोंब उमळला होता .लष्करी पथके ,अर्धसैनिक दले यांच्या वरील दगडफेकी च्या कारवायात लक्षणीय वाढ झाली होती . तदनंतरच्या हिंसाचारात १०० हून अधिक माणसे मृत्यू मुखी पडली तर १५००० माणसे जखमी झाली होती .

बुऱ्हान वानी च्या खात्म्यानंतर काश्मिरात आत्मघातकी हल्ल्याच्या घटना ह्या घडतंच होत्या मधल्या काळात उरी हल्ला आणि त्याचे प्रतिउत्तर ही भारतीय संरक्षक दलांनी दिले होते . उरी हल्ल्याच्या सर्जिकल स्ट्राइकवर अगदी सिनेमा पण येउन गेला होता . परंतु २०१९ चा सी आर पी एफ च्या ताफ्यावर जो आत्मघातकी हल्ला झाला तो इतका भयंकर आणि भीषण होता की अगदी ४० जवानाच्या शरीराच्या चिंध्या झाल्या होत्या आणि अवयव हे घटनेच्या संपूर्ण परिसरात विखुरले गेले होते . ज्या वाहनात स्फोटके भरून धडकवण्यात आले होते ते वाहन अगदी चक्काचूर झाले  त्यामुळे ह्या हल्लयांचे गूढ उकलने हे एनआयए ह्या तपास यंत्रणे समोरील एक मोठे आव्हान होते .

वरील सर्व आव्हान तपास यंत्रणेनं कसे पेललेले एनआयए चे कोण निष्णात अधिकारी होते की ज्यांनी घटनास्थळापासून काही अंतरावर मिळलेल्या एका किल्ली आणि अंगठ्याच्या साह्याने ह्या सर्व हल्ल्याचे गूढ उकलून काढलेप्रस्तुत पुस्तक अगदी आपणास गाझी बाबा (२००१ साली भारतीय ससंद भवनावर झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड ) याचा संरक्षक दलांनी कसा खात्मा केलाश्रीनगर मध्ये अतिरेक्यांना लपण्यासाठी कश्याप्रकारची भूलभुलैया रचना असणारी घरा अंतर्गत  गुप्त रचना असलेल्या जागा निर्माण केल्या जातात . याउपर वरील सर्व हल्ल्यासाठी आत्मघातकी हल्ल्यासाठी हल्लेखोरांची निवड कशी करण्यात आली . ह्या सर्व हल्ल्याच्या घटनेत वापरण्यात आलेला मोबाइल फोन हा ह्या हल्ल्याच्या ऑपेरेटरचे आदेश असूनही नष्ट करण्यात आला नाही  आणि तो मोबाइल संच तपास यंत्रणेला कसा मिळाला आणि त्यात तपास यंत्रणांना काय मिळाले,सर्व भारतीयाचा आवडता असा चर्चेचा मुद्दा बालाकोट सर्जिकल स्ट्राइक (ज्या वरून नंतर बरेच राजकारण ही रंगले ) ह्या आणि अजून सर्व तपशीलासाठी प्रस्तुत पुस्तक वाचणे हे जरुरीचे आहे .

 

हे पुस्तक २०१९ च्या सी आर पी एफ दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचे आणि तदनंतरच्या तपासाचे तसेच हल्ल्याच्या पार्श्वभूमीचे  त्या संबंधीच्या घटनांच्या बाबतीत एक निश्चित महत्वपूर्ण दस्तऐवज आहे यात काडी मात्र शंका नाही आणि असायचे काही कारण ही नाही . परंतु ह्या वेळी पुस्तक परिचय लिहिण्याच्या अगोदर मी पुस्तकाच्या लेखकाच्या बऱ्याच मुलाखती मी विविध समाज माध्यमात ऐकल्यात त्याच मुलाखतीतील एक स्मरणीय मुलाखत ही  वायर ह्या वाहिनीचे पत्रकार श्री करण थापर यांनी घेतलेली मुलाखत त्यांच्या ह्या पुस्तकाबद्दलच्या केलेल्या खालील विधानामुळे जास्त स्मरणात राहिली

Pandita has an incredible story to tell which some may find hard to believe. Others may be sceptical [...] But there will also be many who will accept Pandita’s detailed story

वरील करण थापर यांच्या विधानाचा स्वैर मराठी अनुवाद

पंडिताची (राहुल पंडितांची ) एक अविश्वसनीय कथा आहे ज्यावर काहींना विश्वास ठेवणे कठीण वाटेलइतरांना शंका असू शकते [...] पण असे बरेच लोक असतील जे पंडितांची तपशीलवार कथा स्वीकारतील 

राहुल पंडिता हे मुक्त पत्रकार असून त्यांचे हॅलो बस्तर (नक्षलवाद ) ,आवर मून हॅज ब्लड क्लाट्स (काश्मीर आणि काश्मिरी पंडित ) ही पुस्तके देखील वाचनीय आहे
  


 

Sunday, May 9, 2021

फ्रॅक्चरेड फ्रीडम ए प्रिझन मेमॉयर


 

फ्रॅक्चरेड फ्रीडम प्रिझन मेमॉयर - कोबाद घांदी (Kobad Ghandy )

फेब्रु -२०२१ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य करणारे सुधीर सूर्यवंशी लिखित  "चेकमेट हाऊ बीजेपी वन अँड लॉस्ट महाराष्ट्र " ह्या पुस्तकांच्या परिचय लिहला त्यानंतर आज जवळ जवळ महिन्यानंतर पुस्तक परिचय लिहायला घेतला  आहे . मधल्या काळात वाचलं पण वेगवेगळ्या विषयांवर - पुस्तके अर्धवट वाचून मागे पडली अथवा शेवट पर्यंत वाचून पूर्ण  झालीत नाहीत अर्थात ती अर्धवट राहिलेली पुस्तके लवकरच वाचून  पूर्ण करणारच आहे . परंतु का कोण जाणे सध्या आजू बाजूला घडणाऱ्या गोष्टी चित्त सारखे विचलित करतायेत आणि वाचन पाहिजे तेवढ्या एकाग्रतेने होऊ शकत नाहीये.   त्यामुळे कदाचित पुस्तक पूर्ण पने  वाचून होत नाहीयेत आणि त्यावर पुस्तक परिचय राहिलेत असो मराठीत म्हटले आहे इच्छा असली तर मार्ग असतो आणि आवड असली तर सवड असते 

बऱ्याच जणांनी २०१२ च्या ऑगस्ट मध्ये श्री प्रकाश झा दिग्दर्शित अर्जुन रामपाल ,मनोज वाजपेयी ,ओम पुरी अभय देओल यांच्या प्रमुख भूमिका असणारा  "चक्रव्यूह " हा नक्षलवाद /माओवाद भारतीय संघ राज्याचा त्यांच्या बरोबर सुरु असणारा संघर्ष या विषयावर बेतलेला हा हिंदी सिनेमा बघितला असेल विसरले पण असतील . तसा हा सिनेमा काही खूप गाजला होता वा खूप काही सुपर डुपर हीट होता असे काही नाही . परंतु ह्या सिनेमाच्या प्लॉट मध्ये जो आरंभाचा  सीन आहे.  त्यात प्रा गोविंद सूर्यवंशी (स्व.ओम पुरी ) यांच्या अटकेचा प्रसंग आहे आणि त्यानंतर त्यांना न्यायालयात सादर केल्यावर प्रो गोविंद यांची ओळख करून दिली जाते ती अशी "यंहा से नंदीघाट तक दर्जनों अपराध दर्ज है इनके नाम ,गोविन्द राम सूर्यवंशी मुंबई के जाने माने व्यवसायी और धनी परिवार में जन्मे आपने देश के नामी डून स्कूल से पढाई करने के बाद लंदन स्कूल ऑफ़ इकोनॉमिक्स में अर्थ शास्त्र की पढाई की ऑक्सफ़ोर्ड यूनिवर्सिटी से डॉक्टरेट करने के बाद देश लौटे और गरीबोंके शोषण से प्रभावित हो कर सब कुछ त्याग दिया और माओइस्ट मूवमेंट में जुड़ गये पिछले ३० वर्षे गोविंदजी अंडर ग्राउंड रहे और इन्हे नक्सल मूवमेंट के सबसे मुख्य आइडियोलॉग के रूप में जाना जाता हैं |" सीन सरळ आज तक ह्या हिंदी न्यूज चॅनेल च्या स्टुडिओ मध्ये जातो .

आता कदाचित प्रश्न पडला असेल कि प्रो. गोविंद सूर्यवंशी  (स्व.ओम पुरी ) ,चक्रव्यूव्ह हा २०१२ चा सिनेमा यांचा २०२१  साली आलेल्या कोबाद घांदी लिखित फ्रॅक्चरेड फ्रीडम ए प्रिझन मेमॉयर पुस्तकांशी काय संबंध असेल तर तो असा होता की डॉ मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या पहिल्या तसेच दुसऱ्या कालखंडात माओवादी चळवळींनी बरीच उचल खाल्ली होती ती किती गंभीर होती तर पशुपती (नेपाळ ) ते तिरुपती (आंध्र प्रदेश,भारत ) हा भाग रेड कॉरिडॉर म्हणून गणला जात होता (दबक्या अवस्थेत आज पण आहे ) कारण आताच एप्रिल महिन्यात छत्तीसगढ मध्ये झालेल्या माओवाद्याच्या हल्ल्यात सीआरपीएफ चे  ३३ जवान शाहिद झाले तर १ जवानाचे  माओवाद्यांनी अपहरण केले बरं मग या सर्व हिंसाचारामागे कोण आहे तर वेगवेगळ्या माध्यमातील बातमीदारानुसार त्याना नक्षलवादी म्हंटले जातात किंवा माओवादी (भारतीय कम्युनिस्ट पार्टी -माओवादी सध्या ह्या पक्षावर बंदी आहे ) म्हटले जातात किंवा माध्यम जर अति डाव्या विचारसरणीचे असेल तर त्यांना क्रांतीकारी (रेव्होल्यूशनरी ) देखील म्हटले जाते. मग कोबाद घांदी यांचा या सर्वाशी संबंध काय तर ,द हिन्दू ह्या दैनिकाने  Kobad Ghandy's arrest: Major blow to Maoist movement हा मथळा असलेली  के श्रीनिवास रेड्डी बातमीदारानें २२ सप्टेंबर २००९ रोजी दिलेल्या बातमीत वर्णन केल्या प्रमाणे कोबाद ह्या सर्वोच्च् माओवादी नेत्याच्या अटकेने भारतीय नक्षलवादी चळवळीला जोरदार धक्का बसेल मध्य भारतात मजबूत पाय रोवलेल्या ह्या संघटनेच्या दक्षिण भारतातील विस्तारावर याचा प्रतिकूल परिणाम होईल. हा (कोबाद) महत्त्वाचा नक्षलवादी नेता गेल्या दीड वर्षांपासून देशाच्या राजधानीत राहून बेल्जिअम ,पेरू ,फिलिपिन्स ,तुर्की ,जर्मनी व नेपाळ (पशुपती ते तिरुपती ) या देशातील समविचारी क्रांतिकारी संघटनांशी संपर्क साधत होता आणि त्यास दिल्ली पोलिसांनी अटक केली .

 आता कोबाद ची थोडक्यात ओळख झाली असेल पण खरोखरच कोबाद कोण आहे

कोबाद घांदी हे १९४७ मध्ये मुंबई मधील नर्गिस व अदी घांदी ह्या उच्च मध्यमवर्गीय पारशी दांपत्याच्या पोटी जन्माला आले. वडील अदी घांदी हे ग्लॅक्सो ह्या बहुराष्ट्रीय औषध निर्माण कंपनीत वित्त संचालक ह्या पदावरून सेवा निवृत्त झाले होते तर आई नर्गिस हि पाकिस्तानात असणाऱ्या मुररे ब्रेवरी ह्या प्रसिद्ध उद्योग समूह असणाऱ्या कुटुंबातुन होती. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण हे जगप्रसिद्ध डून स्कूल मधून झाले तेथील शिक्षण काळात संजय गांधी ,कमलनाथ ,नवीन पटनाईक हे  प्रसिद्ध राजकीय नेते तर गौतम व्होरा व इशात हुसैन यांच्या सारखे भारतीय खाजगी उदयॊग क्षेत्रातील प्रसिद्ध मान्यवर त्यांचे सोबती व वर्गमित्र  होते. डून स्कूल मधून शालेय शिक्षण तर मुंबईतील झेविअर्स या महाविद्यालयांतूनरसायन शास्त्रात बी एस्सी केल्यावर १९६८ मध्ये ते लंडनला सनदी लेखापाल होण्यासाठी गेले तेथील वास्तव्यात त्यांचा परिचय डाव्या विचारसरणीशी घडला व त्याच दरम्यान लंडन मधील वर्ण द्वेषाचा अनुभव आला व या  वर्ण द्वेष आणि भांडवलशाही  विरुद्ध आवाज उठवण्यासाठी चौक सभा घेतल्या प्रकरणी लंडन कोर्टात ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा पण भोगावी लागली .तिथून एका सुखवस्तू कुटुंबातील उच्च शिक्षित कोबाद चा  प्रवास हा मार्क्सवादी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून सुरु झाला . त्याची परिणीती त्यांनी १९७२ मध्ये सनदी लेखापालची पदवी न घेता मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला . 

६०-८० चे दशक हे जगात सर्वत्र वेगवेगळ्या चळवळीचे दशक मानले जाते . त्याकाळीतील  भारतात देखील बऱ्याच राजकीय ,सामाजिक घडामोडी आणि उलथापालथी घडत होत्या ,प्रथापितांविरुद्ध संघर्ष सुरु झाला त्यात महाराष्ट्रात दलित पॅन्थर च्या दलित पॅन्थर ने २५ वा स्वातंत्र्यदिन हा काळा  स्वातंत्र्य दिन म्ह्णून साजरा केला होता  तर नामदेव ढसाळ आपल्या जहाल शब्दातून व्यवस्थेविरुद्ध अंगार फुलवत होत्या त्याच्या "तुझे बोट धरून चाललो आहे" कवितेच्या खालील ओळी विद्रोहाचा प्रत्येय आणून देतात.

 

हा भाकरीचा जाहीरनामा

हा संसदेचा रंडीखाना

ही देश नावाची आई

राजरोस निजते कुबेराच्या सोबत

किंवा

तेच तेवढे आले आईच्या उदरातून ?

बाकीचे कुत्रा मांजराच्या

विद्रोही चळवळीने जोर धरला होता तसा तो कालखंड हा रोमँटिसिसम चा कालखंड मानला जातो ,जगातील तरुणाई ही  डाव्या चळवळीच्या मोठ्या प्रमाणात आकृष्ट झाली होती हे रोमँटिसिसम म्हणजे किती तर २०१० च्या प्रकाश झा यांच्या  " राजनीती " ह्या चित्रपटातील भारती राय ह्या युवतीने कॉ भास्कर सन्याल यांच्या नेतृत्त्वाखाली झेंडा घेऊन ज्या प्रमाणे आपल्या मुख्यमंत्री वडिलांच्या राजकीय प्रचार सभेतच बंडाचा झेंडा धरला होता त्याप्रमाणे ह्या चित्रपटातील दाखल्या  व्यतिरिक्त वास्तविक उदाहरण द्यायचे झाले तर काल परवा बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपा चे स्टार प्रचारक व कोब्रा असणारे श्री मिथुन चक्रवर्ती हे देखील नक्षलवादी चळवळीशी संबधीत होते तर असे एकदा ऐकले होते कि श्री गडकरी (रॊडकरी ) साहेबांना देखील ह्या चळवळीचे आकर्षण होते.

ह्या सर्व भारावलेल्या कालखंडात कोबाद ने  प्रोग्रेससीव्ह युथ मोव्हमेंट (प्रोयोएम/PROYOM ) तर्फे रुईया महाविद्यालयात घेण्यात "वैकल्पिक विद्यापीठ" (Alternative University ) च्या उन्हाळी  वर्गांना हजेरी लावली . ही प्रोग्रेससीव्ह युथ मोव्हमेंट (प्रोयोएम/PROYOM ) नक्षलवाद्याशी संबधित असणाऱ्या जनशक्ती ह्या संघटनेचे एक अंग होते त्यातून कोबाद चा परिचय दलित पॅन्थर , आव्हान ह्या संघटना बरोबर होत घेला त्यातून त्याने समाजातील दबलेल्या वर्गासाठी काम करण्याकरिता वरळीतील मायानगर ही दलित बहुल झोपडपट्टीतील मुलांसाठी तो वर्ग घेऊ लागला तसे त्याकाळी मुंबईत चालणाऱ्या कामगार चळवळीच्या देखील तो संपर्कात होता . दरम्यानच्या काळात कोबाद चा अनुराधा शानभाग ह्या एल्फिन्स्टन कॉलेज मधील विदयार्थी नेता असणाऱ्या समविचारी युवतीशी परिचय झाला दोघांचे एकमेकांवर प्रेम जुळले व त्यांचा प्रेम विवाह झाला . कोबाद आणि अनुराधा ही जोडी तशी एकमेकांना अनुरूप अशी जोडी होती अनुराधाच्या घरची पार्श्वभूमी ही  खुल्या व कम्युनिस्ट विचारसरणीची त्यामुळे तीही मुंबईतील त्या काळात घडणाऱ्या चळवळीत हिरहिरीने सहभागी होती . याव्यतिरिक्त ती देखील समाज शास्त्राची द्वि पदवीधर होती व पुढे ज्यावेळी ह्या दाम्पत्याने १९८२ ला नागपूर मध्ये स्थायिक व्हायचा निर्णय घेतला त्या वेळी तिने नागपूर विद्यापीठात प्राध्यापकी पण केली.

१९८२ नागपूर ते पुढील १५ वर्षे नंतर अनुराधाचे २ वर्षे बस्तर मध्ये अधिवास  तेथील आदिवासी स्त्रियांसाठी वर्ग  व त्यात तिला झालेल्या फाल्सीपेरम मलेरिया या रोगाची लागण व पुढे २००८ ला मुबंईत स्केलरॉसीसने निधन आणि २००९ ला कोबाद ला अटक व पुढे दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून ओळखला जाणाऱ्या यूएपीए (Unlawful Activities Prevention Act),भारतीय दंडविधान संहिताच्या (IPC ) कायद्याच्या वेगवेगळ्या कलमाखाली पुढील १० वर्षासाठी तुरुंगवास भोगावा लागला .

 खरोखरच कोबाद काही देश विघातक कारवाया करत होता का ? त्याच्यावर भारताच्या विविध राज्यात दाखल करण्यात आलेले गुन्हे सिध्द झालेत का ?कोबाद खरोखरच या सर्व तुरूंगवासास पात्र होता या सह भारतीय राज्यघटनेत नमूद करण्यात आलेले मूलभूत हक्क खरोखरच देशातील सर्व नागरिकांत समान आहेत कि ज्याप्रमाणे जॉर्ज ऑर्वेल च्या ऍनिमल फार्म ह्या कादंबरीत नमूद केले आहे त्याप्रमाणे "All are equal some are equal" ही परिस्थिती आहे की संविधानाच्या सरनाम्यात आश्वासित केलेल्या  न्याय ,समानता,स्वातंत्र्य , व बंधुत्व या मूल्यांवर आधारित सार्वभौम ,समाजवादी ,धर्मनिरपेक्ष व लोकशाही संघराज्य   आहे.

खरोखरच सर्वाना न्याय मिळतो का आणि कोबाद ला न्याय मिळाला का या आणि अधिक माहिती साठी जरूर वाचा

फ्रॅक्चरेड फ्रीडम प्रिझन मेमॉयर- कोबाद घांदी (Kobad Ghandy )

एम्प्लॉयी रेलेशन्स डेमिस्टीफाइड रिअल लाइफ एक्सपेरियन्सस - जेकब वर्गीस

एम्प्लॉयी रेलेशन्स डेमिस्टीफाइड रिअल लाइफ एक्सपेरियन्सस - जेकब वर्गीस उद्योग धंदा (कारखाना व आस्थापना ) हे विविध विभागांच्या एकत्रित प्रयत्न...